एक "निवांत' खुलासा! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang

प्रति,
महाम्याडम, (10, जनपथ, न्यू दिल्ली.) यांसी बालके राधाकृष्णाजीचे शतप्रतिशत-आपले ते हे...सॉरी...लाख लाख प्रणाम. म्याडम, मी एक साधासुधा सिंपल असा कांग्रेसचा (उरलेला व एकमेव) कार्यकर्ता असून अत्यंत निरलस भावनेने मी महाराष्ट्रात पक्षकार्य करीत आहे. असे असले तरीही माझ्याविरुद्ध विनाकारण राळ उठवण्याचे स्वपक्षीय कारस्थान रचले जात असून त्यासंबधींच्या घडामोडी आपल्या कानावर घालण्यासाठी सदर पत्र लिहीत आहे.

गेली कित्येक वर्षे मी पक्षाची (व आपली) निष्ठेने सेवाचाकरी करीत असून माझ्या कार्याची दखल घेऊन पक्षाने मला गेल्या इलेक्‍शननंतर विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्‍त केले. (आपल्याला कल्पना असेलच.) लोकशाहीत अपोझिशन लीडर हे फार्फार महत्त्वाचे पद असते. (ह्याचीही आपल्याला कल्पना असेलच.) चुकीच्या कारभारासाठी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणे, आणि योग्य कामासाठी साथ देणे, हे विरोधी पक्षनेत्याचे कर्तव्यच आहे. मी लोकशाही मूल्ये मानत असल्याने माझ्यापरीने महाराष्ट्रातील लोकशाही गेल्या अडीच-तीन वर्षात प्रचंड बळकट केली आहे. तथापि, माझ्या बेरजेच्या राजकारणामुळे काही जणांच्या पोटात दुखू लागले आहे, असे दिसते.

शिर्डी येथे गेल्या आठवड्यात झालेल्या एका समारंभात मी फक्‍त एवढेच म्हटले की ""आधीच्या सरकारपेक्षा मला हे सरकार जवळचे वाटते. किंबहुना आपल्या आप्तेष्ट-नातलगांमध्येच वावरतो आहे, असा भास मला होतो!'' आता ह्यात काय चुकले? मी लोकशाही बळकट करत होतो. पण आमचे आदर्श नेते आशुक्राव चव्हाणसाहेबांनी मला तातडीने जाब विचारला.

परवाचीच गोष्ट. मंत्रालयाच्या आवारात मी (कमळ पार्टीच्या) काही मित्रांशी गप्पा मारत उभा होतो. तेवढ्यात आमचे नेते मा. आशुक्राव चव्हाणसाहेब आले. माझ्याकडे घुश्‍श्‍यात पाहू लागले. मी त्यांना सहज म्हटले, ""कटिंग घेणार का?'' तर ते आणखीनच संतापले. आता चहासुद्धा विचारायचा नाही का? बराच काळ ते माझ्याभोवती घुटमळत होते. अखेर सहाव्या मजल्यावरील एका एकांत जागेत त्यांनी मला गाठले. म्हणाले, ""आपल्या पक्षातल्या लोकांशीही अधूनमधून मिसळत जा! दरवेळी आपला तो कमळवाल्यांचा कळप घेऊन बसता. अशानं पक्षात काय मेसेज जाईल?''

""अहो, आपले इथे उरलेत कुठे? आणि उरलेत ते इथं येतात कुठे? आता भिंतीशी गप्पा मारत बसू का? टाइमपासला ही कमळवाली माणसे बरी असतात!!,'' मी उलट खुलासा केला.

कांग्रेसच्या कचेरीत गेले की माझ्या मनाला प्रचंड विषण्णता येते. तासतासभर माणसे नुसती मान खाली घालून (आज कोण चहा मागवते आहे? याची वाट पाहात) स्वस्थ बसलेली असतात. एखाद्याला "काय बरंय ना?'' असे विचारलेच, तर हमखास उत्तर येते : "निवांत!!' तेसुद्धा हाताचे दोन्ही पंजे आशीर्वादासारखे पुढे करून खुणेने सांगायचे!! टिळक भवनात कुणाशीही बोलायचे म्हंजे, "घोटाळा,' "सिंचन', "बदल्या', "आदर्श' असे काही शब्द संपूर्ण टाळून संभाषण करायचे!! अशाने महाराष्ट्राच्या राजकारणात कुठले संभाषण शक्‍य आहे? "आदर्श' हा शब्द कानावर पडला रे पडला की काही जणांचा चालण्याचा स्पीड डब्बलटिब्बल होतो. पण ते जाऊ दे. सारांश एवढाच की माझा खुलासा मा. आशुक्रावांना पटला नाही.
""उद्या टिळक भवनात या, आपले प्रभारी मोहन प्रकाशजींसमोर तुम्हाला उभं करतो. तिथं काय सांगायचं ते सांगा!,'' असे गुरकावून ते निघून गेले.
दुसऱ्या दिवशी टिळक भवनात गेलो. तिथे एक गृहस्थ बसले होते. तेच ते आपले प्रभारी-मोहनजी प्रकाशजी. मी नमस्कार केला. त्यांनी मान डोलावली.
""कसं काय बरंय ना?'' मी सहज विचारावे, तसे विचारले.
तर त्यांनी दोन्ही पंजे हवेत उंचावून खुणेनेच सांगितले, ""निवांत!''
...म्यां गरीब बापड्याने आता पुढे काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे. आपला. आज्ञाधारक. रा. वि.
ता. क. : आपण आणि चि. राहुलजी कसे आहात? हे विचारायचे राहून गेले! क्षमस्व!! कसे आहात? निवांत ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com