झोप! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

काहीही समस्या आली की मित्रवर्य उधोजीसाहेबांना फोन करतो. त्यांना विचारले, ""गेले काही दिवस झोप लागत नाही. काय करू?'' ते म्हणाले, ""आश्‍चर्य आहे!! गेले काही दिवस आम्ही तर बुवा गप्प आहोत!!'

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके 1939 श्रावण शुद्ध एकादशी. (उपवास करणे.)
आजचा वार : मोपलवार...आय मीन...गुरुवार!
आजचा सुविचार : लौकर निजे लौकर उठे, तया ज्ञान, आरोग्य भेटे!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम:...डोळे जरा लालच दिसताहेत. (श्रावण सुरू आहे म्हणून बरे!) गेले काही दिवस झोप धड होत नाही. झोप येण्यासाठी काय काय नाही केले? जंग जंग पछाडतो आहे, पण व्यर्थ! रात्री झोपण्यापूर्वी गिलासभर दूध पीत चला, असा सल्ला कुणीतरी दिला होता. करून पाहिले...नो झोप! कुणी सांगितले की त्यात एक केळं कुस्करून घाला, मग बघा, कशी गाढ झोप लागते. तेही करून पाहिले...पण छे!! कुणीतरी सांगितले, वाटीभर श्रीखंड खाऊन झोपा. या सल्ल्यांमुळे डायटिंगची मात्र वाट लागली. जाऊ दे.

काहीही समस्या आली की मित्रवर्य उधोजीसाहेबांना फोन करतो. त्यांना विचारले, ""गेले काही दिवस झोप लागत नाही. काय करू?'' ते म्हणाले, ""आश्‍चर्य आहे!! गेले काही दिवस आम्ही तर बुवा गप्प आहोत!!'' त्यांनी रात्री हलका आहार घ्या, असा सल्ला दिला. हलका आहार घेतला की मध्यरात्री भूक लागते, ही तक्रार आता कुणाकडे करायची? पुन्हा जाऊ दे.

गेल्या आठवड्यात आमचे विनोदवीर तावडेजी भेटायला आले. आल्या आल्या त्यांनी विचारले, ""झोप उडाली की काय?''
""हो...पण तुम्ही कसे ओळखलेत?'' मी विचारले.
""माझी पण उडाली आहे..,'' हसत हसत त्यांनी सांगितले, ""लोकल गाडीत विंडोसीट मिळाली की हमखास डुलकी लागते, असा मुंबईकरांचा अनुभव आहे. तुम्हीही करून बघा!''...लोकल गाडीची काय गरज आहे? विमानतळावरून येताना मोटारीतही आपल्याला डुलकी लागते, हे आठवले. परवा रात्री सरळ उठलो आणि ग्यारेजमधल्या गाडीत जाऊन झोपलो. सकाळी बंदोबस्तावरल्या पोलिसाने उठवले. म्हणाला, ""ओऽऽ...गाडीत झोपनाऽऽर...स्वतःला शीएम समजतो का रे? लॉर्ड फॉकलंडसारखा गाडीत झोपितोऽऽऽ..! फडका मारून ठिव. साएब आत्ता येतीलच!!''
...बाकी पोलिसाने ओळखले नाही, हे बरेच झाले. गुमान घरात गेलो, तयार होऊन विधिमंडळ गाठले. तिथे कॉरिडॉरमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीबाबाजी भेटले. मला बघून आश्‍चर्यचकितच झाले. मी विचारले, ""काय झालं? असं का बघताय?''
""एवढं सगळं चाललं आहे, तुम्हाला झोप कशी लागते?,'' त्यांनी थेट सवाल केला. माझ्या दुखऱ्या नसेवर अक्षरश: बोट ठेवले.

""कुठे लागतेय झोप, बाबाजी! दिवसरात्र डोळ्याला डोळा नाही!!,'' मी प्रामाणिकपणाने सांगितले. गेले काही दिवस झोप पार उडाली असून तुमच्या काळात तुम्ही झोपेसाठी काय करत होता? असे विचारून घेतले. अनुभवाचे बोल माणसाने नेहमी ऐकावे.
""मी सकाळी सात ते अकरा बॅडमिंटन खेळायचो. मग नाश्‍ता. मग पेपरवाचन. मग जेवण...मग दुपारी थोडी विश्रांती...मग पुन्हा चहाबिहा झाला की टेबल टेनिस खेळायचो. संध्याकाळी टीव्हीवर बातम्या...मग जेवण..मग पुन्हा दोन तास बॅडमिंटन...खूप खेळून दमलो की झोप लागायची!'' त्यांनी आख्खा दिनक्रमच सांगितला. मला हेवा वाटला.
""मग कामं कधी करायचात?'' न राहवून मी विचारलेच.
""कुठलं काम? छे!! काहीतरीच..."सह्या करताना ह्यांना लकवा येतो का?' असं थोरल्या साहेबांनी माझ्याबद्दल विचारलं होतं...विसरलात का?,'' गालातल्या गालात हसत बाबाजींनी गुपित सांगितले.
एकदम साक्षात्कार झाला! अरेच्चा, गाढ झोप लागण्याचे गुपित हे आहे तर!! त्यांच्याकडे आदराने पाहात मी त्यांना "थॅंक्‍यू' म्हटले. झोपेसाठी आम्ही बॅडमिंटनदेखील खेळण्यास तयार आहो! "हरहर महादेव' असे मनातल्या मनात ओरडून मी बॅडमिंटनची रॅकेट मागवण्याचा निर्णयदेखील घेऊन टाकला.
""जरा कान इकडे करा...,'' त्यांनी इकडे तिकडे पाहात जवळ बोलावले. मी एक पाय ताणून कान त्यांच्याकडे नेला. ते म्हणाले, ""महाराष्ट्रासाठी काही नाही केलेत तरी चालेल, पण स्वत:च्या झोपेसाठी तरी काहीतरी करा!!''
...गेले काही तास पाहातो आहे...झोप आवरता आवरत नाहीए...होऽऽऽईऽऽ...!!

Web Title: dhing tang article