जाग्या त्याथी सवार! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

माझे नाव जिग्नेसभाई असे असून आपल्या सर्व आमदारांच्या वर्षासहलीची जबाबदारी माझ्यावर होती. राज्यसभा इलेक्‍सनपर्यंत आपले आमदार कोणाशीही बोलणार वा भेटणार नाहीत, ह्याची काळजी मी यथाशक्‍ती घेतली. त्याचा हा वृत्तांत

"होनेरेबल हायकमांड, सादर प्रणाम. आ पत्र कोन्फिडेन्शियल छे. पछी फाडी नाखजो...' अशी सुरवात असलेले एक पत्र आम्हाला भेळवाल्याकडे सांपडले. भेळ संपल्यानंतर आम्हाला त्यातील मजकूर दिसला. जो अर्थातच गुजराथी भाषेत होता. तो वाचून आम्ही इतके हादरलो की आम्ही त्या शॉकावस्थेत आणखी दोन भेळी मागवल्या!! पत्रातील मजकूर तर जबर्दस्त स्फोटक होता. आमच्या (लाखो हं!) मराठी वाचकांना कळावे, म्हणून आम्ही त्याचा मराठी तर्जुमा येथे देत आहो.
गुजराथेतील (घडामोडींची) थोडक्‍यात पार्श्‍वभूमी : आता गुजराथेतील पार्श्‍वभूमी थोडक्‍यात कशी असेल? असा चहाटळ प्रश्‍न आम्हाला काही नतद्रष्ट करतील!! पण त्यांच्याकडे आम्ही तूर्त दुर्लक्ष करू. गुजराथेत राज्यसभा निवडणुकांची गडबड चालू आहे, हे सर्वांना माहीत आहेच. कमळ पक्षाचे शहंशाह अमितभाई ह्यांनी दंड थोपटले असून कोंग्रेस पार्टीच्या एहमदभाईं पटेल ह्यांचा पतंग कापण्यासाठी काची मांजा तयार ठेवला आहे. परिणामी, कोंग्रेस पार्टीने आपली सर्व आमदारे बस व विमानमार्गे बंगळुरुत हलविली. तेथून त्यांना परत आणून आणंद नजीकच्या निजानंद रिझोर्टमध्ये नजरकैदेत ठेवले. ही सर्व आमदारे खुशीत, सुरक्षित अने मजामां आहेत हे वेगळे सांगावयास नकोच...असो. आता पत्राचा तर्जुमा.

""होनेरेबल हायकमांड, कोंग्रेस पार्टी, न्यू डेल्ही. आ पत्र कोन्फिडेन्शियल छे. एटले पछी फाडी नाखजो...माझे नाव जिग्नेसभाई असे असून आपल्या सर्व आमदारांच्या वर्षासहलीची जबाबदारी माझ्यावर होती. राज्यसभा इलेक्‍सनपर्यंत आपले आमदार कोणाशीही बोलणार वा भेटणार नाहीत, ह्याची काळजी मी यथाशक्‍ती घेतली. त्याचा हा वृत्तांत.

...आम्ही बसने विमानतळ आणि विमानतळावरून विमानाने बंगळुरुला गेलो. तिथून पुन्हा बसमधून मा. शिवकुमार ह्यांच्या इगलटन रिझोर्टमधी गेलो. तिथे आमचे दिवस छान गेले. सगळ्यांचे मोबाइल फोन काढून घेतले होते आणि लॅंडलाइन बंद केल्या होत्या. मा. शिवकुमार हे खूप चांगले हॉटेलमालक आहेत. त्यांनी आमच्यासाठी एक दिवस उंधीयुसुद्धा बनवला. आमच्यामुळे मा. शिवकुमार ह्यांच्यावर मात्र बेघर होण्याची पाळी आली. इन्कम ट्याक्‍सवाल्यांनाही तेव्हाच रिझर्वेशन हवे झाले!! वाईट वाटते, पण काय करणार?..बाकी इतक्‍या चांगल्या मुक्‍कामानंतर बशीत भलेभक्‍कम बिल न येता नुसती बडीशेप येते, तेव्हा किती सुखद वाटते म्हणून सांगू? सुरतचे आमदार श्री किरीटभाई ह्यांनी तर तिथले रेटकार्डही मागून घेतले आहे. "वेळ आली तर परत येऊ' असे ते माझ्या कानात म्हणाले.

...इलेक्‍सनच्या आधी एक दिवस आम्ही विमानाने परत आलो व आणंदनजीकच्या "निजानंद रिझोर्ट'मध्ये आमची स्थापना झाली. कमळ पार्टीच्या लोकांनी आम्हाला लालूच दाखवण्याचा खूप प्रयत्न केला. पंधरा कोटी रुपिया आणि वर पक्षाचे तिकीट अशी ऑफर असल्याचे कळल्याने आपले काही आमदार खूप अस्वस्थ झाले होते. काही आमदारांना तर जेवण जाईना! कोणीतरी आपल्याला पंधरा कोट देत आहे, ही कल्पनासुद्धा सहज पचण्याजोगी नाही. तेथे जेवणाचे काय? असो.

निजानंद रिझॉर्टच्या हिर्वळीवर आलेली एक म्हैससुद्धा सुरक्षारक्षकांनी तातडीने हाकलली. कारण तिच्या पाठीवर (खडूने) "पंधरा' असा आकडा आणि त्यावर काही शून्ये काढलेली होती. हा म्हैसरूपी मेसेज कोणी पाठवला होता, ह्याची चौकशी सध्या चालू आहे.

एक महत्त्वाची खबर देत आहे...राखी पौर्णिमेला आम्ही "निजानंद रिझोर्ट'मध्ये असताना एका आमदारबंधूंना पोष्टाने राखी आली. ती केसरिया रंगाची असून त्यावर कमळाचे चित्र होते. मी त्यांना ताबडतोब छेडले असता ते म्हणाले, ""जाग्या त्याथी सवार छे, बेटा!''

...एहमदभाईंनी प्रत्येकाला शपथ घ्यायला लावली आहे. आणखी काही मते गळली तर एहमदभाई कायमस्वरूपी दिल्ली सोडणार, असे बोलले जाते. तसे न होवो, ही प्रार्थना. बाकी दिल्लीत भेटीअंती बोलूच! आपला कु. जिग्नेस.

Web Title: dhing tang article