मेरे पिया गये रंगून! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

तद्‌नंतर हिंदुस्थानचे आखरी मुघल बादशहा बहादूर शाह जफर ह्यांच्या मजारीवर जाऊन सजदा करण्याचे श्रीश्री नमोजी ह्यांनी ठरवले. त्याप्रमाणे आम्ही तिथे गेलो. त्यांच्या मनात बादशहांच्या शायरीतले शेर रुंजी घालत होते

मिंग-ला-बाऽऽऽ...आम्ही सध्या ब्रह्मदेशात आहो, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच. साहजिकच आहे, जेथे देह, तेथे सावली. जिथे अग्नि, तिथे धूर. जिथे शिते, तिथे भुते!! जिथे अजीर्ण, तिथे इसबगुल!! -त्याच चालीवर जिथे श्रीश्री नमोजी, तिथे आम्ही!! तेव्हा आमच्या रंगून भेटीचा वृत्तांत वाचकांना देणे, हे आमचे परम कर्तव्य असल्याने सदर लेखन करीत आहो.

वास्तविक आम्ही हा सारा मसुदा म्यांमारी भाषेत लिहिणार होतो. आमच्या गुरुजींना (नमो नम:) सर्व भाषा येत असल्या तरी म्यांमारी भाषा अद्याप अवगत झालेली नाही. इन्शाल्ला, तीही त्यांस एक दिवस वश होईल. चिनी भाषा तीन दिवसांत शिकून घेऊन त्यांनी चिनी पंतप्रधान शी जिनपिंग ह्यांना न्यूनगंड आणला होता, हे साऱ्यांना विदित आहेच. जप्पानमध्येही तस्सेच झाले. नमोजी छत्तीस तासांत जप्पानी शिकले आणि (त्यामुळे) जप्पानचे नमोजी जे की शिंजो आबे हे विदर्भ स्टाइलीत हिंदी बोलू लागले. पण ते एक असो. मुद्दा रंगूनचा आहे...

म्यांमारच्या प्रमुख श्रीमती आँग सान सू की ह्यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर श्रीश्री नमोजी ह्यांनी "'आपडो नाम सू छे?'' असे खेळकरपणाने विचारले. त्यावर त्यांनी पुन्हा एकदा पूर्ण नाव सांगितले. त्या हिंदीत काही तरी बोलत असल्याचा गैरसमज होऊन नमोजी (उगीचच) गोरेमोरे झाले. पुन्हा असो.

श्रीमती सू की ह्यांनी माहिती दिली की सध्या काही कारणाने रंगून ह्या शहराचे नाव बदलून यंगून असे करण्यात आले असल्याने आपणही यंगून असेच म्हणावे. श्रीश्री नमोजी ह्यांनी खांदे उडवत "चोक्‍कस' असे म्हटले. रंगूनला जाण्यासाठी येकांदा डोंगर येंगून यावे लागत असावे, म्हणून कंटाळलेल्या एखाद्या गिर्यारोहकाने नाव बदलले असणार, असा आमचा कयास होता. पण तो चुकीचा ठरला. पण तेही एक असोच.

तद्‌नंतर हिंदुस्थानचे आखरी मुघल बादशहा बहादूर शाह जफर ह्यांच्या मजारीवर जाऊन सजदा करण्याचे श्रीश्री नमोजी ह्यांनी ठरवले. त्याप्रमाणे आम्ही तिथे गेलो. त्यांच्या मनात बादशहांच्या शायरीतले शेर रुंजी घालत होते.

उम्र-ए-दराज मांग के लाए थे चार दिन
दो आरजू में कट गए, दो इंतजार में...

ह्या ओळी ते सारखे गुणगुणत होते. आम्हीही अंतर्मुख झालो. किती समर्पक ह्या ओळी? तसे आम्ही बोलूनही दाखवले. पण बराच वेळ विचार केल्यावर श्रीश्री नमोजी ह्यांनी विचारणा केली, "" ब्रिटिसभाई, तमे बतावो...बादसाने मांगून मांगून चार दिनज का मागितले? मागायच्या तर च्यांगला बे-त्रण साल मांगायच्या नेऽऽ...'' आम्ही निरुत्तर झालो. किती समर्पक हा सवाल? श्रीमती आँग सान ह्यांनीही एक तक्रार केली.

"कितना है बदनसीब जफर दफ्न के लिए
दो गज जमीन न मिली कू-ए-यार में

ह्या ओळी अन्यायकारक असून आज ह्या मजारीचा एरिया सुमारे तीन- चार एकर असल्याचा दावा त्यांनी केला. आम्ही पुन्हा निरुत्तर झालो. किती समर्पक हा मुद्दा? असो.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे म्यांमारच्या राहाणीवर द्रविडी संस्कृतीचा प्रचंड प्रभाव असल्याचे आमच्या लक्षात आले. ह्या देशात लुंगी हा राष्ट्रीय पारंपरिक ड्रेस आहे!! परंतु ते लोक त्यास लुंगी असे न म्हणता "लोंग्यी' असे म्हंटात. आम्ही म्हटले लोंग्यी तर लोंग्यी, आपल्याला काय त्याचे? आम्ही चुकून एका रस्त्यावरील इसमास "अण्णा' अशी हाकदेखील मारली. त्यानेही "ओ' दिल्याने आम्ही च्याटंच्याट पडलो. आमच्या गुरुजींनी मात्र जाऊ, त्या देशातील डिरेस घालण्याचा आग्रह म्यांमारमध्ये (लुंगीप्रमाणे) गुंडाळून ठेवला, हे बरीक चांगले झाले.

परतीच्या प्रवासासाठी आम्ही ब्यागा भरत असताना श्रीश्री नमोजींना दिल्लीहून अमितभाईंचा फोन आला. तेव्हा रिंगटोनवरील "मेरे पिया गए रंगून, किया है वहां से टैलीफून...तुम्हारी याद सताती है' हे गीत ऐकण्यात आम्ही रंगून गेलो. एवढेच.

Web Title: dhing tang article