भेट पॉलिटिक्‍स! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

त्रिवर्षपूर्तीच्या दिवाळीत पाडव्यानंतर नरकचतुर्दशी आल्यासारखा नोटाबंदीचा बर्थडे आला, हे तुमचे म्हणणे खरे आहे. नोटाबंदी म्हटले की माझे पित्त खवळते. पण जाऊ दे. तुमच्या सेलेब्रेशनमध्ये मी मीठाचा खडा कशाला टाकू? कळावे. आपला. उधोजी

प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. फारा दिवसात गाठभेट नाही. आपल्या सरकारला (आपल्या हं!) तीन वर्षे पूर्ण झाली, त्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन आणि आभार. तुमचा दृश्‍य हात आमच्या पाठीशी नसता तर तीन वर्षे निभली नसती, हे सत्य आहे. कुठेतरीच नेऊन ठेवलेला महाराष्ट्र आपण दोघांनी लायनीवर आणला. मी तुमची पाठ थोपटतो, तुम्ही माझी थोपटा. (थोपटा...धोपटा नव्हे!!) तीन वर्षे कशी गेली कळलेदेखील नाही. नागपूरहून मुंबईला आलो तेव्हा (तुम्ही सोडून) मला इथे कोणीही मित्र नव्हता. आता बराच दोस्ताना जमला आहे आणि तुम्ही बांदऱ्यातून निखळायला तयार नाही, अशी स्थिती!! शेवटी पत्र लिहावे लागत आहे...

गेल्या आठवड्यात आपण "सिल्वर ओक' ह्या ठिकाणी घड्याळवाल्या थोरल्या साहेबांना भेटून आल्याचे कळले. आमची मंडळी काळजीत पडली आहेत. तुम्हाला फोन लावत होतो. लागला नाही!! शेवटी थोरल्या साहेबांनाच बिचकत बाचकत फोन केला. त्यांनी नेहमीप्रमाणे विचारले, ""काय काम काढलं?'' मी विचारले, ""काम काही नाही!! पण आमचे मित्र तुमच्याकडे येऊन गेले म्हणे! काही विशेष?''

"" छे, विशेष कुठलं? फोटोचे आल्बम घेऊन दाखवायला आले होते..,'' थोरले साहेब म्हणाले.
""आल्बम?'' मी बुचकळ्यात पडून विचारले.
""हं...आल्बमच. वाघाचे फोटो काढताना फोकस कसा ठेवावा, ह्याचं मार्गदर्शन मी त्यांना केलं. फोटोग्राफीत टायमिंग महत्त्वाचं असतं..,'' साहेबांनी खुलासा केला. माझे समाधान झाले.
""मी पण येऊ का...भेटायला?'' मी विचारले.
""कशाला? गेल्या आठवड्यात "सह्याद्री' अतिथीगृहात भेटलो नव्हतो का आपण?!,'' साहेबांनी प्रतिप्रश्‍न करून फोन ठेवून दिला. जाऊ दे झाले! माणसाने एकमेकांना भेटत राहिले पाहिजे एवढे मात्र खरे आहे.
...तीन वर्षांच्या पूर्तीचा सोहळा, त्यात आज नोटाबंदीचा वाढदिवस आला!! हे म्हणजे दिवाळीत पाडव्यानंतर नरकचतुर्दशी आल्यासारखे!! हो की नाही? पुन्हा अभिनंदन आणि आभार.
आम्हालाही भेटायला येत जा कधी कधी!! कळावे. आपला. नाना.
* * *
नानासाहेब-
तुमच्या (तुमच्या हं!) सरकारने तीन वर्षे पूर्ण केली, हे कळल्याने बहुत आनंद झाला. अभिनंदन! आम्ही इतके प्रयत्न करूनही तुम्ही तीन वर्षे टिकलात ही तुमची कमालच आहे. तुमची (होय, तुमची, तुमची, तुमची!!!) त्रिवर्षपूर्ती तुम्हाला लखलाभ असो. आम्ही तीन वर्षे एका हाताने शेकहॅंड केला आणि दुसऱ्या हातात सॅंडल धरला. त्यामुळे आम्हाला तुम्ही ह्यात न ओढलेले बरे. फुकटचे श्रेय खायची आम्हाला सवय नाही. होय, मी गेल्या आठवड्यात "सिल्वर ओक'ला गेलो होतो. थोरल्या साहेबांना भेटलो. चांगला दोन तास तिथे होतो!! थोरल्या साहेबांबरोबर दोन तास भेट झाली की त्याची बातमी होणारच. इतके की त्यांचे सहकारी प्रफुल्लभाई मला नंतर म्हणाले, ""एवढा वेळ तर साहेब आम्हाला पण देत नाहीत!!'' पण त्यात काही नवीन नाही. मी तरी आमच्या पक्षाच्या लोकांना इतका वेळ कुठे देतो? पाच मिनिटांत उभ्या उभ्या विषय संपवतो!! बाकी माझ्या आणि साहेबांच्या भरपूर विषयांवर गप्पा झाल्या. मी त्यांना वाघांच्या फोटोचा आल्बम दाखवला. त्याबदल्यात त्यांनी मला लिंबूसरबत दिले. काही असले तरी ते आमचे जुने काका आहेत!!

त्रिवर्षपूर्तीच्या दिवाळीत पाडव्यानंतर नरकचतुर्दशी आल्यासारखा नोटाबंदीचा बर्थडे आला, हे तुमचे म्हणणे खरे आहे. नोटाबंदी म्हटले की माझे पित्त खवळते. पण जाऊ दे. तुमच्या सेलेब्रेशनमध्ये मी मीठाचा खडा कशाला टाकू? कळावे. आपला. उधोजी.

ता. क. : तुम्हाला खरे कारण सांगूनच टाकतो. लपवाछपवी आपल्याला जमत नाही...गेल्याच्या गेल्या आठवड्यात तुम्ही आणि थोरले साहेब ह्यांची "सह्याद्री'वर भेट झाल्याचे मला कळले होते. त्याबद्दल माहिती काढण्यासाठी मी "सिल्वर ओक'वर जाऊन आलो, एवढेच. आता झाले समाधान? कळावे. उ. ठा.

Web Title: dhing tang article