पीए तो पीए ऐसे..! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके 1939 कार्तिक शुद्ध दशमी.
आजचा वार : मंडेवार.
आजचा सुविचार : जिए तो जिए कैसे...बिन आपके!

नमो नम: नमो नम: नमो नम:..मनाला विलक्षण समाधान वाटते आहे. मुंबईत येऊन तीन वर्षे कशी गेली, कळलेदेखील नाही. तीन वर्षापूर्वी ह्याच दिवशी मुंबईत समारंभपूर्वक मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्या खुर्चीत बसण्याचे स्वप्न पूर्ण झाले तर रोज "नमो नम:' हा सिद्धमंत्र 108 वेळा लिहीन आणि त्या जपाच्या पवित्र वह्या समुद्रार्पण करीन असा संकल्प सोडला होता. तीन वर्षाच्या वह्यांचे गठ्ठे खोलीत ठेवले आहेत. त्यांच्याकडे बघून खूप बरे वाटते आहे.

सकाळपासून अभिनंदनाचे मेसेज येत आहेत. माणसे भेटून जात आहेत. कालपासून रीघच लागली आहे. सोळा कप चहा झाला!! "उद्या तयारीत या, ज्यास्त माणसं येणार' असे मी आमच्या पीएंना बजावून ठेवले होते. त्यानुसार ते (आंघोळबिंघोळ करून) लौकरच हजर झाले. आज तर चहाचे पिंपच तयार ठेवावे लागणार होते. आमचे पीए तसे फार कार्यक्षम आणि कर्तबगार आहेत. असा पीए मिळणे ही भाग्याची गोष्ट असते. असो! वृत्तपत्रातल्या माझ्याच मुलाखती मिटक्‍या मारत वाचत बसलो असताना पीए अचानक घाबऱ्याघुबऱ्या आले. म्हणाले, ""बाहेर एक उंच व्हीआयपी माणूस तुमची भेट मागतोय. अर्जंट काम आहे म्हणाला!''
""कोण आहे?'' मी विचारले.
""तुमच्या जीवश्‍च कंठश्‍च मित्राचे पीए आहेत म्हणे!'' पीए म्हणाले.
""पीए तुम्हाला व्हीआयपी वाटणारच...पाठवा आत!'' मी हसून म्हटले. ह्या पीएलोकांना आपणही व्हीआयपी आहोत असे फार वाटते. कारण "मी मुख्यमंत्री बोलतोय' ह्या वाक्‍यापेक्षा "मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून बोलतोय' ह्या फोनवरच्या वाक्‍याला जास्त वजन असते, हे एक सरकारी सत्य आहे. चालायचेच.
...आत आलेले गृहस्थ खरेच खूप उंच होते. माझीही उंची कमी नाही. पण मी बसलेलो होतो. ते उभे होते. मी उठून उभे राहून त्यांना नमस्कार केला. त्यांनी मला हातानेच "बसा की, उभे का?' असे सांगून स्वत: खर्रकन एक खुर्ची ओढली. माझ्या कपाळाला आठ्या पडल्या. "जंजीर'मधल्या अमिताभ बच्चनच्या आवाजात "ये मुख्यमंत्री का घर हय...' असे वाजवणार होतो. पण वाटले, माणूस नागपूरचा तर नसेल? चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता.
""ओळखलं नाही का? मी मिलिंदा...साहेबांनी पाठवलंय!'' त्यांनी सहज सांगितले, म्हणाले, ""एक चहा मागवा...लेमन टी हं! लक्षात आहे ना?''
लेमन टी मागवला. चहा पीत एखाद्याचा खात्मा कसा करावा, हे आमच्याकडून शिकावे!! समोरचा माणूस अनोळखी असला तरी आम्ही राजकारणीलोक त्याच्याशी तासंतास ओळखीच्या गप्पा मारू शकतो. हे गृहस्थ नेमके कुठल्या "साहेबां'नी पाठवलेत, ह्याची काही टोटल लागत नव्हती. टोटल लागेपर्यंत बॅटिंग करणे मला भाग होते. तसे पाहू गेल्यास मला किमान डझनभर तरी साहेब आहेत!! दिल्लीपासून गल्लीपर्यंत अनेकांना मी साहेब म्हणतो. महाराष्ट्रात तर गावोगाव साहेब असतात. त्यापैकी कुठल्या साहेबांचे हे पीए?
""साहेबांनी सांगायला सांगितलंय की फुर्रर्र....'' पीए म्हणाले. मी गोंधळलो.
""फुर्रर्र?'' चहा मीसुद्धा पीत होतो!
""मग कधी करताय मंत्रिमंडळ फुर्रर्र?'' त्यांनी विचारले. मी सावध होऊन चहाचा कप ओठांनाच ठेवला. दोनदा "फुर्रर्र' तेवढे केले. "तुमच्या साहेबांचा "फुर्रर्र' तेवढा पटकन सांगा' एवढे म्हणालो.
"" हं...फुर्रर्र...त्या कोकणातल्या दादांना फुर्रर्र...मंत्रिमंडळात घेतलंत तर...फुर्रर्र वाईट होईल!,'' ते म्हणाले.
""ओह...फुर्रर्र!,'' मी समजून उमजून म्हणालो.
"" घेताय का त्यांना फुर्रर्र?'' त्याने रोखून पाहात विचारले.
""साहेबांना म्हणावं, अजिबात फुर्रर्र करू नका! काहीही झालं तरी आम्ही युतीधर्माचं फुर्रर्र करू!!'' मी म्हटले. त्यांचे समाधान झाल्यासारखे दिसले. कप ठेवून ते निघालेच.
""येऊ?'' त्यांनी विचारले.
म्हणालो ""फुर्रर्र!!'' चाय पीए तो ऐसे!! क्‍यूं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com