ढिंग टांग : एका रिक्षावाल्याची गोष्ट

ढिंग टांग : एका रिक्षावाल्याची गोष्ट

एका रिक्षावाल्याची ही कहाणी आहे. मुंबईसारख्या महानगरात अनेक माणसे पोट भरण्यासाठी येतात. बहुसंख्य श्रमिक आणि चाकरमान्यांचं हे शहर. काही मेहनती श्रमिकांनी घाम गाळून मुंबई उभी केली. स्वत:चा उत्कर्ष साधत मोठमोठ्या हवेल्या बांधल्या. गगनचुंबी इमारतींमध्ये संपन्न आयुष्य व्यतीत केले. अशा कितीतरी यशोगाथा या महानगरात सापडतील. एका साध्यासुध्या रिक्षावाल्याचा मंत्री झाल्याच्या घटनादेखील या नवलनगरीने ऐकल्या, पाहिल्या, अनुभवल्या. परंतु आम्ही जी कहाणी सांगणार आहोत, ती वेगळ्याच रिक्षावाल्याची. तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आणि मग रिक्षावाला झाला!

तुम्ही म्हणाल, याला काय अर्थय? मुख्यमंत्र्याचा रिक्षावाला कसा काय होईल? पण तीच तर गंमत आहे.

...बांदऱ्याच्या एका दुर्लक्षित उपनगरात कलानगर नावाची अतिशय गरीब वस्ती होती. तिथे रिक्षावाल्याची झोपडी होती. पण तो सुखी होता. ‘पाहून सौख्य माझे, देवेंऽऽद्र तोहि लाजे, शांति सदा विराजे...या झोपडीत माझ्याऽऽ...’ असे तो समाधानाने गुणगुणत असे. गरीब वस्तीत आपला कथानायक राहात असे. माणूस कमालीचा स्वाभिमानी आणि सज्जन. कुणाच्या अध्यात ना मध्यात, असा अजातशत्रू स्वभाव. त्याचा कमलाकर नावाचा एक मित्र होता. ‘तो लुच्चा आहे,’ असे अनेकांनी सांगूनही रिक्षावाल्याने त्याची साथसंगत सोडली नव्हती. कमलाकर त्याला नेहमी उत्कर्षाची स्वप्ने दाखवत असे. पण स्वप्ने बघून का कुणाचे पोट भरते? 

आपणही पोटापुरते कमवावे आणि कोरभर भाकरी मिळवून अभिमानाने जगावे, असे त्याला वाटू लागले. पण काय करावे? एक ऑटोरिक्षा घ्यावी आणि टुकीने व्यवसाय करावा, असे त्याने ठरवले. पण रिक्षा घ्यायला पैका लागतो. तो कुठून जमवावा? त्याने जुन्या मित्राकडे, कमलाकरकडे हक्‍काने मदत मागितली. पण कमलाकर म्हणाला, ‘‘अरे य्यार! पहले बोलनेका था ना...तू छोड रिक्षे का नाद, मेरे साथ चल, तेरा काम चल जायेगा!’’ 

...पण स्वाभिमानी रिक्षावाल्याने ऐकले नाही. त्याने सरळ बारामतीच्या पतपेढीकडे कर्जासाठी रीतसर अर्ज केला. पतपेढीच्या साहेबांनी दिलदारपणे बिनव्याजी कर्ज देऊ केले. साहेबांच्या एका दिल्लीवाल्या मित्राने खटपट करून परमिट मिळवून दिले! अशा रीतीने त्याच्या घरी वाहन आले...

नवीकोरी रिक्षा दारात उभी राहिली, तेव्हा घरची दोन्ही मुले आनंदाने नाचू लागली. ‘आदित्य’ आणि ‘तेजस’ अशी नावे रिक्षाच्या मागे रंगवून घ्यावीत, असा रिक्षावाल्याला मोह पडला. पण पतपेढीचे साहेब म्हणाले, की ‘हायपोथिकेटेड टु बारामती’ असे लिहिणे बंधनकारक आहे! रिक्षावाल्याचा हिरमोड झाला... पण थोडासाच!

त्याची तीन चाकांची रिक्षा मुंबईभर फिरू लागली. घर सुखी झाले. 

कमलाकरला मात्र आपल्या जुन्या मित्राचा उत्कर्ष पाहवत नव्हता. एक दिवस तो कुत्सितपणे म्हणाला, ‘‘मेरे साथ रहता तो आज बुलेट ट्रेन में फिरता... ही काय डबडा रिक्षा घेतलीस? वर डोक्‍यावर कर्ज! कसं फेडणार?’’ रिक्षावाला काही बोलला नाही.

‘‘तुझ्या या रिक्षाची तीन चाकं तीन दिशांना धावतात. कुठं जाणार कुणास ठाऊक!’’ कमलाकरने अजून डिवचले. मग मात्र रिक्षावाल्याला राहवले नाही.

‘‘असू दे आमची तीन चाकी रिक्षा! तुमच्या महागड्या बुलेट ट्रेनपेक्षा बरी! धट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती!! कळलं?’’ स्वाभिमानी रिक्षावाल्याने त्याला सुनावले.

...मग ऐटीत रिक्षात बसून त्याने फटर्र करून हॅंडल ओढले आणि झोकात वळण घेऊन तो दिसेनासा झाला. कमलाकर त्याच्याकडे थक्‍क होऊन पाहात राहिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com