
गेल्या काही दिवसांत चार हॉटेले हिंडून झाली! आम्हाला हॉटेला-हॉटेलात आणणारा-नेणारा बसवालासुद्धा आज ‘आऊर कितने दिन बस लगेगा? शेठ चिल्लाता हय’ असे विचारीत होता. त्याला ‘बहुमत तक रुको’, असे सांगितले आहे.
प्रिय मा. पक्षप्रमुख श्री. उधोजीसाहेब, सविनय जय महाराष्ट्र विनंती विशेष. सकाळी ‘लेमन ट्री’ नावाच्या फायूष्टार हॉटेलमध्ये आलो. याच्याआधी ‘ललित’ नावाच्या हाटेलात होतो. त्याच्याही आधी मालाडला ‘रिट्रीट’ हाटेलात व त्याच्याही आधी बांदऱ्याला ‘रंगशारदा’मध्ये होतो. गेल्या काही दिवसांत चार हॉटेले हिंडून झाली! आम्हाला हॉटेला-हॉटेलात आणणारा-नेणारा बसवालासुद्धा आज ‘आऊर कितने दिन बस लगेगा? शेठ चिल्लाता हय’ असे विचारीत होता. त्याला ‘बहुमत तक रुको’, असे सांगितले आहे.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
आपल्या कृपेने फायू ष्टार हॉटेलात राहण्याचा योग आला. चांगले चालले आहे. काळजी नसावी! मुंबईत इतकी भारी भारी हॉटेले असताना आपण आमदार निवासात कशापायी कडमडत होतो? असे मात्र मनात येऊन गेले. आपल्या कृपेने हे दिवस दिसले. थॅंक्यू!
...आज रोजी वजनाच्या काट्यावर उभा राहिलो. (रुममध्ये वजनकाटा ठेवण्यात आला आहे. उगीच भानगड कशाला? म्हणून काही दिवस वजनकाट्यावर पाय टाकला नव्हता. आज हिय्या केला.) आठवड्याभरात सात किलोने वजन वाढलेले पाहून खाली उतरलो. चाऱ्ही ठाव खाणे चालले आहे. काय होणार? पण आपली काही तक्रार नाही.
...आपलेच सरकार येणार असे मा. राऊतसाहेब दिवसातून तीन वेळा येऊन सांगून जातात. काल रोजी त्यांना सांगून टाकले, ‘‘लागू द्यात वर्ष साहा महिने...फिकर नॉट!!’’
साहेब, आम्ही आपल्यापाठीशी कायम उभे आहोत. (खरे तर फायू ष्टार बेडवर आडवे झोपलेले आहोत!) शेवटी विजय आपलाच होणार, याची खात्री आहे. ओल्या दुष्काळाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी एवढी कळ सोसावीच लागेल. हो की नाही? कळावे,
जय हिंद. जय महाराष्ट्र. एक कडवट आमदार.
ता. क. : या हाटेलांचे बिल कोण भरते आहे? माझ्या खोलीत आलेल्या वेटरने तीन केळ्यांचे सतराशे रुपये बिल लावले. माझी बिलावर सही घेतली आहे.
* * *
टु हूम सो एव्हर इट मे कन्सर्न,
किंवा महोदया,
एक काँग्रेसचा साधासिंपल कार्यकर्ता आहे. आपला विधिमंडळ नेताच अजून निवडला गेलेला नसल्याने पत्र कोणाला लिहावे हे कळले नाही. म्हणून विदाऊट मायना मुख्यालयात पत्र धाडत आहे. कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, आम्हाला ‘मॅरियट’ या पंचतारांकित हाटेलात हलविण्यात आले आहे. आधीच्या टायमाला आम्हाला जयपूरला नेण्यात आले होते. केवढी भव्य ही हाटेले!! मी स्वत: तीनदा चुकीच्या खोलीत शिरलो!! पुढल्या वेळेला दार्जिलिंगला न्यावे, अशी आमची नम्र विनंती आहे. (तेवढे हिलस्टेशन बघून होईल!) अजून किती दिवस इथे राहायचे आहे? कृपया कळवावे. वेळ लागणार असल्यास कुटुंबीयांना इथे आणण्याची परवानगी मिळेल का? तेही कळवावे. आपल्या गरीब शेतकरी बांधवांसाठी हा त्याग करायला आम्ही सदैव तयार आहोत.
आपला एक निष्ठावंत कांग्रेस कार्यकर्ता.
* * *
थोरले साहेब सा. न. नुकतेच आम्हाला ‘रेनेसां’ या हाटेलातून ‘ग्रॅण्ड हयात’ नावाच्या हाटेलात हलवण्यात आले आहे. हाटेल चांगले असले तरी, येथे शिवसेनेच्या लोकांचा जागता पहारा आहे. खोलीचे दार उघडले तरी समोर एक दाढी व टिळेवाला हाताची घडी घालून उभा असतो. काय करावे? आम्ही तुमच्या(च) पाठीशी आहोत! (प्लीज विश्वास ठेवा हो!)
आपला(च) सच्चा राष्ट्रवादी कार्यकर्ता.
ता. क. : ‘रुम सर्विस’ला फोन करून फक्त दोन उकडलेली अंडी मागवली होती. वेटर साडेआठशे रुपयाचे बिलसुद्धा घेऊन आला! अवकाळी पावसाने देशोधडीला लागलेल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी दोन अंडीदेखील महाग झाली, साहेब! काही तरी करा!!