कपट!

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 28 जुलै 2017

ब्रूटसने खंजीर खुपसला नाही.
त्याला तर मित्राचे शरीर
फक्‍त बेदाग करायचे होते.
खुनाचा आरोप स्वीकारुन
तो तूर्त, वटवाघळासारखा
दिवसा गुहाकपारीत
दडून राहात असला तरीही

फ्रेंड्‌स, रोमन्स, कंट्रिमेन,
लेण्ड मी युअर इयर्स
जरा उसनवार द्या तुमचे कान
सरसकट द्या, तत्त्वत: द्या,
पण द्या थोडे कर्जाऊ...

कां की नंतर तुमच्याच
कानात ओतले जाईल
कालकुटाचे विष किंवा
झिरपेल तेथून सत्तामदाचा
मादक धुंदभारला द्रव.
मग कदाचित नाहीच
ऐकू येणार तुम्हाला
पॉंपेच्या सभागाराबाहेरील
फरसबंद प्रकारात
निष्प्राण पडलेल्या
सीझरच्या कलेवराचा आकांत
किंवा,
त्याच्या उभ्या देहावर पडलेले
आप्तांच्या तलवारीचे घावदेखील.

शतशतकांनंतरही परवा कधीतरी
सीझरचा परममित्र मार्क अँटनीने
काढले त्रिखंड धुंडाळून, आणि
एखाद्या ध्वनिभाषक वटवाघळाप्रमाणे
दिवसा गुहाकपारीत दडून बसणाऱ्या
ब्रूटसला अखेर गाठलेच.

खांदे पाडून बसलेल्या
त्या प्राचीन खलनायकास
गदागदा हलवून विचारले त्याला-

बाबा रे, का खुपसलास तू
खंजीर आपल्याच मित्राच्या पाठीत?
का केलेस असले भयंकर कारस्थान?
का फितूर झाली तुझी मित्रभावना?
का सामील झालास त्या कटवाल्यांना?
ज्यांना नव्हती चाड रोमन साम्राज्याची,
किंवा नव्हती पर्वा कधीही
खुद्द रयतेचे हित साधणाऱ्या
सम्राट ज्युलियस सीझरची.
असे का केलेस?

त्यावर आपला शतकानुशतके
विरलेला, जीर्ण अंगरखा
सावरत विकल झालेला
ब्रूटस म्हणाला : मित्रा मार्क अँटनी,
खंजीर मी नाही रे खुपसला...
कुणीतरी तो माझ्या मुठीत दिला,
आणि दाखवला मला एक गलिच्छ
डाग, विद्रुपाचे रक्‍त साकळलेला.

बेदाग त्वचेचे वेड असलेला मी,
वेडावलो त्या वेडाने आणि
वेडाच्याच भरात त्या डागावर
आपोआप चालला माझ्या
हातातील खंजीर...

डागही स्वच्छ झाला
हे शतप्रतिशत सत्य आहे,
पण सीझरसारखा मित्र गेला,
हा आहे निव्वळ भ्रम...

एका विद्रूप डागाला नष्ट
करण्यासाठी ब्रूटसने
आपला ऐतिहासिक खंजीर वापरला तर!
तरीच...
तरीच ब्रूटस अजूनही एक
आदरणीय व्यक्‍ती आहे.

...माय फ्रेंड्‌स, रोमन्स, कंट्रिमेन,
लेण्ड मी युअर इयर्स
जरा उसनवार द्या तुमचे कान
सरसकट द्या, तत्वत: द्या,
पण द्या थोडे कर्जाऊ...
आणि ऐकून घ्या हे एवढे सत्य!
ब्रूटसने खंजीर खुपसला नाही.
त्याला तर मित्राचे शरीर
फक्‍त बेदाग करायचे होते.
खुनाचा आरोप स्वीकारुन
तो तूर्त, वटवाघळासारखा
दिवसा गुहाकपारीत
दडून राहात असला तरीही

यट ब्रूटस इज ऍन ऑनरेबल मॅन,
यट ब्रूटस इज ऍन ऑनरेबल मॅन!

Web Title: dhing tang article

टॅग्स