राहून गेलेल्या गोष्टी! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang

मलबार हिल, बॉम्बे येथे काही कामासाठी गेलो असता आम्हाला तीन बत्ती नाक्‍यावरील हाटेलानजीक एक चुरगळलेला कागद दिसला. सदर कागद सरकारी होता हे आम्ही तत्काळ वळखले. आमची नजर जर्न्यालिझमचा कोर्स केलेल्या बहिर्जी नाईकाची!! कुणीही पाहात नाही असे पाहून आम्ही बुटाची नाडी बांधण्याच्या मिषाने खाली वाकून शहाजोगपणे तो कागदाचा बोळा उचलला. अशा कागदांमध्ये बातम्या दडलेल्या असतात, हे अनुभवाने आम्हाला माहीत झाले आहे. मलबार हिल परिसरात असे कागदाचे बोळे खूप सापडतात. (जिज्ञासूंनी हिंडून पाहावे!!) कां की या परिसरात अनेक मंत्र्यांचे बंगले असून चिक्‍कार सरकारी अधिकाऱ्यांची ये-जा चालू असते. अनेकांच्या फायलीतील कागदपत्रे या भागात अचानक गहाळ होतात. म्हणूनच ह्या तीन बत्ती नाक्‍यास "सरकारी बर्मुडा ट्रॅंगल' असे म्हटले जाते. असो.

लागलीच हाटेलात शिरून आम्ही एक रवा केसरी (ऊर्फ) शिरा, इडली-वडा मिक्‍स (सांबार अलग) अशी भक्‍कम आर्डर देऊन ऐसपैस बसलो. कागदाचा बोळा काढून सरळ केला. ओहो!! वांचून आम्हांस धक्‍का बसला!! कागदाखाली कुणाची सही नव्हती, परंतु मजकूर भलताच स्फोटक होता. गेल्या तीन वर्षांत राहून गेलेल्या गोष्टींची ती यादी होती, हे कोणीही सांगेल. ती यादीच आम्ही येथे देत आहो. ह्यावरून सदर यादीचा कर्ताधर्ता कोण हेदेखील चाणाक्षांच्या लक्षात येईल. पुन्हा असो. वाचा...

नमो नम: शपथ घेतल्याला आज तीन वर्षे झाली. तीन वर्षांत अनेक गोष्टी झाल्या, त्या टीव्ही आणि वर्तमानपत्रातली मुलाखतींमध्ये सांगूनही झाल्या. बऱ्याच राहून गेल्या, त्या विरोधक सांगताहेत!! तथापि, काही राहून गेलेल्या गोष्टी मात्र कोणालाच माहीत नाहीत. त्या येणेप्रमाणे :

1. तीन वर्षांपूर्वी शपथ घेताना नवे नमोजाकीट आणि नवा नमोकोट घातला होता. तीन वर्षांत तो पुन्हा अंगाला लागला नाही. त्यास पुन्हा पाणी लागावे अशी इच्छा आहे!!

2. एकेकाळी मी शर्टाच्या ब्रॅंडसाठी मॉडेलिंग करीत असे. एकदा नीट शर्ट प्यांट घालून सामान्य माणसासारखे हिंडायची इच्छा आहे!!

3. "बदन पे सिताऽऽरे लपेटे हुए...ओ जाऽऽने तमन्ना किधर जा रही हो...' हे महाराष्ट्राचे फेवरिट गीत म्हणून घोषित करायचे राहून गेले...

4. मुख्यमंत्री निवासातील खानसाम्यास चनापोहा कसे बनवावेत, हे शिकवणे जमले नाही!! शिकवणे आम्हाला जमले नाही आणि शिकणे त्याला!!

5. सलग एकाठेपी बारा सूर्यनमस्कार घालण्याची जबर्दस्त महत्त्वाकांक्षा अजूनही मनात बाकी आहे!!

6. विनोदजी तावडे ह्यांना तीनशे सूर्यनमस्कार घालण्याची शिक्षा ठोठावण्याचे राहून गेले...

7. आशिषजी शेलार ह्यांना एकदा तरी "गप्प बसा' असे सांगण्याचे धैर्य जमा करायचे आहे.

8. ज्या दिवशी प्रकाशजी मेहता ह्यांना ओळखही दाखवायची नाही असे ठरवतो, त्या दिवशी ते नेमके तीन तास गप्पा मारून जातात. हे कसे थांबवायचे?

9. नाथाभाऊ खडसेंना एकदा ""कधी येताय मुंबईला?'' असे उघडपणे विचारायचे आहे...

10. शेजारच्या प्रियदर्शिनी पार्कात सकाळी उठून जॉगिंगला जाण्याचे बेत रचले होते. एकदाही वेळेवर जाग आली नाही! एकदा उशीर झाला, तरी तसाच गेलो होतो. थोड्या वेळाने मागे वळून पाहिले तर सगळे मंत्रिमंडळ ट्रॅकसुटात धावतंय!! पुन्हा गेलो नाही!!

11. आख्खे एक दिवस लंघन करण्याचा इरादा पूर्ण होऊ शकला नाही...

12. जीव गोळा न होता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणाऱ्या सुरक्षित, नव्याकोऱ्या हेलिकॉप्टरमध्ये एकदा बसायचे आहे!

13. ताडोबाला जाऊन वाघांचे फोटो काढायचे राहून गेले!!

14. अर्थमंत्री सुधीरजी मुनगंटीवारजी ह्यांच्याकडे सध्या पैश्‍याचे सोडा, सुट्टे मागायचीही सोय उरलेली नाही. गृहस्थ अंगावरच येतो!! त्यांच्याबरोबर एकदा बसून राज्याच्या आर्थिक स्थितीवर खेळीमेळीने चर्चा करायची आहे. पैश्‍याचा विषय काढला की ते वाघावर बोलतात! वाघाचा विषय काढला की...जाऊ दे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com