कामगिरी! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

चांगली लोकल गाडी पकडावयास ठाणे रेल्वे स्थानकात चाललो होतो. तेवढ्यात सरबतवाला भय्या दिसला. म्हटले आक्‍टोबरच्या उन्हात थंडगारसे सरबत प्यावे. "भय्या, एक लिंबूपानी' असे म्हणून आम्ही उभे राहिलो. तेवढ्यात एक टोळके आले. भय्या राहिला बाजूला, आमचा मात्र बाप्पा मोरया जाहला. टोळक्‍यातील हरेक जण आमच्याशी हिंदीतच कां बोलत होता? हे आम्हांस कळले नाही

इतिहासास नेमके ठावकें आहे की हे कधी ना कधी घडणारच होते. महाराष्ट्राच्या नवनिर्माणांच्या यज्ञात आमची आहुती पडायचीच होती. हे घटित टिपांवयास तो इतिहासपुरुष कागद आणि बोरु घेवोन जणूं कैक युगें वाट पाहात बसला होता...
कार्तिकातील तृतीया होती. टळटळीत सकाळ होती. होय, आमच्या मुंबापुरीत आक्‍टोबरातील सकाळदेखील टळटळीतच असत्ये. ते का पुणे आहे? ते का महाबळेश्‍वर आहे? ते का ढेराढून आहे?

"राजे, हा घ्या तो निमकहराम!!...ठाण्यात ठेला लावताना हातोहात गावला!!,'' एका जबर्दस्त मनसैनिकाने आमचे बखोट धरोन आम्हांस राजियांच्या समोर फेंकले. टीव्ही मालिकेतील कजाग सासूने मवाळ सुनेस घराबाहेर फेकल्यानंतर जशा विजा कोसळतात, तैसा भास झाला. त्या "मनसे'धक्‍क्‍याने आम्ही जमिनीवर कोसळलो. "श्रावणाचं उन्हं मला झेपेनाऽऽ' ह्या लावणीतील अचूक अदा करीत आम्ही वर पाहिले. (तपशील : वीरासन घालून दोन्ही हात जमिनीला टेकवून नाक घासावे. मग चटकिनी वर बघावे!..) वर पाहातो तो काय! साक्षात तेजाचा पुंज प्रकटियेला!! अंगार ओकणारे ते पाणीदार डोळे. दरदरीत नाक. सिंहासनावर बैसोन साक्षात राजे मांडियेवर चित्रकलेचा बोर्ड घेवोन बैसलेले. हातात कुंचला...आम्ही तात्काळ लावणीच्या बोर्डावरोन चित्रकलेच्या बोर्डावर आलो.

""आता काय केलं ह्या गाढवानं?'' बोर्डावरचे लक्ष न काढता राजे म्हणाले.
"" आपल्या हुकुमाप्रमाने बरुब्बर सोळाव्या दिशी आपन तीन ठिकानी शत्रूच्या गोटांवर हमलाबोल केला...त्यात हा गावला, साहेब!,'' त्या मणसैणिकाने वीरश्रीपूर्न ढंगात आपल्या मर्दुमकीची थोडक्‍यात कल्पना दिली.
""कुठला हुकूम?'' राजियांनी विचारले. सगळे काचकन दचकले! आम्हीही!!
"" एल्फिष्टन पुलाचा लोच्या झाल्यानंतर नाय का, आपन फेरीवाल्यांना कोपच्यात घेयाची आर्डर काढली होती?...पुन्ना एल्पिष्टनसारका हादसा व्होयाला नाय पायजे, असे आपन बोल्ले होते ना..,'' मणसैणिकाने मसलत खोलून दाविली. राजियांनी बोर्डावरुन लक्ष काढले. मणसैणिकाकडे रोखून पाहिले.
""एल्पिष्टन म्हणालो आम्ही? नाही नाही रे...,'' कळवळून राजे म्हणाले. "एल्पिष्टन, एल्पिष्टन' असे स्वत:शीच पुटपुटत त्यांनी स्वडोके धरोन "कठीण आहे, कठीण आहे' असे उद्‌गार काढले.
"" नीट एलफिन्स्टन म्हणायला शिका रे आधी..! हल्ले करतायत!!,'' पुन्हा कुंचला उचलून त्यांनी बोर्डात लक्ष घातले.
""राजे, राजे...क्षमा...क्षमा...,'' आमचे मुखातून शब्द फुटेना. जेहेत्ते कालाचे ठायी मुखच फुटले होते, तेहेत्ते शब्द कसा फुटावा?

चांगली लोकल गाडी पकडावयास ठाणे रेल्वे स्थानकात चाललो होतो. तेवढ्यात सरबतवाला भय्या दिसला. म्हटले आक्‍टोबरच्या उन्हात थंडगारसे सरबत प्यावे. "भय्या, एक लिंबूपानी' असे म्हणून आम्ही उभे राहिलो. तेवढ्यात एक टोळके आले. भय्या राहिला बाजूला, आमचा मात्र बाप्पा मोरया जाहला. टोळक्‍यातील हरेक जण आमच्याशी हिंदीतच कां बोलत होता? हे आम्हांस कळले नाही. आमचे चुकले एवढेच की आम्हीही हिंदीत उत्तरे देत राहिलो. परिणामी एक दाढ धारातीर्थी पडली...असो. पण ही ष्टोरी राजियांना सांगण्यात काहीही अर्थ नव्हता.

""काय झालं? बोला ना..,'' राजे कडाडले.
""राजे, काहीतरी भलताच गैरसमज झाला आहे...,'' आम्ही उरलेली दाढ सावरत म्हणालो.

"" कसला गैरसमज? नौटंकी करतो! आमी गेलो तेव्हा सरबताचा ठेला लावत होता..,'' मणसैणिकाने आमचा युक्‍तिवाद फेटाळला. पण राजे खूप कनवाळू आणि न्यायनिष्ठूर. आम्ही मराठी माणूस आहो, ते त्यांनी अचूक वळखले.
""बरं, ते जाऊ दे! सुक्‍याबरोबर ओलं थोडंफार जळायचंच. माझे सैनिक आहेतच बहाद्दर. शाब्बास पठ्ठ्यांनो, पण पुढल्यावेळी माणूस बघून कामं करा रे...'' शेवटची सूचना मणसैणिकांना उद्देशून होती, हे आम्ही जाणले.
""राजे, फुडली ष्टेप काय घेयाची?'' मणसैणिकांनी अदबीने विचारले.
राजे विचारात पडले. मग गंभीर आवाजात म्हणाले-
"" एल्फिन्स्टन असं नीट म्हणायला शिका, तोवर आम्ही हे चित्र पुरं करतो! लागा कामाला!! जय महाराष्ट्र!''

Web Title: dhing tang article