dream-of-happiness
dream-of-happiness

ढिंग टांग : सत्तातुरांची सुखस्वप्ने!

सुखस्वप्न १ : वंदनीय श्री नमोजी यांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय मा. मोटाभाई यांच्या पाठबळामुळे निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. मुख्यमंत्रिपदी मलाच पर्मनंट करावे, असा जनतेचा कौल स्पष्ट दिसतो आहे. परंतु, आमच्या मित्रपक्षाला ते कळत नाही. वास्तविक ‘मी पुन्हा येईन’ असे वारंवार बजावले होते. काही लोकांनी ते मनावर घेतले नाही आणि उरलेल्यांना ती धमकी वाटली. बहुमताला अगदी फारच थोडे आमदार कमी पडत आहेत. सध्या राज्यात ओला दुष्काळ असल्यासारखा असल्याने, जास्त ताणले की आमदार उपलब्ध होतील, याची खात्री आहे. (मा. मोटाभाईंना कल्पना दिलेली आहेच. मला टेन्शन नाही!!) शब्द दिल्याप्रमाणे मी यंदाही (नव्या जाकिटासह) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ! कोल्हापूरच्या... चुकलो... आता कोथरूडच्या आमच्या चंदूदादांकडे लक्ष ठेवावे लागणार आहे. ‘सीएम कोण?’ अशी पक्षांतर्गत चर्चा सुरू झाली की ते संशयास्पद पद्धतीने हसतात. ‘मी पुन्हा येईन’ ही स्लोगन मी दिली, तेव्हाही ते पुणेरी पद्धतीने हसल्यासारखे वाटले होते. मी लक्ष ठेवीन! मी लक्ष ठेवीन!

सुखस्वप्न २ : दोस्त बन बन के मिले मुझको मिटानेवाले, मैंने देखे हैं कई रंग बदलनेवाले’ हा शेर आठवतो आहे. दख्खनच्या शेराला शेर आठवणे ही चांगली गोष्ट नाही. गेल्या वखताला जुझात येकटे लढून जेवढे येश पदरात पडले होते, त्यापेक्षा थोडके कमीच औंदा प्राप्त झाले. पण, धीराने घेतले आहे. काहीही झाले तरी या खडाखडीत आपण माघार घेणार नाही. च्याट घालून पाडणार नाही आणि बांगडी (की आणखी कुठल्या) डावावर तोंडघशीही पडणार नाही. कमळाबाई अज्जिबात ऐक्‍कत नाही. बाईमाणूस आहे म्हणून ऐकून घेतो आहे, दुसरे कोणी असते तर लंबे केला असता!! काहीही असो, आमचे अबतक छप्पन प्लस इतर विरोधी पक्षांचे गुपचूप फोन प्लस संजयजी राऊत यांची मुलुखगिरी असा गडबडगुंडा रचून मोहीमशीर झालो आहे. फत्ते होवोन मंत्रालयी भगवा फडकेल, ऐसा विश्‍वास आहे. जगदंब, जगदंब!

सुखस्वप्न ३ : गेले पाचेक दिवस डोळ्याला डोळा नाही. खरे तर निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर झोपच उडाली आहे. आमच्या पक्षाला चक्‍क पन्नास जागा! पन्नास!! असे कसे झाले असेल? विश्‍वास बसत नाही. औंदा कांग्रेस पक्ष वीस-बावीस जागांवर आटोपेल, असे सगळे म्हणत होते. सगळे कशाला? आम्हीही म्हणत होतो. पण, घडले उलटेच! प-न्ना-स! फिफ्टीचा आकडा बघितला आणि झोप उडाली ती उडालीच! उपासमारीच्या तयारीने पाणी पिऊन झोपावे, असा विचार करणाऱ्या कडकीबहाद्दाराच्या चंद्रमौळी झोपडीत अचानक लार्ज पिझ्झाची डिलिव्हरी यावी, तस्से झाले आहे. कमळाबाईचे कारस्थान यशस्वी झाले नाही, तर आपणही सत्तेत येऊ शकतो, या कल्पनेने सैरभैर झालेले आमचे काही नेते पहिले विमान पकडून दिल्लीला रवानासुद्धा झाले. आमच्या पक्षाला हल्ली कुठलेही धक्‍के सहन होत नाहीत. सुखद धक्‍केही जीवघेणे वाटतात, त्यापैकी हा एक आहे. जय हिंद.

सुखस्वप्न ४ : महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत पेडर रोडवर सिल्व्हर ओक येथे आहे. तेल लावलेला पैलवान कोण ते कळले ना आता? एसओ डावावर आम्हीच ही कुस्ती मारली आहे. एसओ डाव हा कुस्तीतला स्पेशल डाव आहे. एसओ डाव म्हणजे एक पाय बाहेर, एक पाय आत. जिंकलेल्याला वाटते आपण हरलो आणि हरलेला हात उभे करून नाचतो! याला म्हंटात एसओ डाव... एसओ म्हंजे सिल्व्हर ओक! काय कळले?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com