एक मुलाखत! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे...घेण्यात कसला आलाय प्रॉब्लेम? कर्जमाफीने शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटणारे नाहीत. त्यासाठी आम्ही वेगळी पावलं उचलतो आहोत! (इथे ते दोन्ही पावलं वर उचलून दाखवतात...)

महाराष्ट्राचे कारभारी मा. ना. नाना फडणवीस ह्यांच्या कारकीर्दीस तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आम्ही अखिल महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन करतो. कां की त्यांच्यामुळेच ही कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली. त्याचप्रमाणे आम्ही खुद्द मा. ना. नाना ह्यांचेही आभार मानतो. कां की ते नसते तर तीन वर्षे कशी गेली असती? आम्ही स्वत:चेही खास अभिनंदन करतो. कां की ह्या शुभमुहूर्तावर आम्ही मा. ना. नाना ह्यांची म्यारेथॉन मुलाखत घेतली. त्याचे झाले असे की...

त्रिवर्षपूर्ती महोत्सवाच्या उंबरठ्यावर मा. ना. नाना ह्यांनी आम्हास मुलाखतीसाठी पाचारण केले. त्यांच्या आग्रही आग्रहामुळे तेच आमची मुलाखत घेणार आहेत, असा आमचा (उगीचच) गैरसमज झाल्याने आम्ही दाढी अधिक गुळगुळीत करावयास घेतली. परंतु, हाय! दाढी अर्धीमुर्धीच झाली असतानाच, निरोप आला की आम्हीच त्यांची मुलाखत घ्यावी!! हे म्हणजे आमचे मित्र सुधीर गाडगीळ ह्यांच्यासारखेच झाले!! असो, असो!!

त्यांच्या अनुज्ञेप्रमाणे आम्ही ही मुलाखत मराठी स्टायलीत घेतली. मुदलात म्यारेथॉन मुलाखत हा मुलाखतीचा एक वेगळा प्रकार असून ती वृत्तपत्राच्या अनेक भागात व पानात वाटलेली असते. कुठल्याही एका भागावर "समाप्त' असे लिहून बाकी सर्व भागांवर "क्रमश:' असे लिहून पाठवली की झाली म्यारेथॉन मुलाखत!!! तथापि, आमच्या संपादकसाहेबांनी वृत्तपत्रात येवढी जागा मागितल्यावर "तुझ्या नानाची टांग' अशा आशयाचे गौरवोद्‌गार काढले. सदरील मुलाखत आम्ही आमच्या (लाखो) वाचकांसाठी अंशत: येथे देत आहो.

प्रश्‍न : सध्या काय चाललंय? (हा डेडली सवाल आहे, हे तुम्हीही कबूल कराल!!)
मा. ना. नाना : फॉग चाललंय असं उत्तर मी देणार नाही!! (हे डेडली उत्तर आहे, हेही तु. क. क.!!)
प्रश्‍न : तीन वर्षापूर्वी आक्‍टोबर एंडला तुम्ही शपथ घेतली होती. आता कसं वाटतंय?
मा. ना. नाना : मला काहीच आठवत नाही! कसली शपथ? (हेसुद्धा डेडली उत्तर आहे.)
प्रश्‍न : बरं ते जाऊ दे. साधारणपणे सध्या तुमची कढी पातळ आहे असं दिसतंय. सोशल मीडियावर तुमची बिनपाण्याने होतीय, असं एकंदरित दिसतंय. (आमचा दाढीचा ताजा अनुभव येथे बोलका झाला...)
मा. ना. नाना : सोशल मीडियाकडे लक्ष देऊ नका, असं आमच्या अध्यक्षांनी आम्हाला सांगितलंय. तेव्हा आम्हाला चिंता नाही! सध्या आम्ही काही सोशल मीडिया पाहात नाही!!
प्रश्‍न : मग काय पाहता?
मा. ना. नाना : चला हवा येऊ द्या!!
प्रश्‍न : मंत्रिमंडळ विस्तार केव्हा करणार? (आम्ही विषय बदलला...)
मा. ना. नाना : नव्या खुर्च्या बनवायला टाकल्या आहेत. त्या झाल्या की लगेच!!
प्रश्‍न : स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक बरा, असं तुम्ही परवा म्हणालात! तुमचा रोख नेमका कोणावर होता?
मा. ना. नाना : तुमच्यावर!
प्रश्‍न : आम्ही दिलदार विरोधक?
मा. ना. नाना : अंहं...!
प्रश्‍न : आम्ही स्वार्थी मित्र?
मा. ना. नाना : खुखुखु!!
प्रश्‍न : कशावरून आम्ही स्वार्थी मित्र?
मा. ना. नाना : दिवाळीत आम्ही पोस्त म्हणून दिलेल्या शर्ट पीसचा सदरा तुमच्या अंगावर आत्ता दिसतोय, त्यावरून!!
प्रश्‍न : कर्जमाफीच्या प्रक्रियेत चिक्‍कार प्रॉब्लेम आहेत म्हणे! (आम्ही पुन्हा विषय बदलला...)
मा. ना. नाना : देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे...घेण्यात कसला आलाय प्रॉब्लेम? कर्जमाफीने शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटणारे नाहीत. त्यासाठी आम्ही वेगळी पावलं उचलतो आहोत! (इथे ते दोन्ही पावलं वर उचलून दाखवतात...)
प्रश्‍न : कर्जमाफी पुन्हा नको, ह्यासाठी तुम्ही नेमकी काय उपाययोजना केली आहे?
मा. ना. नाना : सर्वात महत्त्वाचं आणि मूलभूत पाऊल आम्ही यंदा उचललं, ह्याचा विलक्षण अभिमान आणि समाधान आहे...
प्रश्‍न : कुठलं पाऊल?
मा. ना. नाना : यंदा मजबूत पाऊस पाडला हे!! जय महाराष्ट्र.

Web Title: dhing tang article