ढिंग टांग :  देवगिरीचा वेढा! 

Devgiri
Devgiri

टु हूम सो एव्हर इट मे कन्सर्न...
नागपूर येथील महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान जे की ‘देवगिरी बंगला’ याची देखभाल व दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास गेले असून, सोबत कामात झालेल्या खर्चाचा तपशील जोडत आहे. अनुज्ञापित. क. अभियंता, सा. बां. वि. नागपूर डिव्हिजन.
* * *
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, सप्रेम जय महाराष्ट्र. विनंती विशेष. औंदा पहिल्यांदाच आपण (अधिवेशनानिमित्त) नागपूर येथे राहायला येत आहा, आपले स्वागत असो. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘रामगिरी’वर आपला मुक्‍काम राहणार आहे की (नेहमीप्रमाणे) रॅडिसनवर हे अद्याप अधिकृतपणे कळू शकलेले नाही. कुठेही राहा! काही प्रॉब्लेम नाही. ‘रामगिरी’ आपल्यासाठी नेहमीच सुसज्ज आहे, हे ध्यानी असू द्या. आठवडाभराचाच तर प्रश्‍न आहे. मुंबई-नागपूर टु अँड फ्रो करायलाही हरकत नाही! बघा, जमेल तसे करावे!

‘रामगिरी’चा विषय नाही, परंतु ‘देवगिरी’ बंगल्यात कोण राहणार, हा खरा महाराष्ट्रापुढला गहन विषय आहे. ‘देवगिरी’चाही कायापालट पूर्ण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असला तरी यंदा तेथे कोण जाणार हे न ठरल्याने पोलिटिकल क्रायसिस म्हणतात, तसा तूर्त झाला आहे. हा क्रायसिस सोडवण्यासाठी मी तिथे राहायला जायला तयार आहे!! बघा, जमते आहे का? म्हंजे खरे तर जमवाच. अधिक काय लिहू? नेहमीच आपला. छ. भु.
* * *
सीएमसाहेब. जय महाराष्ट्र. नागपुरात स्वागत! अधिवेशनासाठी इथल्या हिवाळी अधिवेशनात मजा येते. महाराष्ट्राची निम्मी कामे इथेच होतात, गंमतही होते. थंडी बरी पडली आहे. स्वेटर आणला ना? नसेल तर दोन पाठवतो. स्वीकार करावा. आपण ‘रामगिरी’वर पहिल्यांदाच राहणार आहात. - हो ना? छानदार बंगला आहे, फक्‍त पाली फार आहेत. रात्री झोपण्यापूर्वी बंदोबस्त करून घ्यावा. 

‘देवगिरी‘ बंगला कोणाला राहायला देणार, हे ठरले का? नसेल तर तो मला मिळेल का? याची चौकशी ‘देवगिरी’वर राहायची माझी नक्‍कीच तयारी आहे. जमल्यास मला तो ॲलॉट करावा, ही विनंती. (मी पालींचे औषध आणले आहे. काळजी नसावी.) त्या बंगल्यात राहण्याचे मी फारा वर्षांपासून ठरवतो आहे. बाकी भेटीअंती बोलूच. आपलाच जयंत्राव पा.

* * *
एकमेव महाराष्ट्र हृदयसम्राट थोर नेते आणि अत्यंत माननीय प्रार्थनीय श्रीमान उधोजीसाहेबांना मानाचा मुजरा! साहेबकामी हा ठाण्याचा ढाण्या वाघ रुजू झाला असून, खांद्यावर पडलेल्या प्रत्येक जबाबदारीला प्रामाणिकपणे सामोरा जाईन, असा बेलभंडार उचलला आहे. आपण द्याल ती कामगिरी आणि द्याल तो देवगिरी!! तथापि, गेली काही वर्षे मी नागपूरला गेलो की ‘देवगिरी’ बंगल्याकडे चक्‍कर टाकून येत असे. एक ना एक दिवस मी या बंगल्यात राहून दाखवीन, असे मी वचन (कोणालातरी) दिले आहे, साहेब! म्हणून औंदा मला ‘देवगिरी’ बंगल्यावर आठवडाभर राहू द्यावी, ही कळकळीची विनंती. आपला कडवट सैनिक. भाई शिंदे. (ठाणे)

* * *
सचिव, सा. बां. वि. महाराष्ट्र राज्य,
नागपूर येथील ‘देवगिरी‘ बंगल्याची दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्याचे समजले. सदरील बंगल्यात येत्या अधिवेशन काळात कोणालाही राहावयास देऊ नये, असे निर्देश देण्यात येत आहेत. आठवडाभरासाठी तेथे पेस्ट कंट्रोलचे काम चालू असल्याचे जाहीर करून टाकावे व विषय तूर्त टाळावा, असे आदेश मा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झाले आहेत. 

- सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com