निवृत्ती! (एक पुणेरी लघुकथा...) (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

""आपण पुण्यात नवीन दिसता?'' भाऊसाहेबांनी विषय बदलला. वृद्ध गृहस्थांनी आता पोवाडा म्हणताना करतात, तसा जबडाही ताणला होता. तरीही भाऊसाहेब रेटून मोठ्यांदा बोलले, ""मी भाऊसाहेब... भा-ऊ-सा-हे-ब!!'' त्यांच्या स्वेटरकडे बोट दाखवून भाऊसाहेबांनी दोन्ही पंजे "तुम्ही कोण?' ह्या अर्थाने नाचवले

सकाळची वेळ होती. खेळजोडे, ट्रॅकसूट असा जामानिमा करून मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या भाऊसाहेबांनी तणतणत येऊन एक रिकामे बाकडे गाठले. हुश्‍श करून बसले. खरेतर ते काही दमलेबिमले नव्हते. वळणावळणाने वर गेलेल्या पर्वतीकडे त्यांनी नजर टाकली. बाप रे! कशाला चढायचा येवढा चढ उगाच? दम लागतो. घाम फुटतो. जीव घाबरल्यासारखा होतो. स्वत:हून जीव कशाला दु:खात टाकायचा? ते बाकावर तस्सेच बसून राहिले. सीनियर सिटिझनचा आपला ग्रुप आला की मग बघू, असा विचार करून त्यांनी मानेवर न आलेला घाम उगाचच पुसला. चार समवयस्क टाळकी जमली की जरा बरे वाटते. चहाबिहा प्यावा, मिसळ हाणावी... घाम पुसत घरी परतावे.

...गाणे गुणगुणावे का? नकोच. आंबट चेहऱ्याने भाऊसाहेब स्वत:शीच म्हणाले : आपला आवाज तितकासा बरा नाही. न्हाणीघरात मजेत गळा मोकळा सोडण्याची आपली सवय शेजारच्या महाजनांनी घालवली. हा महाजन पक्‍का डांबिस गृहस्थ आहे. एक दिवस दारात कचरा टाकला पाहिजे त्याच्या! चांगला गाणी गायचो, तेव्हा हे महाजन दारावर चिठ्ठी डकवून गेले : "न्हाणीघरात भसाड्या आवाजात गाणी म्हणू नयेत. अपमान होईल!' किती हा उर्मटपणा? पण अपमान नको म्हणून गाणे थांबवले, ते थांबलेच. गेला उडत तो महाजन. "इथे तरी आपण म्हणू,' असे ठरवून भाऊसाहेबांनी "दिलबर तुझे मिलने कोऽऽ कबसे हूं मैं तय्याऽऽर...' अशी लकेर पुण्याच्या हवेत सोडली. आहा!!

...इतक्‍यात त्यांच्या खांद्यावर कुणीतरी टकटक केले. टापशी गुंडाळलेले एक वृद्ध गृहस्थ तोंडावर बोट ठेवून खुणेने गप्प करीत होते. हा कोण ढुढ्ढाचार्य? मी गाणे म्हटले तर ह्याचे काय जाते? ओळख ना पाळख.

""क्रिपया गाना मत गाईये...त्रास होतो!,'' त्या वृद्धाने दोन्ही हात जोडून अजीजीने सांगितले.

""पण का म्हणून?,'' भाऊसाहेबांनी निषेधाचा सूर काढला. बरीच बडबड केली. हा अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा विषय आहे. ह्या देशात काही स्वातंत्र्य नावाची गोष्ट आहे की नाही? माणसाला तुम्ही इतके टाकाऊ का समजता? वगैरे वगैरे. हातावर मूठ आपटून शेवटी ते जोरात म्हणाले, ""मी गाणार! तुमचं काय जातं?''
""आँऽऽ?,'' पोवाडा म्हणताना ठेवतात, तसा कानामागे हात ठेवून वृद्ध गृहस्थांनी विचारले. भाऊसाहेब थिजलेच! म्हणजे एवढा वेळ केलेली बडबड परत करायची?
""आपण पुण्यात नवीन दिसता?'' भाऊसाहेबांनी विषय बदलला. वृद्ध गृहस्थांनी आता पोवाडा म्हणताना करतात, तसा जबडाही ताणला होता. तरीही भाऊसाहेब रेटून मोठ्यांदा बोलले, ""मी भाऊसाहेब... भा-ऊ-सा-हे-ब!!'' त्यांच्या स्वेटरकडे बोट दाखवून भाऊसाहेबांनी दोन्ही पंजे "तुम्ही कोण?' ह्या अर्थाने नाचवले.
""दिल्ली, दिल्ली!!,'' दादाजी दूर कुठेतरी बोट करत म्हणाले.
""दिल्लीत का? व्वा!!,'' भाऊसाहेबांना जरा बरे वाटले. काहीतरी संवाद झाला म्हणायचा.
""डिलीट तर झालोय आणि काय!...'' हताश चेहऱ्याच्या वृद्ध गृहस्थांनी तेवढ्यात कानाचा द्रोण सोडला होता.
""डिलीट नाही हो! दिल्लीत, दिल्लीत म्हटलं मी...'' भाऊसाहेब पुन्हा हादरले.
""आपली परिस्थिती काही वेगळी नाही हो!..,'' जरा वेळ गेल्यानंतर भाऊसाहेबांनी नेहमीची टेप लावली. इतकी वर्ष झाली, राब राब राबलो. मुलांच्या शिक्षणासाठी खस्ता खाल्ल्या, पण मुलांना किंमत नाही. चार पैसे हाती खुळखुळायला लागल्यावर चक्‍क घराबाहेर काढलं... वगैरे. हताशेनं हात चोळत ते म्हणाले, ""इथंच भोसरीला आमची जमीन होती, पण-''
""मी ओळखतो तुम्हाला!,'' कानावरचा हात काढत वृद्ध गृहस्थ म्हणाले. आणि आश्‍चर्याने भाऊसाहेबांनी तोंडात बोटे घातली. ह्या माणसास ऐकू येते तर!!
""अहो, इतका वेळ मी तुम्ही "हे' आहात असं समजून बोलत होतो,'' भाऊसाहेब चाचरत म्हणाले. ""ओळखलं नाहीत का? मी अडवानी... आपण नाथाभाऊ ना?'' दादाजींनी मार्दवाने विचारले. आणि...
..भाऊसाहेबांनी कानाचा द्रोण केला. म्हणाले, ""आँ?''

Web Title: dhing tang article