महामुलाखत : पुष्प दुसरे! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

लोकांनी उघडपणे पाहिली ! चोरून पाहण्याच्या मुलाखती वेगळ्या असतात ! माझ्या मुलाखतीवर लोक फिदा आहेत, फिदा ! काल पुण्याच्या सुधीर गाडगीळांचाही फोन येऊन गेला... म्हणाले, तुम्ही ह्या धंद्यात उतरलात तर आम्ही कुठं जायचं?

(अर्थात, पुन्हा सदू आणि दादू)

दादू : सदूऽऽऽ...
सदू : अंऽऽऽ...
दादू : अरे, मी भाऊ आहे ना तुझा?
सदू : हो, दादूराया!!
दादू : मग का रे असा वागतोस सूडकऱ्यासारखा?
सदू : आता काय केलं मी? रोजगाराच्या नवनव्या संधी शोधणाऱ्या माणसाला सूडकरी म्हणतात का?
दादू : तू जे काही पुण्यात केलंस, त्याला मराठी माणूस कदापि माफ करणार नाही !
सदू : महामुलाखतीबद्दल म्हणतो आहेस? पण ती तर उभ्या महाराष्ट्राला आवडली ! आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते : गेल्या दहा हजार वर्षांत अशी मुलाखत झाली नाही !!
दादू : सकाळी उशिरा उठत होतास तेच बरं होतं ! तुझा घड्याळाचा गजर बंद कर पाहू !
सदू : तुझा नेमका आक्षेप कशाला आहे? मुलाखतीला की माझ्या घड्याळाच्या गजराला?
दादू : दोन्हीला ! सदूराया, तू लौकर उठायला लागल्यामुळे तुझा फावला वेळ हल्ली वाढला आहे !! वेळीच आवर स्वत:ला !!
सदू : माझ्या घड्याळाशी तुझं इतकं का वैर?
दादू : तुला काही वाटलं नाही का रे "त्यांची' मुलाखत घेताना?
सदू : कोणाची?
दादू : त्यांची ! मीसुद्धा नावं घेत नाही... त्यांच्यासारखीच!
सदू : वाटलं ना... आनंद वाटला ! दोन पिढ्यांमधला महासंवाद होता तो !!
दादू : काळीज नाही का रे तुला?
सदू : तुझ्या का इतकं पोटात दुखलं?
दादू : माझ्या हृदयात दुखलं ! पोटात नाही !! मुलाखतीचं म्हणशील तर दरवर्षी माझी मॅरेथॉन मुलाखत वर्तमानपत्रात तीन भागांत प्रसिद्ध होते !! तासभराच्या मुलाखतीनं माझ्या पोटात का दुखावं?
सदू : त्या मुलाखतीला काय अर्थ आहे? पुण्यात हजारो माणसांच्या साक्षीनं घेतली मी मुलाखत ! त्यासाठी भरपूर अभ्यास केला !
दादू : इतका अभ्यास आधी केला असतास तर व्यंग्यचित्रं काढण्याची वेळ आली असती का?
सदू : फोटो काढणाऱ्या माणसानं व्यंग्यचित्रांना हसू नये !
दादू : कसली तुझी ती मुलाखत ! आदल्या दिवशी पेपर फोडून परीक्षेला बसण्यात काय पॉइण्ट आहे?
सदू : रोज दरबारात हजर राहणाऱ्या माणसाला म्यारेथॉन मुलाखत घ्यायला लावून ती सलग स्वत:च्याच पेपरात छापण्यात तरी काय पॉइण्ट आहे?
दादू : मी तुझी मुलाखत चोरूनसुद्धा पाहिली नाही !
सदू : लोकांनी उघडपणे पाहिली ! चोरून पाहण्याच्या मुलाखती वेगळ्या असतात ! माझ्या मुलाखतीवर लोक फिदा आहेत, फिदा ! काल पुण्याच्या सुधीर गाडगीळांचाही फोन येऊन गेला... म्हणाले, तुम्ही ह्या धंद्यात उतरलात तर आम्ही कुठं जायचं?
दादू : ज्यांनी तुझ्या काकांना जेलात पाठवायचा घाट घातला, त्यांची मुलाखत घेतलीस ! कुठे फेडशील हे पाप? दोन पिढ्यांचा संवाद म्हणे !! हू: !!
सदू : होताच तो दोन पिढ्यांचा संवाद ! त्याचं किती टेन्शन आलं होतं मला !! जनरेशन ग्याप नावाची गोष्ट असतेच ना !!
दादू : दोन पिढ्यांचा संवाद साधायला तुला पुण्याला जावं लागलं? मुंबईत काय पिढ्या नाहीत?
सदू : मग मी कोणाची मुलाखत घ्यायला हवी होती?
दादू : आमच्या आदित्यची घ्यायचीस !! आम्ही सहा भागांत छापली असती !!
सदू : क्‍काय?
दादू : येस, आदित्यचीच ! दोन पिढ्यांमधला संवाद झालाच असता ना !!
सदू : मी ठेवतो फोन ! जय महाराष्ट्र!!

Web Title: dhing tang article