भुयारमार्गे दरोडा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी 
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

साहेब, नोटाबंदी झाल्यानंतर लोकांना रांगेत फार काळ उभे राहावे लागले, त्याचा हा परिणाम आहे. ब्यांकेत आपलेच पैशे काढण्यासाठी जाम टाइम खोटी होतो. ज्यास्त पैशे काढायला गेले की क्‍याशर डोळे वटारून प्यान कार्ड मागतो. कमती काढायला गेले तर एटीएममध्ये जावा असे सांगतात. मानसाने काय करावे? सदर दरोडा हा नोटाबंदीचा परिणाम आहे, हे सत्य आहे. 

डिअरम डिअर 
नानासो फडनवीस, 
मा. होम्मिनिष्टर (नागपूरवाले) 
मंत्राले, बॉम्बे बीट 
विशय : न्यू बॉम्बेतील ब्यांकेतील भुयाराबद्धल गुप्त टिप. 

सरसाहेब, मी पो. ह. बबन फुलपगार (कदकाठी 5 फू. 5 इं, वजन 48, बक्‍कल नं. 1212) नशापाणी न करता हे लिहत आहे की, नवी मुंबई येथे एका ब्यांकेवर दरोडा पडला असून, भुयारातून काही अज्ञात संशयित चोरट्यांनी मुद्देमाल पळवल्याचे निष्पण्ण झाले आहे. ब्यांकेतील तीस लॉकरमधला मुद्देमाल गायब झाला असून, त्याचे धागेदोरे सापडलेले नाहीत. सदर दरोडा नेमका कधी पडला, हे पन अद्याप कळू शकलेले नाही. आपल्या लॉकरमधून चीजवस्तू गायब झाल्याचे कळल्याने ब्यांकेचे खातेदार गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिस ठाण्यात रांग लावत आहेत.

मी स्वत: लोकांना ""हे काय एटीएम आहे का? हे पोलिस ठाणे आहे,'' असे सांगूण बघितले. पन रांग कमी व्हावयास तयार नाही. सबब परिस्थिती हाताबाहेर जात असून आपन जातीने कार्यवाही करावी, ही रिक्‍वेष्ट करण्यासाठी सदर निवेदण लिहत आहे. मी बबन फुलपगार नशापाणी न करता व नम्रपने हे जाहीर करतो की मी डिपारमेंटमधील एक नंबरचा डिक्‍टेटिव असून चोरांची पावले आपल्याला बरुब्बर वळखता एतात. सबब ह्या प्रकरनाचा तपास माझ्या सर्मथ आखत्यारीत दिल्यास चौवीस घंट्यात गुन्हेगारांना आपल्यासमोर हाजिर करणेत येईल, ह्याची ग्यारंटी मी देत आहे. 

ह्या प्रकरणाची डिटेलवार हकिगत अशी ः न्यू बॉम्बेतील नामे ब्यांकॉप बरोडा ह्या आस्थापणेतील म्यानेजरने सकाळच्या पारी मजबूत बोंब ठोकली व ब्यांक फुटल्याचे डिक्‍लेर केले. ब्यांकेच्या नजीक अदमाशे सत्तर कदमांवर पूर्वेकडे बालाजी फरसाण मार्ट होते व सदर दुकानात फरसाण, शेव-गाठी, चिवडा आदी चखण्याचा माल विक्री होत असे. मानसे चखणा घेण्यासाठी दिवसाकाठी येत असत. सांजच्या वेळेला चखण्याची जास्त जरुरत असते, पण तेव्हा ब्यांक बंद असे. अशा टायमाला सदर दुकानाच्या मालकाने आपल्या नौकरांकरवी सत्तर कदमांचे भुयार खणून घेतले व ब्यांकेत रॉंग साइडने एण्ट्री घेतली. 

साहेब, नोटाबंदी झाल्यानंतर लोकांना रांगेत फार काळ उभे राहावे लागले, त्याचा हा परिणाम आहे. ब्यांकेत आपलेच पैशे काढण्यासाठी जाम टाइम खोटी होतो. ज्यास्त पैशे काढायला गेले की क्‍याशर डोळे वटारून प्यान कार्ड मागतो. कमती काढायला गेले तर एटीएममध्ये जावा असे सांगतात. मानसाने काय करावे? सदर दरोडा हा नोटाबंदीचा परिणाम आहे, हे सत्य आहे. 

सदर भुयार आयते भेटले असून ते बुजवू नये. त्याच्या एंडिंगला एक एटीएम मशिन बसवावे, अशी माझी शिफारस आहे. येवढे मोठे भुयार खणून कुणाला पत्ता लागला नाही. येवढी उकरलेली माती कुठे टाकली, कुणाला आयडिया नाही. खणाखणीचा आवाज नाही की आरडाओरडा नाही. कुठलाही आवाज न करता शांतपने भुयार खोदनाऱ्या ह्या इल्लमबाज चोरांनाच "मेट्रोचे' काम दिले तर कमी टायमात भरपूर बोगदे खणून होतील, असे वाटते. सध्या मेट्रोच्या कामामुळे बॉम्बेमध्ये हालत बेकार झाली असून आवाजामुळे लोक हैरान झाले आहेत. आवाज रोखता यत नसेल तर काम बंद करा, असे कोर्टानेही सांगितले आहे. अशा परस्थितीत सदर दरोडेखोरांना पकडून त्यांना बोगदे खणायचे कॉन्ट्रॅक दिले तर सक्‍तमजुरी आणि मेट्रोचे काम दोन्ही होऊन जाईल. क्रुपया विच्यार व्हावा. 

सदर भुयाराची माती गुन्हेगारांनी मेट्रोच्याच कामाच्या ठिकाणी जमा केली असावी, अशी आपली खबर आहे. तेव्हा अर्जंटमध्ये डिसिजन घेऊन आपल्याकडे तपास वर्ग करावा, ही विनंती. कळावे. आपला आज्ञाधारक. बबन फुलपगार (ब. न. 1212) 
ता. क. : सदर ब्यांकेचा भुयारमार्गे दरोडा हा दरोडा आहे की घरफोडी? दोन्हीची कलमे वेगळी आहेत. क्रुपया डिसिजन घेणे. ब. फु.

Web Title: Dhing Tang article