ढिंग टांग : एक्‍झिट पोलनंतरचे पोल!

ब्रिटिश नंदी
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

एक्‍झिट पोलमध्ये एका च्यानलाने तर २८८ पैकी दीड- दोन डझन जागा तेवढ्या अन्यांसाठी देऊन बाकी सर्व दान कमळ-धनुष्यबाणाच्या पारड्यात टाकून दिले होते.

निवडणुकीचे मतदान कधी संपते, आणि विविध वाहिन्यांवर आम्ही एक्‍झिट पोल पाहणीचे निकाल कधी बघतो, असे आम्हाला झाले होते. अखेर सायंकाळचे सहा वाजले आणि आम्ही स्वत:शीच मोठ्यांदा म्हणालो, ‘‘हीच ती वेळ!’’ एक्‍झिट पोलचे निकाल जाहीर झाले!

ते पाहून आम्ही दोन्ही हातांची पाच दुणे दहा बोटे कमळकळीसारखी जोडून सर्व बोटांचा पाचुंदा तोंडातच घातला! एक्‍झिट पोलमध्ये एका च्यानलाने तर २८८ पैकी दीड- दोन डझन जागा तेवढ्या अन्यांसाठी देऊन बाकी सर्व दान कमळ-धनुष्यबाणाच्या पारड्यात टाकून दिले होते. कमी अधिक फरकाने सर्वच पाहण्यांमध्ये हाच कौल दिसत होता. हा कौल मेरिट (पक्षी : गुणवत्तेवर) आधारित असल्याचे ठामपणे सांगण्यात आले. आम्ही च्याटंच्याट पडलो. निवडणुकीनंतर प्राय: मतांचा कौल तपासण्यासाठी एक्‍झिट पोल घेण्याची पद्धत पडून गेली आहे. त्यामुळे निकाल आधी कळतोच, पण टीआरपीचे गणितही बऱ्यापैकी जमून जाते, हा साधासोपा हिशेब! परंतु एक्‍झिट पोलनंतरचे पोल कोणीही घेतल्याचे आमच्या आजवर ऐकिवात नाही. हा पायंडा आपणच कां पाडू नये, या इराद्याने आम्ही पाऊल उचलले. (खुलासा : पायंडा पाडण्यासाठी पाऊलच उचलावे लागते. असो!) त्यानुसार आम्ही विविध पुढाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन ए. पो. नंतरचे पो. घेतले.

सर्वप्रथम आम्ही राष्ट्रवादी कांग्रेसच्या राहुट्यांमध्ये गेलो. तेथे खुर्च्यावाला कंत्राटदार खुर्च्या एकात एक घालून ‘बिल कोण देणार आहे?’ याची चवकशी करत होता. तेथे आम्हाला मा. भुजबळसाहेब भेटले. ते म्हणाले, ‘‘त्याचं असं आहे की हे जे एक्‍झिट पोल जे आहे, त्याच्यावर विश्‍वास जो ठेवावा लागतो, त्याला काही, ज्याला अर्थ म्हणतात, तो नाही. निकाल जो आहे, तो वेगळा लागेल.’’

‘खुर्च्यांच्या बिलाचे काय?’ असे त्यांना विचारताच त्यांनी ‘कार्यालयात विचारा’ असे सांगून राहुटीकडे बोट दाखवले. तोवर तेथला तंबू उखडला गेला होता.

तेथून आम्ही कांग्रेस मुख्यालयात आलो. तेथे तर खुर्च्या, टेबले केव्हाच उचलून नेण्यात आली होती. तेथे मा. बाळासाहेब थोरातजी एकटेच हाताची घडी घालून उभे होते. पेढ्यांची ऑर्डर रद्द करायला त्यांनी तेवढ्यात कोणाला तरी सांगितलेले आम्ही ऐकले. आम्ही त्यांच्यासमोर गेलो, आणि आमच्या ए. पो. नं.च्या पो.बद्दल विचारले. एक पत्रकार आपल्याला (याही परिस्थितीत) प्रश्‍न विचारू इच्छितो, या कल्पनेने आधी त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आमचा एक्‍झिट पोलसंदर्भातील प्रश्‍न अर्धवटच ऐकून त्यांनी पटकन (हाताची घडी सोडून) शेजारून जाणाऱ्या मा. पृथ्वीबाबाजी चव्हाण यांच्याकडे बोट दाखवले. पण बाबाजींनी तेथून घाईघाईने एक्‍झिटच घेतली. असो. 

तेथून आम्ही बांदऱ्याला जायला निघालो. बांदऱ्याला जाताना मध्ये दादर लागते. म्हणून तेथे आधी गेलो. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे शिल्पकार मा. चुलतराजसाहेब यांना भेटून समक्ष भेटावे, असे मनात होते. पण भेट मिळाली नाही. ‘पुढल्या महिन्यात या’ असा निरोप तेवढा मिळाला.

तेथून बांदऱ्याला पोचलो. पाहतो तो काय! ‘मातोश्री’वर मा. उधोजीसाहेब आणि मा. फडणवीससाहेब असे दोघेही भेटले. दोघेही गंभीर होते. त्यांना म्हणालो : ‘‘अहो, एक्‍झिट पोलमध्ये २८८ पैकी अडीचशे सीटा तुम्हालाच आहेत. चेहरा कां टाकता?’’

त्यावर मा. फडणवीससाहेब म्हणाले : ‘‘उरलेल्या अडोतीस सीटा कशा आणि कुठे गेल्या? याचा विचार करतोय.’’

मेरिट म्हंटात ते हेच बरं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing Tang article Exit poll