ढिंग टांग : सर्व काही छान छान!

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

‘हौडी मोदी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही ह्यूस्टन येथील एनार्जी स्टेडियमच्या ब्याकस्टेजला उभे होतो. आमचे एकमेव तारणहार आणि विश्‍वगुरू श्रीमान मोदीजी यांची एण्ट्री होण्यास थोडा काळ बाकी होता.

‘हौडी मोदी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही ह्यूस्टन येथील एनार्जी स्टेडियमच्या ब्याकस्टेजला उभे होतो. आमचे एकमेव तारणहार आणि विश्‍वगुरू श्रीमान मोदीजी यांची एण्ट्री होण्यास थोडा काळ बाकी होता. भरगच्च स्टेडियमला सामोरे जाण्यापूर्वी आपण एण्ट्री कशी घ्यावी, याचा सल्ला मोदीजी आम्हाला विचारीत होते. आम्हाला सांगणे भागच होते, कारण आम्ही या क्षेत्रातले माहीर आहो!! इव्हेंट म्हटले की आम्हाला खून चढतो. माणसाने निमित्ते शोधून शोधून इव्हेंट करावेत, या मताचे आम्ही आहोत. 

साहजिकच, ‘हौडी मोदी’ या कार्यक्रमाच्या आयोजनात आमचा थोडासा, म्हंजे बराचसा, म्हंजे खूपसा म्हंजे जबरदस्त असा वाटा होता, हे सांगणे नलगे. कार्यक्रमाच्या प्रारंभीच मा. मोदीजींनी आमच्यापुढे ‘एण्ट्री’चा विषय मांडला. आम्ही कान खाजवून मेंदूस चालना दिली. एण्ट्री कशी घ्यावी? हा खरोखर चिंत्य सवाल होता. 

‘‘तुम्ही ना, गिटार हातात घेऊन मंचावर या!,’’ आम्ही सल्ला दिला. मोदीजींनी एखादा सप्तरंगी महागॉगलदेखील घालावा, असे आमचे प्रामाणिक मत होते. चामड्याचे जाकिटही तसे शोभून दिसले असते. 

‘‘शुं? गिटार?,’’ ते.

‘‘करेक्‍ट...गिटारच!,’’ आम्ही.

...मोदीजी विचारात पडले. गिटार घेऊन उतरावे की भारतीय परंपरेची सतार हाती घेऊन जावे? असे त्यांनी विचारले. सतार घेऊन जाणे बरे दिसणार नाही, असा प्रामाणिक सल्ला आम्ही लागलीच दिला. सतार हे तसे अडचणीचे वाद्य आहे. उभी घेऊन जावी की आडवी, इथपासून अडचणी येतात. अखेर व्हायोलिन हनुवटीखाली पकडून ताडताड स्टेजवर जावे, अशी तडजोड झाली. पण हनुवटीखाली व्हायोलिन पकडणे हे देखील तसे जिकिरीचे जाते. (प्रयोगादाखल जिज्ञासूंनी सदऱ्याचे टोंक हनुवटीखाली पकडून बघावे!) शिवाय हनुवटीखाली व्हायोलिन पकडून ताडताड नव्हे, तरातरा चालावे लागते. (जिज्ञासूंनी हेदेखील ट्राय करून पाहावे.) अखेर स्टेजवर मोकळ्या हातांनी जावे, असे ठरले.

...अखेर त्यांनी एण्ट्री घेतली! ते आले! ते जिंकले!! कार्यक्रम ठरल्याप्रमाणे जबर्दस्त झाला. ‘हौडी

मोदी’ या प्रश्‍नाला मा. मोदीजींनी ‘‘एव्हरीथिंग इज फाइन इन इंडिया!,’’ अत्यंत खुशीखुशीने (दोन्ही हात पसरून) उत्तर दिले. वास्तविक ‘हौडी मोदी’ हा प्रश्‍न नसून ‘काय कस्काय’ असे म्हणण्याचा प्रघात आहे, इतकेच. त्याला उत्तर देण्याची गरज नसते. निव्वळ मान डोलावून हात दाखवला तरी चालते. भिवया उडवून डोळे मिटले तरी चालते. ‘जाऊ दे झाले’ किंवा ‘मरेना का’ अशा अर्थाने हात झटकला तरी चालते. 

कुणी तुम्हाला रस्त्यात भेटल्यावर ‘राम राम’ केले, तर तुम्ही त्याला चौदा भाषांमध्ये ‘आत्ताच जेवलो. जेवणात बटाट्याची भाजी होती. थोड्या वेळाने टीव्ही बघून झोपणार’ असा लांबलचक तपशील द्याल का? नाही. ‘हौडुयुडू’ या लांबलचक वाक्‍याचे ‘हौडी’ हे लघुरुप आहे. (आम्हाला उगीचच ‘हौडी’ हे नागपूरसाइडचे उद्‌गारवाचक वाटत असे.) पण मा. मोदीजींनी ह्यूस्टनकरांच्या ‘हौडी मोदी’ला चोख दहा भाषात उत्तर देऊन टाकले. याला धैर्य लागते.

‘‘भारतात सर्व छान चालले आहेऽऽऽ...,’’ असे ते दहा भारतीय भाषांमध्ये उत्तरादाखल म्हणाले, इतकेच नव्हे तर त्याचा इंग्रजी अनुवादही तेथल्या तेथे करुन दाखवला. आमच्यामते हा हौडी मोडी कार्यक्रमाचा हायलाइट होता. खरे सांगतो, अंगावर कांटा आला! आमची (सव्वीस इंची) छाती अभिमानाने फुगली. भारतात सर्व काही छान चालले आहे, हे वृत्त किती सुखद होते!! साहजिकच जगभरातील सर्व वाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूज झळकली- ‘‘भारतात सर्व छान चालले आहे! छानच चालले आहे!!’’ म्हणून म्हटले, याला धैर्य लागते!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article Howdy Modi Trump programme