शालोम अलेखिम! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 6 जुलै 2017

बेन्यामिनभाईंच्या घरी रात्री भोजन होते. रात्री आम्ही फारसे जेवत नाही. शिवाय सायंकाळी पाणीपुरी, भजी असे काहीबाही खाणे होतेच. पण बेन्यामिनभाईंनी त्यांच्या घरी गेल्या गेल्या आमच्या हातात द्रोण ठेवलान!!

शालोम...सांप्रत आमचा मुक्‍काम तेल अवीव येथे आहे, हे वेगळे सांगावयाची गरज नाही. इझरेलचे प्रधानसेवक जे की बेन्यमिनभाई नेतन्याहू यांच्या न्योत्यामुळे आम्ही येथे आलो आहो. आमच्या पथकात आमचे प्रधानसेवक श्रीनमोजी हेदेखील आहेत. तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर आमचे भव्य स्वागत झाले, हे आपण दूरचित्रवाणीवर साडेसातशे वेळा पाहिले असेलच. आपण सारे घरबसल्या पाहिले असले तरी प्रत्यक्ष वृत्तांत आपल्यापर्यंत ("मोसाद'ने) पोहोचू दिला नसणार, ह्याबद्दल आम्हाला खातरी आहे. म्हणूनच सदरील मजकूर आम्ही हिब्रू भाषेत लिहित आहो.

बेन गुरियन विमानतळावर उतरताना भयंकर प्रसंग गुदरला होता, पण आमच्या प्रसंगावधानामुळे तो टळला. विमानतळावरच आमचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यासाठी चांगला बाराशे रुपये चौ. फू. रेटचा भारी मांडव घालण्यात आला होता. मांडवापासून विमानापर्यंत लाल गालिचा हांतरला होता. या गालिच्याला लागूनच विमान उतरवावे, लागेल हे आम्हाला (वरून) दिसत होते. अशा नेमकेपणाने विमान पार्क करता येणे केवळ अशक्‍य असते, हे कोणीही सांगेल! आमच्या पुण्यातील बबन रिक्‍शावाला लक्ष्मी रोडला दुकान आणि रस्ता यांच्या कडेला दोन टेम्पोच्या मधोमध रिक्षा पार्क करू शकतो. ते स्किल एअर इंडियाच्या पायलटकडे नव्हते. आम्ही शेवटी ऐनवेळी सूत्रे हाती घेऊन धावपट्‌टीवर विमान उतरवले, आणि बरोब्बर लाल गालिच्यासमोर आणून उभे केले. उपस्थितांनी ज्या टाळ्या वाजवल्या, त्या आमच्यासाठी होत्या, हे अनेकांच्या लक्षात आले नसेल, म्हणून सदरील मजकूर (हिब्रू भाषेत) लिहीत आहो.

आमचे प्रधानसेवक नमोजी यांना आम्ही फर्माविले की पुढे जाऊन साऱ्या सोयी नीट आहेत की नाही ते पाहा!' त्याप्रमाणे ते (कोटाची बटणे लावत) विमानातून पहिले उतरले. इझरेली प्रधानसेवक बेन्यमिनभाई यांचा काहीतरी गैरसमज झाला. त्यांनी झटक्‍यात नमोजींचा हात ओढून मिठी मारली. माणसाने असे करणे बरे नव्हे!! आमच्या पुण्यात पक्‍या सोळंकुरकर "रुपाली'वर भेटला की असे होते!! बगलेत मुंडी पकडून तो अशी काही अफझुलखानी मिठी मारतो की वाघनखे असती तर बरे झाले असते असे कोणालाही वाटेल!! वास्तविक ही मिठी आमच्यासाठी होती, हे इतरेजनांस कळावे, म्हणून सदरील मजकूर (हि. भा.) लिहीत आहो.
विमानतळावरच मांडव घालून कार्यक्रम उरकणे, हे तितकेसे बरोबर नाही. शिवाय इझरेली मंडळींनी व्यासपीठाशी फक्‍त दोन म्हंजे मोजून दोन खुर्च्या ठेवलेल्या. एकात बेन्यामिनभाई बसलेले, दुसरीत (पटकन जाऊन) श्रीनमोजींनी बैठक जमवलेली. आम्हाला गर्दीत उभे राहावे लागले.

बेन्यामिनभाईंच्या घरी रात्री भोजन होते. रात्री आम्ही फारसे जेवत नाही. शिवाय सायंकाळी पाणीपुरी, भजी असे काहीबाही खाणे होतेच. पण बेन्यामिनभाईंनी त्यांच्या घरी गेल्या गेल्या आमच्या हातात द्रोण ठेवलान!! स्वत: लाल फडके गुंडाळलेल्या मडक्‍याशी उभे राहिले. तेल अवीवला पाणीपुरी मिळते, हे आम्हाला माहीत नव्हते. नमोजींनी पाणीपुरीचा आस्वाद घेतल्यावर "बेन्यामिनभाई, जरा पाणी आपो!' असे सांगून तिखट पाण्याचे भुरके मारले. आम्हास म्हणाले, ""हवे सूपडा साफ थई जशे!'' आम्ही सवयीने "सुक्‍का पुरी देना' असे सांगून हात पुढे केला. तेल अवीवमध्ये एक प्लेट पाणीपुरी खाल्ल्यानंतर शेवटची (आणि फुकट) सुक्‍का पुरी देण्याची पद्धत नाही, हे पाहून मनाला प्रचंड विषण्णता आली. तेल अवीव ह्या इझरेली राजधानीतील भोजन तेलकट पदार्थांनी युक्‍त असे असणार, अशी आमची कल्पना होती. पण साधेसुधे शाकाहारी व बिनतेलाचे जेवण होते. व्हेजिटेबल कोरमा, मा की दाल (या पदार्थाचे नाव देणाऱ्याला शोधून काढून काणसुलीत देणाराय!! असो.) ढोकळा, पांढरा भात असा साधासा मेनू होता.

...यथास्थित जेवून आम्ही टावेलला हात पुसत असतानाच नमोजींनी बेन्यामिनभाईंशी क्षेपणास्त्रांच्या व्यवहाराची बोलणी सुरू केली. इझरेली दौरा सुरू जाहला. शालोम.

Web Title: dhing tang article