डोकलामचा तिढा! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang

गेले दोन महिने देशभर डोकलाम डोकलाम अशी आरडाओरड चालू असताना आम्ही शांतपणे हाक्‍का नूडल खात बसलो होतो, ह्याचे कोणालाही आश्‍चर्य वाटेल. पण आम्ही निश्‍चिंत होतो. कारण एक दिवस हे भांडण आम्हालाच सोडवावे लागणार, ह्याची खात्री होती. तसेच घडले. चीन आणि भारत ह्यांच्यातील भांडणाचे प्रमुख कारण काड्या हे आहे. आम्ही भारतीय माणसे जेवणानंतर फारतर दातात काडी घालू!!

दोन महिन्यापूर्वी चिन्यांनी डोकलाममध्ये रस्ता बांधायला काढला. डोकलाम हा खरे तर भारताचा भाग नव्हे. तसा तो चिन्यांचाही नव्हे आणि कहर म्हणजे तो भूतानचा असला तरी तिथे भुतांचाही संचार नव्हे!! ज्याप्रमाणे मेरेवरचा आंबा आपलाच, असे दोन्ही-तिन्ही पार्ट्यांना वाटत असते, तसलाच काहीसा प्रकार आहे. सर्वप्रथम आम्ही "डोकलामचा तिढा नेमका काय आहे?' हे उदाहरणानिशी समजावून सांगू. त्याचे झाले एवढेच की-

आमच्या गल्लीच्या तोंडाशी हमरस्ता आहे. तिथून चिंचोळी गल्ली थेट आमच्या चाळीपर्यंत येत्ये. त्या गल्लीच्या तोंडाशी एक भेळवाला भय्या तिकाटणे घेऊन बसतो. त्याच्याकडील खारे शेंगादाणे घेऊन आम्ही पलीकडल्या बाजूच्या "ॐ नाइटबर्डस' ह्या चर्चाकेंद्राकडे हरहमेश सायंकाळी जातो. भय्या इतके वर्षे तिथे आहे की त्याच्या बरोब्बर मागील बाजूस असलेल्या "शा. शामळजी अेण्ड सन्स' ह्या किराणाभुसार दुकानाचा पत्तादेखील "भेळवाल्याच्या मागे' असा सांगितला जातो. तर एक दिवस रणबहादुर थापा नामे एका नेपाळ्याने लाल रंगाची गाडी आणून भय्याच्या तिकाटण्यास खेटून लावून कांदा चिरावयास घेतला. चार कोबीचे गड्डे व भाताची रास ठेवून कढई मांडिली. चायनीज गाडीचे हे अतिक्रमण भय्यास सहन न होऊन त्याने "ॐ नाइटबर्डस' ह्या चर्चाकेंद्राचे अध्यर्यू व समन्वयक प्रो. कालिदास शेट्टी ह्यांच्याकडे तक्रार गुदरली. सदर शेट्टीगृहस्थाने सदर भय्यास स्थानिक नगरसेवकाकडे नेले. नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करून चायनीज गाडी तासाभरात उडवून लावून कांदा-कोबीची वासलात लाविली. चायनीज गाडीवाले व नगरसेवकाचे कार्यकर्ते ह्यांच्यात झटापट झाली. दोघेही एकमेकांस छात्या लावून मिश्‍या ताणू लागले. नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांच्या व्हटांवर मिश्‍या होत्या व चायनीज गाडीवाल्याच्या मिश्‍या नव्हत्या, हा तपशिलाचा भाग झाला. सदर आपरेशननंतर कार्यकर्त्यांनी समोरील "ॐ नाइटबर्डस' चर्चाकेंद्रात जाऊन शांतपणे चर्चा आरंभली. तथापि, चायनीज गाडीवाला थापा पेटला होता. "ही जागा तुझ्या बापाची आहे का?' असे त्यास विचारले असता त्याने "तुझ्या तरी बापाची कुठे आहे?' असा प्रतिप्रश्‍न केला. वास्तविक ती जागा कुणाच्याच बापाची नव्हती. अशावेळी काय करावे? पोलिसांना चिरीमिरी देऊन प्रकरण मिटवण्याची चायनीजवाल्याची आयडिया होती, पण नगरसेवक भाजपाचा निघाला!! नोटाबंदी करून भाजपवाल्यांनी साऱ्यांचीच चांगलीच पाचर मारून ठेवली आहे, हे तर विदितच आहे. सारांश, तिढा काही सुटेना.

अखेर प्रकरण आमच्या (टेबला)पाशी आले. नगरसेवकाचे कार्यकर्ते म्हणाले, ""हा चायनीजवाला चोर असला तरी त्याचा शेजवान राइस चांगला आहे.'' जे आम्हाला पटले. ("ॐनाइडबर्डस'मध्ये चायनीज बरे भेटत नाही, असे आमचे मत आहेच.) चिनी गाडीवाला म्हणाला की ""भेळवाला चोर असून कार्यकर्त्यांना हप्ता हवा आहे. सब चोर है, सब चोर!'' तेही आम्हाला पटले. भेळवाला म्हणाला की ""कहां गरीब को सताते हो भाईसाहब! हमने आपसे कभी शेंगदाने का पैसा लिया?'' ते आम्हाला मान्य करावेच लागले. सबब आम्ही तोडगा दिला तो असा-

भेळवाल्याने शा. शामळजीच्या दुकानाला खेटून तिकाटणे लावावे. चायनीज गाडी "ॐ नाइटबर्डस'च्या फूटपाथला लावावी व "नाइटबर्डस'ने चिनी आयटेम मेनूकार्डावरून हटवावेत. कार्यकर्त्यांनी दररोज चर्चाकेंद्रात येऊन चर्चा चालू ठेवावी, जेणेकरून प्रो. कालिदास शेट्टी ह्यांचे बिल वाढून त्यास बरकत येईल. तोडगा काढल्याबद्दल आम्हांस उधारी मान्य करावी!!'' तिन्ही पार्ट्यांना तोडगा मान्य झाला.

...डोकलाममध्ये घडले ते येवढेच. असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com