...क्‍योंकी मैं झूठ नहीं बोलता! (ढिंग टांग)

...क्‍योंकी मैं झूठ नहीं बोलता! (ढिंग टांग)

बेटा - (नेहमीची दिलखेचक एण्ट्री घेत) ढॅणटढॅंऽऽण!...मम्मा, आयॅम बॅक!

मम्मामॅडम - (वर्तमानपत्रे वाचण्यात मग्न...) हं!

बेटा - (उत्साहाच्या भरात) मम्मा, आय हॅव अ ब्रेकिंग न्यूज!!

मम्मामॅडम - (निरुत्साहाने) कसली न्यूज बेटा?

बेटा - (हसत हसत)...विकास पागल हो गया है, मम्मा!! एकदम पागल हो गया है! हाहा!! 

मम्मामॅडम - (कपाळाला आठ्या घालत) ही काय ब्रेकिंग न्यूज झाली? काहीतरीच तुझं!!

बेटा - (खोलीत येरझारा घालत) माझ्या भाषणांना जाम टाळ्या पडतात हल्ली!! मजा येते!!

मम्मामॅडम - (किंचित हसत) ते ऐकून आहे मी! मध्यंतरी अमेरिकेला गेलास, आणि तुझ्यात किती बदल झाला? 

बेटा - (गूढ स्मित करत) अमेरिका में जो कुछ हुआ, वो कुछ भी नही! वो तो सिर्फ एक ट्रेलर था, पिक्‍चर अभी बाकी है!

मम्मामॅडम - (जावळातून हात फिरवत) कसा काय झाला बुवा हा बदल?

बेटा - (भाषणाच्या ढंगात) हा बदल २०१४ नंतरच झाला! आय मीन गेल्या तीन-साडेतीन वर्षात!!

मम्मामॅडम - (कुतूहलानं) नेमकं काय झालं? मला नाही सांगणार का बेटा?

बेटा - (दीर्घ श्‍वास घेत) सुनना चाहती हो? ठीक है, तो सुनो!...बीजेपी ही खूप चांगली पार्टी आहे! त्यांनी आपल्याला हरवलं असं वाटतं ना तुला? ते राँग आहे! आपल्या अहंकारानं आपल्याला हरवलं! आपल्या पार्टीनं खूप चुका केल्या! बीजेपी झिंदाबाद!

मम्मामॅडम - (प्राणांतिक दचकून) ...बरं वाटत नाहीए का तुला बेटा? माझ्या घरात ह्या घोषणा आयुष्यात पहिल्यांदा ऐकतेय मी!!

बेटा - (सत्यवादी आविर्भावात) मैं झूठ नहीं बोलूंगा!!..बीजेपीने मेरी खूब पिटाई की! इतनी पिटाई की के मेरी आंखे खुल गई!! 

मम्मामॅडम - (काळजीच्या सुरात) क्‍काय? व्हॉट? क्‍या?...कुणी मारलं बिरलं की काय तुला? बघू, बघू! 

बेटा - (डोळे मिटून मान हलवत) हां हां, बीजेपीने मारा! बहोत मारा!

मम्मामॅडम - (दोन्ही कानांवर हात ठेवत) अशक्‍य! इम्पॉसिबल! नामुमकीन!! मेरे होते हुए तुमपर कोई हाथ नहीं उठा सकता! (संतापाने) इस हाथपर किसी का हाथ उठेगा तो वो फिर उठता नाही, उठ जाता है!!

बेटा - (शांतपणे) मम्मा...डायलॉग चुकला!!

मम्मामॅडम - (संतापाने थरथरत) मरू दे रे तो डायलॉग! तुला मार पडला हे आधी का नाही सांगितलंस? बघितलं असतं मी त्या लोकांना! छे!! नरकात जातील, नरकात!!

बेटा - (संयमानं) त्यांना शाप देऊ नकोस मम्मा! त्यांनी मला मदतच केली ना?

मम्मामॅडम - (उडवून लावत) ही कसली मदत? मारहाण करणं ही आमची संस्कृती नाही म्हणावं! तुमची असेल!! हुं-!!

बेटा - (हाताची घडी घालत) मी तर त्यांना थॅंक्‍स गिव्हिंगची कार्ड वाटणार आहे! ज्यांनी ज्यांनी मला शिकवलं त्यांना त्यांना मी ही कार्ड वाटणार!..(काहीतरी आठवून घाईघाईने) बाप रे...उशीर झाला! चल, मी निघालो!!

मम्मामॅडम - (हतबुद्ध होत) आता कुठे निघालास?

बेटा - (खांदे उडवत) अर्थात गुजरातला! तिथं इलेक्‍शन आहे ना!! 

मम्मामॅडम - (वृत्तपत्राचं पान उलटत) नीट जा! आणि नीट बोल!!

बेटा - येस मम्मा...मी सगळ्यांशी नीटच बोलतो! काँग्रेसला मुळीच मत देऊ नका! ह्या पार्टीने खूप चुका केल्या, अहंकाराचा वारा ह्या पार्टीत शिरला! असल्या पार्टीला कशाला मत देता? त्यापेक्षा कमळवाल्यांनाच द्या! त्यांच्यामुळे माझा फायदा झाला, तुमचाही होईल...असं मी सांगणार आहे तिथं भाषणात! मी हल्ली हे असं बोलतो म्हणूनच लोक टाळ्या वाजवतात! कळलं?

मम्मामॅडम - (कपाळावर हात मारत) ओह गॉड...सेव्ह मी!! अरे, असं कशाला सांगायचं?

बेटा - (निर्धाराने) क्‍योंकी मैं झूठ नहीं बोलता!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com