ढिंग टांग : रात्रीस खेळ चाले..!

dhing-tang
dhing-tang

अंधार पडत चालला होता. एरवी ‘सातच्या आत घरात’ असणारे मा. उधोजीसाहेब अजूनही वरळीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अडकले होते. या कांग्रेसवाल्यांचे हेच त्यांना आवडत नाही. ज्यात त्यात उशीर! शपथ घ्यायला बोलावले तरी लेकाचे डुलत डुलत जातील! उशिरा काळोख पडल्यावर घरी जायला उधोजीसाहेबांना आवडत नाही. बारामतीचे काका मीटिंगमधून उठल्याबरोब्बर तेसुद्धा सटकले. पाठोपाठ संपादक राऊतसाहेबही उठले. वाटेत शिवाजी पार्कात थांबून त्यांनी हिंदुहृदयसम्राटांच्या स्मारकासमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले, म्हणाले : ‘मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला जातोय! लहानपणी तुम्ही म्हणायचात, ‘‘फोटो काढून काय मिळणारे? लोकांनी आपले फोटो काढले पाहिजेत!’’

आता माझे खूप फोटो निघतील! याच शिवतीर्थावर लौकरच मी शपथ घेईन...घेईन...घेईन...!’ (हा इको इफेक्‍ट त्यांच्या मनातच उमटला...) वरळीच्या वादळी बैठकीत बारामतीचे काका सगळ्यांसमोर म्हणाले होते, की ‘‘या ठिकाणी तुम्हीच मुख्यमंत्री होण्याची भूमिका घ्यायला पायजेलाय!’’ किती मधुर शब्द ते! किती दिलासा देणारे!! किती किती आधार देणारे!! आश्‍चर्य म्हणजे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. कांग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेसाहेबांना तर पहिल्यांदा हसताना पाहिले! अहमदभाई पटेलांनीही डोळे मिचकावलेन! किती सुंदर क्षण होता तो! आपण सगळ्यांना आवडतो, ही भावना किती छान आहे नै?...

रस्ताभर संपादक राऊतसाहेब ‘आहे ब्बुवा, एका माणसाची मज्जाय!’ अशा नजरेने बघत होते. ‘‘साहेब, ‘हो’ म्हणून टाका! महाराष्ट्र वाट बघतोय!’’ असे म्हणाले. शेवटी ठरले! महाराष्ट्राचा सीएम व्हायचंच! कमळाबाईचा नक्षा कायमचा उतरवायचा... प्रत्यक्ष बारामतीच्या काकांनी खांद्यावर हात ठेवलाच आहे, आता कशाला मागे पाहायचे?

...रात्री ‘मातोश्री’वर परतलेल्या मा. उधोजीसाहेबांनी कपभर दूध (हळदयुक्‍त) घेतले. उद्या सकाळी पुन्हा बैठकांचे गुऱ्हाळ चालू होईल. फार बडबड करावी लागते तिथे. आपल्या पक्षात असे नव्हते! नुसती भिवई उडवली तरी मावळे ऐकत असत. पण आता आपण सेक्‍युलर झालो! बडबड करता यायला हवी! त्यासाठी पुरेशी झोप व्हायला हवी...

उधोजींनी अंथरुणाला पाठ टेकली. पण निद्रादेवी कुठे पळून गेली होती कोण जाणे! त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर नवनवी सुखस्वप्ने तरळत होती. आपण बंद गळ्याचा फायनाबाज कोट घालून शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहोत...समोर अफाट जनसागर लोटला आहे... संपादक राऊत वीरासनात बसून तुतारी फुंकून आपले वीरोचित स्वागत करीत आहेत...असं ते सुखस्वप्न! पुन्हा पुन्हा पहावं असं...

...हे पहा, शिवतीर्थावर मुंगीला पाऊल ठेवायला जागा नाही. भव्य व्यासपीठावर शपथविधी सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. सनईचे मंगल सूर आसमंतात भरून ऱ्हायले आहेत. लोक येऊन हस्तांदोलन करीत आहेत. समोरच्या रांगेत खुद्‌द बारामतीचे काका बसले आहेत....

शिवतीर्थाच्या काठावर वसलेल्या ‘कृष्णकुंज’ इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्याच्या खिडक्‍या आणि दारे कडेकोट बंद आहेत. सनईचे मंगलसूर कानी पडू नयेत, म्हणून किती हा खटाटोप! एकेकाचा जळकू स्वभाव... दुसरं काय म्हणणार?

...‘हाय देअर, बॅब्स...काँग्रॅट्‌स हं! हे घ्या...’ असं म्हणून चि. आदित्य भर व्यासपीठावर क्‍याडबरीचा घास भरवून तोंड गोड करतो आहे...

अशी सुंदर सुंदर स्वप्नदृश्‍यांची मालिका रात्रभर सुरू राहिली. पण-

....पहाटे पहाटे त्यांना दचकून जाग आली. कुणीतरी ऐनवेळी च्याट घालून पाडते आहे, असे घाणेरडे स्वप्न पडले. आपण भुईसपाट झालो असून, विजयाचे मेडल बारामतीच्या दादांनी अखेरच्या क्षणी पटकावल्याचे दिसले.

...पहाटे पडलेली स्वप्नं (नको तेव्हा) खरी होतात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com