ढिंग टांग : घाईलादेखील उशीर लागतो...

Maharashtra politics
Maharashtra politics

महाराष्ट्रातील सत्तापेच मुंबईतून दिल्लीत गेल्यानंतर अधिकच गुंतागुंतीचा झाल्याचे आम्हाला सूत्रांनी सांगितले आहे. सूत्रे सांगतात, म्हणजे ते खरे असले पाहिजे. कां की सूत्रे कधीही खोटारडेपणा करीत नाहीत, की शब्द फिरवत नाहीत. आमचा सूत्रांवर प्रगाढ विश्‍वास आहे. ‘ठंडा करके खाओ’ हा राजकारणातला एक मूलभूत नियम आहे. तदनुसार आम्ही सध्या ‘ठंडा मतलब सत्तास्थापना’ हे धोरण अंगीकारले आहे.

सत्तास्थापनेचा पेच लौकरात लौकर सुटेल व लोकांच्या मनातले लाडके, हवेहवेसे आणि बहुप्रतीक्षित असे लोकप्रिय सरकार येईल, असा निर्वाळा आमचे परममित्र मा. संजयाजी राऊतसाहेब यांनी दिला असल्याने आम्ही निर्धास्त आहो! ‘घाईलादेखील उशीर लागतोच’ हे सुभाषित आम्ही अनंताश्रमी (खुलासा : अनंताश्रम, गिरगावातील एक लाजबाब; पण इतिहासजमा झालेली खाणावळ) बोर्डावर अनेकदा वाचून (मासळी ताटाची वाट पाहत) मिटक्‍या मारल्या आहेत. तो संस्कार आमच्यावर कायमस्वरूपी झाला आहे. तेव्हा आज ना उद्या, उद्या ना परवा, परवा ना तेरवा, महाशिवआघाडीचे सरकाररूपी मासळीताट आमच्यासमोर येणार याबाबत आमच्या मनीं शंका नाही. ‘शिवस्सेनेचा मुख्यमंत्री येणाऽऽर...शिवशाहीचे स्सरकार येणाऽऽर...कोणीही मायेचा लाल त्यास रोखू शकत नाही’ इतका दिलासा तूर्त आम्हांस पुरेसा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सत्तास्थापनेची प्रक्रिया सर्वसाधारणपणे ताशी ऐंशी किमीच्या वेगात घडेल. ‘अति घाई, संकटात नेई’ हे सुभाषित सारे जाणतात. तेव्हा या वेगाने घडामोडी घडून येत्या काही दिवसांत किंवा महिन्यात किंवा वर्षात किंवा भविष्यात कधीतरी लोकप्रिय व कार्यक्षम असे सरकार महाराष्ट्रात स्थापन होईलच. त्यासाठीची प्रक्रिया थोडीशी वेळखाऊ आहे. ती पुढीलप्रमाणे :

१. शिवसेनेच्या सत्तास्थापनेच्या प्रस्तावावर महाआघाडीचे मित्रपक्ष प्राथमिक चर्चा करतील. प्राथमिक चर्चा झाल्यानंतर माध्यमिक चर्चा होईल, तदनंतर तो प्रस्ताव उच्च माध्यमिक चर्चेसाठी दिल्लीत जाईल.

२. उच्च माध्यमिक चर्चेनंतर त्या चर्चेचे सार हायकमांड ऊर्फ उच्चतम चर्चेसाठी मा. म्याडम यांच्या कानावर घातले जाईल. ते सार नेमके काय आहे, हे स्पष्ट करुन सांगण्यासाठी त्या साराचे सार काढले जाईल! सार काढताना म्याडमच्या चेहऱ्यावरील भावभावनांचे बारकाईने निरीक्षण करुन त्यांनी ‘हो’ म्हटले की ‘नाही’ हे ठरवले जाईल. 

३. म्याडमनी ‘हो’ म्हटल्यासारखे वाटले तर लागलीच प्रस्तावाच्या साराचे सार उच्च माध्यमिक चर्चेसाठी परत (खाली) पाठवण्यात येईल.  

४. उच्च माध्यमिक चर्चा खऱ्या अर्थाने खालच्या पातळीला होईल. कारण या चर्चेच्या वेळी गोपनीयता व सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागणार आहे. चर्चास्थानी मोबाइल फोनला मज्जाव असेल. मोबाइल फोनवर रेकॉर्डिंग होते, हे गोपनीयतेचे कारण आहेच, शिवाय काही काही मोबाइल फोन फार भरभक्‍कम असतात व फेकाफेकीत टाळकी सडकली जातात! ही चर्चा वादळी होण्याचा संभव आहे.

५. उच्च माध्यमिक चर्चेच्या वादळी फेरीनंतर सत्तास्थापनेला चांगला (सुजलेला) आकार येईल. हा आकार मा. सोनिया म्याडम यांना ‘बैल क्‍येवढा मोठ्‌ठा...हा हा. येवढा मोठ्‌ठा’ असे सांगताना करतात, दाखवण्यात येईल. त्या आकाराचे निरीक्षण करताना पुन्हा एकदा त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून त्या ‘हो’ म्हणताहेत की ‘नाही’ हे ठरवले जाईल. 

६. एकदा त्यांनी ‘हो’ म्हटले की मग पुढले सोपे आहे. 

७. मा. म्याडमनी होकार दिला की तीन-चार मिनिटांत सत्तास्थापना होईल.

८. महाराष्ट्रात ‘शिवस्सेनेचा मुख्यमंत्री येणाऽऽर...शिवशाहीचे स्सरकार येणाऽऽर...कोणीही मायेचा लाल त्यास रोखू शकत नाही’ हे वाक्‍य (एकदाचे)प्रत्यक्षात उतरेल. पण-

९. आपण खरेच सत्तेवर आलो आहोत, हे वर्ष-दीडवर्षानंतर शिवसेनेला समजेल!!

...तेव्हा सबुरीने घ्यावे! ठंडा मतलब...सत्तास्थापना! घाईलादेखील उशीर लागतो, हे ध्यानी ठेवावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com