पांचावर धारण..! (ढिंग टांग!)

पांचावर धारण..! (ढिंग टांग!)
स्थळ : एक अज्ञात बंगला, मलबार हिल.
वेळ : आता वाजले की बारा!
काळ : घोरणारा!
पात्रे : कोअर कमिटीची कमळ मेंबरे.

फडणवीसनाना : (चिंताग्रस्त चेहऱ्यानं उसासा टाकत)...पंचवीस पाचा किती होतात हो?
ुमुनगंटीवारजी : (मोबाइलमध्ये आकडेमोड करत) पंचवीस गुणिले पाच बरोबर....दोनशे पन्नास फक्‍त!
शेलारमामा : (चिडून) कुणी केलं हो तुम्हाला अर्थमंत्री? सव्वाशे कोट होतात फक्‍त!!
चंदुदादा कोल्हापूरकर : (विषय गुंडाळत) जाऊ द्या ना, नानासाहेब! काय होणाराय आकडेमोड करून! उगीच उंटाच्या शेपटीचा मुका घ्यायला जा कशाला?
मुनगंटीवारजी : (घाईघाईने) उंट मरू दे! एवढ्या पैशात मी महाराष्ट्रभर पंचवीस लाख झाडं लावीन आणि वाघांची संख्या दहा हजारांवर नेईन!! मी वनमंत्री आहे, हे विसरू नका!! आकडेमोड चुकली म्हणून काय झालं...
वीर विनोद : (हट्‌टाला पेटून) असं कसं? आकडेमोड करेक्‍टच हवी! शेवटी ह्या आरोपाला आपण सडेतोड उत्तर द्यायला हवं आहे!! कोणीतरी उठून वाट्‌टेल तसे आरोप करतात, आणि आपण ऐकून घ्यायचं? ते काही नाही, सुधीरभाऊ तुम्ही हिशेब कराच पुन्हा!! आरोप गंभीर आहे!!
चंदुदादा : (चष्मा पुसत) पण कोण करतंय आरोप? त्याला काही अर्थ आहे का? अहो, हे सगळं हास्यास्पद आहे...आपण हसून मोकळं व्हावं! त्यावर इतका काथ्याकूट कशाला?
फडणवीसनाना : (पोक्‍तपणाने) आरोप हास्यास्पद असला तरी गंभीर आहे!
शेलारमामा : (री ओढत) गंभीर आहेच, त्याला करारा जबाब देना हमारा...हमारा...कर्तव्य हय!! ज्या लोकांनी मंडईत कांदे उचलावेत, तसे नगरसेवक उचलले, त्यांनी हे बोलावं? जिनके पाय के तळ में क्‍या जळता है वो बिना देखे दुसरे के पावं के नीचे...
फडणवीसनाना : (कळवळून) नको हो तुमचं बंबय्या हिंदी! आणि सतत ते टीव्हीला बाईट देणं कमी करा!! तुमच्यापायी आम्हा नागपूरकरांचा जीव जातो!! (शांत होत)...बरं ते जाऊ दे! पाच कोटी पर हेड म्हंजे झाले किती एवढाच माझा सवाल आहे!!
मुनगंटीवारजी : (अभिमानाने) जीएसटीचा स्लॅब ठरवावा लागेल! बॅंकवाल्यांची मीटिंग बोलवावी लागेल! शिवाय दिल्लीला क्‍वेरी पाठवावी लागेल! बरीच प्रक्रिया आहे!!
फडणवीसनाना : (हताशेने मान हलवत) चंदुदादा हा काय शब्द देऊन बसलात?
चंदुदादा : (आश्‍चर्यानं) अरेच्चा!! मी कुठलाच शब्द दिलेला नाही! अहो, हे सगळं कपोलकल्पित आहे! निदान तुम्ही तरी असं म्हणू नका!!
शेलारमामा : (दात ओठ खात) मुंबईचे नगरसेवक ज्या रेटमध्ये उचलले, तोच रेट त्यांनी कायम ठेवलाय!! हा समस्त आमदारांचा अपमान आहे!! पाच कोटी पर हेड!! शी:!! हे चालू देता कामा नये!!
वीर विनोद : (बोटं मोडत) पाच कोटी अपफ्रंट प्लस इलेक्‍शनचा खर्च प्लस बदल्यांची कामं!! गणित बरंच पुढे जातं मामाजी!! करा हिशेब!!
मुनगंटीवारजी : (पुन्हा आकडेमोड करत) पुन्हा सांगा बरं! हे तं वेतन आयोगापेक्षा वरचं प्रकरण दिसतंय! अशानं वर्ल्ड ब्यांकेकडून पुन्हा कर्ज काढावं लागेल!!
फडणवीसनाना : (सबुरीनं घेत) कोण पैसे द्यायला बसलंय इथं सुधीरभाऊ! आहेत कोणाकडे एवढे पैसे! होते, त्यांचेही नोटाबंदीत गेले!! ह्या उगीच पुड्या सोडणं चाललंय!! फार मनावर घेण्याचं कारण नाही!!
वीर विनोद : (हतबुद्ध होत) आरोप गंभीर आहे, असं आत्ताच म्हणालात ना?
चंदुदादा : (मखलाशी करत) आपण जाहीर करू की होय, ही आमची खुली ऑफर आहे, पण आधार कार्ड कंपल्सरी असून पॅन कार्ड डिटेल्स देणाराच सदर योजनेला पात्र असेल!!..कुछ समझे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com