घराणे! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

""स्टुडंट कुठला, आमचा प्राध्यापक आहे तो!'' काहीशा तुच्छतेने अमेरिकन कन्हैयाकुमारने माहिती दिली. मी सर्दच झालो. जग किती छोटे असते ना, मम्मा? सगळीकडे तस्सेच असते. असू दे.

टु, धी हॉनरेबल मम्मामॅडम,
10, जनपथ, न्यू डेल्ही.
(इफ नॉट डिलिव्हर्ड प्लीज रिटर्न टु :
12, तुघलक रो, न्यू डेल्ही.)

विषय : अर्जंट

डिअर मम्मामॅडम, सा. न. अमेरिकेच्या बर्कली विद्यापीठात सुखरूप पोचलो. मुलाखत नेहमीप्रमाणे छान झाली. तेथील वृत्तांत कळवण्यासाठी हे पत्र लिहीत आहे. इथले वातावरण खूप छान आहे. येथील विद्यार्थ्यांसाठी खास क्‍यांटिन आहे. तिथे बसूनच मी हे पत्र लिहीत आहे. बर्कली विद्यापीठाचा परिसर पाहून मी आश्‍चर्यचकित झालो. अनेक युवक युवती हातात अभ्यासाची पुस्तके घेऊन हिंडत होती. मी एका किरकोळ चणीच्या विद्यार्थ्याला गाठून विचारले, की ""तुमच्यात कन्हैयाकुमार कोण आहे?'' तर तो किरकोळ चणीचा विद्यार्थी म्हणाला, की ""मीच.'' मी लगेच त्याच्याशी हात मिळवला. मी म्हटले, ""आमच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही एक कन्हैयाकुमार आहे.'' ऍक्‍चुअली जेएनयूमध्ये मी आयुष्यात दोनदाच गेलो आहे, हे तुला माहीत आहेच. पण "आमच्या' असे म्हणून मी एक पॉइण्ट वसूल केला इतकेच. तेवढ्यात दुसरा एक किरकोळ चणीचा विद्यार्थी घाईघाईने आला आणि अमेरिकन कन्हैयाकुमारला म्हणाला, की ""हे ड्यूड, लेक्‍चरला बसू या का?'' अमेरिकन कन्हैयाकुमार म्हणाला, ""हॅट!'' तो दुसरा विद्यार्थी "बरं बरं' असे म्हणून निघून गेला.

""भलताच अभ्यासू दिसतो हा स्टुडंट!,'' खांदे पाडून चालणाऱ्या त्या पाठमोऱ्या विद्यार्थ्याकडे पाहात मी अमेरिकन कन्हैयाकुमारला म्हणालो.

""स्टुडंट कुठला, आमचा प्राध्यापक आहे तो!'' काहीशा तुच्छतेने अमेरिकन कन्हैयाकुमारने माहिती दिली. मी सर्दच झालो. जग किती छोटे असते ना, मम्मा? सगळीकडे तस्सेच असते. असू दे.

...बाय द वे, माझी मुलाखत टीव्हीवर बघितलीच असशील. मुलाखत संपल्या संपल्या मी मुद्दाम मनमोहन अंकलना फोन केला होता. त्यांना विचारले,

""पाहिलीत का आमची मुलाखत?'' तर ते "हं' असे म्हणाले. मी विचारले, ""कशी वाटली?'' तर ते म्हणाले, ""हंहं!'' दोनदा "हं'चा अर्थ छान असाच घ्यायचा ना मम्मा? 2012च्या सुमारास आमच्या पक्षाला अचानक गर्वाची बाधा झाली म्हणून आम्ही हरलो, असा जाहीर पंचनामा मी तिथे केला. ते ऐकून मनमोहन अंकलना बहुधा हुंदका फुटायचा बाकी राहिला होता. ""मी तेच म्हणत होतो, पण माझं कुणी ऐकेल तर शपथ. ह्या अहंकारामुळे आपला पक्ष गाळात जाईल, हेच मी सांगत होतो ना? भोगा आता कर्माची फळं!'' असे मनमोहन अंकल फोनवर म्हणाले. म्हंजे ऍक्‍चुअली काही म्हणाले नाहीत. पण त्यांच्या अखेरच्या "हं'मध्ये ही सारी वाक्‍ये दडलेली होती.

मम्मा, आता यापुढे माझ्यावर घराणेशाहीचा आरोप होणार नाही. तशी मी इथे तजवीजच करून ठेवली आहे. मुलाखतीत मला घराणेशाहीबद्दल प्रश्‍न विचारण्यात आला. मला नवलच वाटले. मी कधी घराणेशाही केली? माझा काय संबंध? पण मग मी प्रत्येक प्रश्‍नाची सडेतोड उत्तरे दिली. पब्लिक जाम टाळ्या वाजवत होते. मी सरळ म्हणालो, ""घराणं घराणं काय ओरड चालवली आहे? आख्खा भारत घराण्यांवर चालतो. माझ्याच एकट्याच्या मागे काय लागता? अभिषेक बच्चन अमिताभ अंकलचा मुलगा नसता तर आज कुठे असता? सांगा, सांगा ना!!'' ह्या लोकांचे मला एक कळत नाही. शास्त्रीय गायनात घराणी चालतात, अभिनयात चालतात, उद्योगधंद्यांमध्ये चालतात, मग राजकारणाने काय घोडे मारले आहे? जाऊ दे झाले.

""सोशल मीडियावर हे कमळवाले माझ्याबद्दल वाट्टेल ते लिहीत बोलत असतात. त्यांच्या मते मी अगदीच "हा' आहे. आता मी तुमच्यासमोर इतका मस्त बसलो आहे. तुम्हीच बघा! आहे का मी इतका "हा'!''...असे मी म्हणताच टाळ्यांचा जो कडकडाट झाला, थांबता थांबेना. असो. पण आता मी थांबतो. बाकी पुढील पत्रात. तुझाच बेटा

Web Title: dhing tang article