कर्ज हाचि फर्ज! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 28 जून 2017

"लौकरच (म्हंजे अभ्यास संपला की-) मी ऐतिहासिक घोषणा करणार आहे,' असे मी मंत्रालयात भेटेल त्याला सांगून ठेवत होतो. शेवटी शेतकऱ्यांना 34 हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी दिली. म्हटले, घ्या...झाले समाधान? पण नाही!! कुणाचेही समाधान झालेले दिसत नाही

आजची तिथी : हेमलंबी नाम संवत्सरे श्रीशके 1939 आषाढ शुक्‍ल चतुर्थी.
आजचा वार : पारावार.
आजचा सुविचार : द्यावे तुम्हा कर्ज। हाच माझा फर्ज।
म्यां हि केला अर्ज। माफीसाठी।। -ह. भ. प. देवेंद्रबुवा.

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (105 वेळा लिहिणे. रिफिल संपली...नवी आणणे.) हल्ली फार विरक्‍त वाटू लागले आहे. सध्याच्या राजकारणामुळे मला असे होते आहे, असे वाटत होते. परदेशीसाहेबांकडे मी ही शंका बोलून दाखवली. पण "वारीच्या काळात हाडाच्या वारकऱ्याला असे होतेच', असे ते म्हणाले. त्यांचे बरोबरच असणार! जाऊ दे. हेअर कटिंग सलूनमध्ये जाऊन आल्यानंतर काही काळ फार फ्रेश वाटते. चेहरा किंचित उजळल्याचा भास होतो. पण सलूनच्या कारागिराने काही काळापूर्वी (आपल्या) चेहऱ्याला लावलेली पावडर घरी आल्यावर "फुटते' आणि डोक्‍याला लावलेले तेलही ओघळते!! मनुष्य काहीच्या काहीच बेंगरुळ दिसू लागतो. कर्जमाफीच्या घोषणेनंतर काही काळ मला असेच स्वच्छ स्वच्छ वाटत होते. नंतर...

"लौकरच (म्हंजे अभ्यास संपला की-) मी ऐतिहासिक घोषणा करणार आहे,' असे मी मंत्रालयात भेटेल त्याला सांगून ठेवत होतो. शेवटी शेतकऱ्यांना 34 हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी दिली. म्हटले, घ्या...झाले समाधान? पण नाही!! कुणाचेही समाधान झालेले दिसत नाही. परवा मंत्रालयात आमचे अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार्जी भेटले. मला बघून कसनुसे हसले!! ""तयारीला लागा!'' असे मीही हसत हसत म्हटले. तर नाकाचा शेंडा उगीचच कुर्वाळत ते म्हणाले, ""जबरदस्त तयारी केली आहे, साहेब! एकच लक्ष्य, चार कोटी वृक्ष!''
""अहो, झाडांचं मरू दे...ते आपलं शेतकऱ्यांच्या-,'' माझे वाक्‍य पूर्ण काही होऊ दिले नाही त्यांनी!
""आपल्याकडे सोळा कोटी रोपं तय्यार आहेत साहेब! येत्या दोन वर्षात अवघा महाराष्ट्र विदर्भासकट हिरवानिळा करतो की नाही बघा!!'' ते म्हणाले. मी नाद सोडला.

काल मंत्रालयात आमचे चंदुदादा कोल्हापूरकर भेटले. शाळेतले मास्तर चष्म्यातून फळ्यावर बघतात तसे ते आपल्याकडे बघताहेत, असे वाटले. ह्यांनीच खरे तर 34 हजार कोटी वाटले!! मी चांगला हात आखडता धरला होता. तर मध्येच येऊन ह्यांनी बगलेत गुदगुल्या केल्यान!! जाऊ दे.

त्यांच्याकडे बघून "पैसे?' अशा अर्थाने चुटक्‍या वाजवून ""कुठायत?'' असे खुणेनेच विचारले. त्यांनी चक्‍क खांदे उडवून ""काय की?'' ह्या अर्थाने ओठ काढलान!! पुढे त्यांनीही तश्‍शाच खुणा करून मला "पैसे कुठायत?' विचारले. मीही ""काय की!'' अशा अर्थाने खांदे उडवले. मान हलवत खांदे पाडून ते निघून गेले...

34 हजार कोटींची तरतूद करणार कशी? हा महाराष्ट्रापुढचा ज्वलंत प्रश्‍न आहे. एवढे पैसे उभे करणे म्हणजे काही खायचे काम नाही. (ऍक्‍चुअली खायचेच काम आहे, असे आमच्या आधीचे सरकारवाले म्हणतील! असो!!) बऱ्याच सरकारी खर्चाला कात्री लावावी लागणार आहे. अनुत्पादिक खर्च कमी करावा लागणार आहे. मंत्री, आमदार वगैरेंची कामे म्हणजे सर्वात अनुत्पादक कामे!! सर्वप्रथम आपणच आपला एकेक पगार कर्जमाफीच्या पुंजीत टाकूया, असे मी सुचवले. कुणी काही बोलले नाहीत. फक्‍त आमच्या विनोदवीर तावडेजींनी ""साहेब, प्लीज, पुढच्या महिन्यात पगार कापा, ह्या महिन्यात मंत्रालयाच्या क्‍यांटिनवाल्याचे बिल चुकते करणे भाग आहे!'' अशी विनंती केली. तीही मी तात्काळ मान्य केली. माणसाची काही जुनी देणीघेणी असतातच. थोडीफार जुळवाजुळव करून वेळ रेटून नेली की पुढे सारे नीट होते, हा सामान्य अनुभव आहे. नेमके हेच मी कर्जमाफीच्या तरतुदीबद्दल ठरवले आहे. अर्थशास्त्र वगैरे काही नाही. निभावून नेण्याला कसले आलेत अर्थशास्त्राचे नियम? असो.

परवा दिल्लीत आमचे राष्ट्रवादी काका भेटले. त्यांना भेटलो. नेहमीप्रमाणे त्यांनी विचारले, ""काय काढलं?'' मी म्हटले ""कर्ज!'' असो. तूर्त एवढेच.

Web Title: dhing tang article