ढिंग टांग : पैलवान कोण?

ढिंग टांग : पैलवान कोण?

प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. सर्वप्रथम निवडणुकीतील घवघवीत यशाखातर तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन! सोबत पाच लाडू पाठवले आहेत. ते बुंदीचे आहेत. शिवाय दोन राजगिऱ्याचे लाडू आहेत. तो श्रीकेदारनाथ मंदिराचा प्रसाद आहे. परवाच तिथे मी जाऊन आलो. राजगिऱ्याला तिथे रामदाना असे म्हणतात. चवीलाही चांगला आहे. त्याचे श्रद्धापूर्वक सेवन करावे. (बुंदीच्या लाडवाचेही!) बुंदीचे लाडू आपल्या कॉमन विजयाप्रीत्यर्थ पाठवत आहे. सोबत थोडा श्रीकेदारनाथाचा अंगारा पाठवत आहे. ती फासडून हिमालयात जावे, असे तुम्हाला क्षणभर वाटेल. पण तो मोह टाळावा, अशी विनंती आहे. असो.

‘आम्ही तेल लावून उतरलो आहोत, पण समोर पैलवानच कोणी नाही’ असे मी प्रचारयात्रेत बोललो होतो. त्याचा भयंकर पश्‍चात्ताप होत आहे. दंड थोपटत रिंगणात उतरावे आणि मातीत पाय घसरून पडावे, तसे काहीसे झाले आहे. बारामतीकरांना उगीच डिवचले असे वाटते. पण आता वेळ निघून गेली. आपण दोघांनी मिळून महाराष्ट्रासाठी व्यवस्थित राज्य केले, तर चुकीचे परिमार्जन होईल असे वाटते.

मी तर हल्ली डोक्‍यालाही तेल लावणे सोडून दिले आहे. ‘अमका अमका गेला तेल लावत’ हा वाक्‍प्रचारही वापरायचे सोडून दिले आहे. तेल लावलेल्या पैलवानाने आम्हाला चाट घालून पाडले! अंग हुळहुळत असले तरी हसतमुखाने विजयाची ग्वाही मात्र दिली. (तेवढे मला चांगले जमते.) असो.

थोडी उसंत मिळाली की एकत्र बसून पुढे काय करायचे ते ठरवू. तसे आपले सगळे ठरलेच आहे, पण आणखी थोडे ठरवू! तुमच्या सोयीची तारीख आणि वेळ कळवा! दिवाळीतच भेट झाली तर फराळही एकत्र करता येईल. अधिक काय लिहू? 

(अजूनही) तुमचा सख्खा मित्र. नानासाहेब फ.

* * *

नाना-
जय महाराष्ट्र. निवडणुकीचा प्रचार संपला की तातडीने क्‍यामेरा उचलून परदेश दौऱ्यावर जायचे असा आमचा परिपाठ असतो. यंदा आपण दणकून जिंकणार, असे तुम्ही सांगितल्याने थांबलो! काय घडले? आमच्या सीटा कमी झाल्या!! तुमच्यामुळे आमचे नुकसान झाले. कोण भरून देणार?

तेल लावलेल्या पैलवानाने तुम्हाला अस्मान दाखवले, तुमच्याबरोबर आम्हालाही (अलाहिदा डावावर) तोंडघशी पडावे लागले. ‘बारामतीकरांच्या नादाला उगीच लागू नका,’ असे तुम्हाला वारंवार बजावत होतो. ऐकले नाहीत! अखेर धडा मिळाला. पैलवान कोण हे आता तुम्हाला कळले असेलच.

जनतेने डोळ्यांत अंजन घातले, अशी प्रतिक्रिया मी कालच नोंदवली आहे. ॲक्‍चुअली, ते अंजन नसून चांगला टायगर बाम डोळ्यांत घातला आहे. तुमच्यामुळे आमचेही डोळे चुरचुरत आहेत. विजय मिळाला हे खरे, पण हा काय विजय म्हणायचा? तुमचे ते ‘दोसोबीसपार’ मराठी रयतेने उडवून लावले. म्हणून असल्या वल्गना (तुम्ही) करू नयेत. आपल्याला झेपेल तेवढीच डायलॉगबाजी करावी. या निवडणुकीत मी तरी हाच धडा घेतला आहे.

तुम्ही पाठवलेले पार्सल मिळाले. श्रीकेदारनाथाच्या प्रसादाबद्दल आभार. आम्हाला घरबसल्या अस्मान आणि परमेश्‍वराचे दर्शन दोन्ही झाले!! तुमच्या पार्टीच्या विजयाचे बुंदीचे लाडूदेखील मिळाले. पण तुमच्या पार्सलमध्ये बुंदीचे लाडू तीनच होते. चार आहेत म्हणून खोटेच कां सांगता? आम्ही काल इथे थोडे पेढे वाटले. पण संपले!! आपले ठरले आहे, हे तर खरेच. पण ठरल्याप्रमाणे तुम्ही ठरले नाही तर, तुमची कंबख्ती ठरलेलीच आहे, हे जाणून असा. गाठ माझ्याशी आहे. भलते लाड (आता) सहन करणार नाही. 

(अजून तरी) तुमचाच.

 उधोजी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com