एका खासदाराची कैफियत! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang

कमळाध्यक्ष श्रीमान अमितभाई शहा यांच्या चरणकमळी साष्टांग शतप्रतिशत प्रणिपात. मी एक आपल्या पक्षाचा साधासुधा कार्यकर्ता असून आपल्या व परम आदरणीय श्रीश्रीश्री नमोजीमास्तर ह्यांच्या कृपेने (गेल्या इलेक्‍शनी) खासदारदेखील झालो. निवडणूक जिंकलो, त्याक्षणी हा एकच विचार मनात होता की यापुढे सतरंज्या उचलायच्या नाहीत! असो.

गेल्या महिन्यात आपण आम्हा खासदारांचा वर्ग घेतला. खुद्द नमोजीमास्तर छडी घेऊन वर्गात हजर झाले. आल्या आल्या त्यांनी विचारले, ""तुम क्‍या हो?'' मी गडबडलो. नाव सांगणार एवढ्यात त्यांनी विचारले, ""तुम खुदको कौन समझते हो?'' मी पुन्हा गडबडलो. ते रागीट आवाजात म्हणाले, ""पार्टी के सामने तुम कोई नहीं हो! समझे?'' मी "हो' म्हणालो. लोकांनी मते दिल्यामुळे आपण खासदार झाल्याचा जो गैरसमज झाला होता, तो ह्या वर्गात फिटला. नमोजीमास्तरांच्या कृपेने हे खासदारकीचे दान पदरात पडले आहे, ह्याचा विसर काही काळ पडला होता, हे मान्यच केले पाहिजे.

गेल्या हप्त्यात परम आदरणीय नमोजीमास्तरांनी पुन्हा आमचा वर्ग घेऊन बाकावर उभे केले व हल्ली आपल्या पक्षाचे खासदार संसदेत उपस्थित राहात नसल्याबद्दल खडसावले. (तेव्हा तुम्हीही पर्यवेक्षक ह्या नात्याने हजर होता.) आम्ही मान खाली घालून ती बोलणी ऐकली. आपल्या पक्षाचे लोक संसदेत तोंडदेखील उघडत नाहीत, अशाही तक्रारी झाल्या. त्याही आम्ही तोंड बंद ठेवून ऐकून घेतल्या. काहीही न बोलता हा बोलाचा मार खाऊन आम्ही आपापल्या घरी जाऊन न्हाणीघरात रडलो!!
वास्तविक पहिल्या काही महिन्यातच संसदेच्या दालनात आम्हाला नमोजींनी नजरेने विचारले, ""इथे काय करताय? तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीने माणसात ऱ्हायले पाहिजे. मतदारसंघात जा आणि आपल्या सरकारच्या योजना त्यांना समजावून सांगा!! जाओ, भागो!!''

नाहीतरी खुद्द नमोजीमास्तर कुठे संसदेत येत होते? म्हटले, हे प्रकरण तसे ऐच्छिकच दिसते आहे. शिवाय आपण जे काही बोलायचे, ते सारे तेच बोलून टाकताहेत. थोर माणसे बोलत असताना आपण उगीच कशाला मध्ये तोंड घाला? तात्पर्य एवढेच की पडत्या फळाची आज्ञा समजून आम्ही मतदारसंघात जाऊ लागलो. लोकांना भेटू लागलो. पण...

कालांतराने नोटाबंदी वगैरे झाल्यावर मतदारसंघात जाणे धोक्‍याचे ठरू लागले. नोटाबंदी ही एकप्रकारे आपल्या पार्टीच्या नेत्यांसाठी संचारबंदीच ठरली. साधे कोपऱ्यावरच्या पानटपरीवर जाऊन पान आणणे दुष्कर होऊन बसले. (नोटाबंदीची शिक्षा म्हणून आमच्या पानवाल्याने मरेस्तोवर चुना लावून पान दिल्यावर मी पानदेखील सोडले! असो.) एटीएममध्ये जाऊन पैसे काढायला जातानाही छातीत धडधड होऊ लागली. कित्येक दिवस उधार-उसनवार करून घर चालवले. पण असे किती दिवस चालणार?

पंचतारांकित हाटेलात राहू नका, सरकारी मोटारी वापरू नका, असल्या अटीही होत्याच. हाटेलात न राहता सरकारी डाकबंगल्यात मुक्‍कामाला जावे, तर तिथे एटीएमच्या बाहेर लोकांची लागते, तशी खासदारांची रांग!! अखेर अनेक दिवस रेल्वेच्या वेटिंग रूममध्ये काढले...जाऊ दे, झाले!!

आदरणीय अमितभाई, आता तुम्हीच सांगा, संसदेत गेले तर मतदारसंघात जा म्हणून सांगतात, मतदारसंघात गेले तर संसदेत का गेला नाहीत, असे विचारतात. अशा परिस्थितीत माणसाने करावे तरी काय?

नुकत्याच निवृत्त झालेल्या कुटुंबवत्सल माणसासारखी माझी मनस्थिती झाली आहे. कामावर जायची चिंता नाही आणि घरात बसून काय करावे, हे कळत नाही. अंथरुणावर लोळत पडावे, तर पत्नी ढोसकण्या मारून उठवत्ये व उगीचच टमाटे अथवा फरसबी आणावयास पाठवत्ये. बाहेर जावे, तर खिश्‍यात दमडी नसल्याने चहादेखील प्यायची मारामार! पत्नी (वाढत्या वयामुळे) नको तितकी बोलते आणि मुले (वाढत्या वयामुळेच) धड बोलत नाहीत. हाताशी भरपूर वेळ असूनही टीव्हीवर आपल्या आवडीचा कार्यक्रम लावण्याचे स्वातंत्र्य उरलेले नाही. थोडक्‍यात दिवस खायला उठतो व रात्र वैऱ्याची वाटते. काय करू? आपणच मार्गदर्शन करावे.
आपला. एक अभागी खासदार. (निनावी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com