वजन! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 20 जुलै 2017

काल सकाळी आमचे चंदुदादा कोल्हापूरकर येऊन गेले. बराचवेळ काहीच बोलेनात! चष्म्याच्या खालच्या भागातून नुसते बघत राहिले. शेवटी अवघडून मीच विचारले, "" काय बघताय?''

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे आषाढ कृष्ण दशमी श्रीशके 1039.

आजचा वार : मधला वार.

आजचा सुविचार : नमो मुखे म्हणा। म्हणावे भजन। वाढते वजन। राजकाजी।।

नमो नम: नमो नम: नमो नम: (105 वेळा लिहिणे.) तुताऱ्यांच्या निनादात, ढोलताशांच्या गजरात कुणाची तरी तुळा सुरु आहे. एका सुवर्णाच्या रत्नजडित भव्य तराजूचे दर्शन होते आहे. तेवढ्यात आमचे दैवत (क्रमांक दोन) अमितभाई शाहजी आले. त्यांनी कटप्पाने बाहुबलीसमोर आडवी तलवार धरावी, तसे चक्‍क माझ्यासमोर दोन्ही हात पसरले, आणि तराजूत बसण्याची विनंतीवजा खूण केली. मी? आणि तराजूत? छे, छे, हे काय भलतेच? पण खुद्‌द व्यंकप्पा नायडू ह्यांनी पुढे येऊन मला हाताला धरुन तागडीत बसवले. मी आपला झोपाळ्यात बसावे, तसा तागडीच्या साखळ्या धरुन बसलो. दाणकन खाली गेलो!! मग आसपासचे पक्ष सहकारी दुसऱ्या तागडीत विवेकानंदांची पुस्तके ठेवू लागली. आवृत्त्याच्या आवृत्त्या संपल्या, पण आमची तागडी काही वर यायला तयार नाही. शेवटी दैवत क्रमांक दोन आमच्या कानात म्हणाले, ""देवेनभाई, वजन बढ गया हं!!''...आणि मला स्वप्नातून जाग आली!

व्यंकप्पाजी उपराष्ट्रपती होणार असल्याने दिल्लीत पक्षाच्या संसदीय समितीत मला घेण्याचे चालले आहे, अशी अफवा जोरात सुरु आहे. त्या अफवेने माझे वजन सध्या प्रचंड वाढले आहे, असे इतरांना वाटते आहे. माझे वजन वाढते आहे, ह्यात शंकाच नाही. पण त्याचे कारण वेगळे असावे! हल्ली मी बरेचसे काम बंगल्यावर किंवा रस्त्यापलिकडल्या सह्याद्री अतिथीगृहातून करतो. त्यामुळे मला वजन वाढल्यासारखे वाटत असेल का? कोणास ठाऊक.

कालपासून सारखे फोन येताहेत. भोपाळहून शिवराजजी चौहानसाहेबांचा फोन आला. ""कैसे हो मित्र...'' अशी प्रेमळ चौकशी झाली. राजस्थानातून वसुंधराराजेंचा फोन आला. भाईजी, कभी आ रहे हो, हमारे राजस्थान?'' मी म्हटले, येतो येतो. आमचे नाथाभाऊ तर प्रत्यक्षच आले. माझ्याकडे बघून म्हणाले, ""मुंबई मानवली भाऊ तुम्हाला!'' मी म्हटले ""असं का म्हणता?'' तर म्हणाले, ""दिल्लीला केव्हा?''

मी म्हटलं, "" छे, इथंच तर आहे...'' तर तरातरा निघून गेले!!

काल सकाळी आमचे चंदुदादा कोल्हापूरकर येऊन गेले. बराचवेळ काहीच बोलेनात! चष्म्याच्या खालच्या भागातून नुसते बघत राहिले. शेवटी अवघडून मीच विचारले, "" काय बघताय?''

ते म्हणाले ""काही नाही!!'' चष्म्याच्या खालच्या भागातून ते बघायला लागले की ऍक्‍चुअली ते काहीच बघत नसतात, हे मी पाहून ठेवले आहे. जाऊ दे. मग थोड्या वेळाने म्हणाले, "" दिल्लीला कधी निघताय?'' मी म्हटले, ""अहो, अजून काहीसुध्दा नाही हो! मी दिल्लीला पार्लमेंटरी बोर्डात जाणार, ही नुसती वावडी आहे, वावडी! उगीच काहीतरी उठवलंय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसारखं...'' वेळीच सावध होऊन मी जीभ चावली, म्हणून वाचलो!! असो. मी दिल्लीला इतक्‍यात तरी जात नाही हे लक्षात आल्यावर ते खांदे किंचित पाडून निघून गेले. दरवाजात विनोदवीर तावडेजी उभेच होते. त्यांच्या खांद्यावर हात टाकत चंदुदादा त्यांना परस्परच घेऊन निघून गेले.

हे सगळे त्या पार्लमेंटरी बोर्डात मला घेणार ह्या अफवेमुळे झाले आहे. उगीचच डोक्‍याला ताप झाला आहे. मी खरेच तिथे जावे की जाऊ नये? माझ्या दिल्लीला जाण्याचा लोकांना आनंदच होणाराय, हे लक्षात आल्याने मी थोडा खचलोच. चालायचेच.

...आज सकाळची गोष्ट. नेहमीप्रमाणे पीए घाईघाईने आले. गेटपर्यंत हा मनुष्य आरामात चालत येतो, इथे आल्यावर घाई दाखवतो, हे मी ओळखून आहे. आल्या आल्या भिंतीवरच्या क्‍यालिंडरकडे जात ते म्हणाले, ""सर दिल्लीला कधी जाणार आहात सर?'' मी खवळलोच. म्हटले, ""तुम्हाला काय करायचंय? आणि क्‍यालेंडर का बघताय?''

चाचरत त्यांनी उत्तर दिले : ग...ग...गटारी नेमकी कुठल्या तारखेला येत्येय, ते बघत होतो स...स...सर!''

Web Title: dhing tang article