साथ! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

सैनिक पेशींचे नृशंस शिरकाण आरंभल्यावर
जनरल लेप्टोस्पायरोसिसने ओढले जवळ
आपली प्रेमिका प्रिन्सेस मलेरियाला, म्हणाला :
""स्वीटहार्ट, जग जिंकणं तितकं काही
अवघड नाही मला... फक्‍त हवी तुझी साथ!''

पुराचे पाणी ओसरल्यानंतर
सुरू झाला एक कार्निवाल...

ढोल-ताशे-कर्ण्यांच्या दणदणाटात
"जंतुवाद चिरायु होवो'च्या विजयघोषात
थिरकले व्हायरल नर्तकांचे धुंद ताफे
सरकत गेले मंदगतीने
झगमगाटी चित्ररथ आतड्या-आतड्यातून
यकृत, प्लीहा, फुफ्फुसे, मूत्रपिंडे निकामी करत.
गजबजून गेले रोगजंतूंनी देहादेहातील
चौक, तिठे, हमरस्ते.

सैनिक पेशींचे नृशंस शिरकाण आरंभल्यावर
जनरल लेप्टोस्पायरोसिसने ओढले जवळ
आपली प्रेमिका प्रिन्सेस मलेरियाला, म्हणाला :
""स्वीटहार्ट, जग जिंकणं तितकं काही
अवघड नाही मला... फक्‍त हवी तुझी साथ!''
जनरल लेप्टोच्या पीळदार बाहूंवर
अनाफेलिस डासाच्या मादीप्रमाणे
नखे रुतवत प्रिन्सेस मलेरिया म्हणाली :
""ओ माय ब्रेव्हहार्ट, तुझी पराक्रमी छाती
हेच माझ्या विसाव्याचं ठिकाण नाही का?
कर्नल डेंगीचं पाठबळ, आणि
व्हायरसांच्या आत्मघातकी फौजा
हेच तुझं खरं बळ...
साथ फक्‍त "मम' म्हणण्यापुरती!''

जनरल लेप्टोने प्रेमभराने
उचलली तिची हनुवटी, म्हणाला :
""साक्षात महामारी आहेस तू!
शेकडो-हजारो वर्ष भोगते आहेस
रोगराईचे साम्राज्ञीपद...मी तर तुझा
एक पगारी सेनापती आणि
अधूनमधून सोबत करणारा साथीदार.
खरे सांग, आणखी कोण होतं,
तुझ्या पूर्वायुष्यात?
झ्याहीपेक्षा पराक्रमी, बलवान आणि कठोर?
झ्याइतका बेजोड साथीदार कोण?''

खळखळून हसत प्रिन्सेस मलेरियाने
घेतली स्वत:भोवतीच एक लाडिक गिरकी, म्हणाली :
""तुझा हा रांगडा पझेसिवनेस
आवडला मला, माझ्या योध्या!
पण खरं सांगू?
खरी साथ दिली ती
आणि त्याच्या
सरकारी यंत्रणांनी!''

...क्षणभर विचारात पडलेल्या
जनरल लेप्टोस्पायरोसिसने
आपल्या प्रियतमेचे अंत:पुर सोडले,
आणि तो नव्या मोहिमेवर निघाला...
 

Web Title: dhing tang article