ढिंग टांग :  महाराष्ट्रधर्म राखिला काही..!

ढिंग टांग :  महाराष्ट्रधर्म राखिला काही..!

सा मां पातु सरस्वती भगवती! जय भवानी!! 
येका परम ऐतिहासिक घटणेची साक्ष लिखित करणेसाठी आम्ही बैठक मारोन बसलो आहो! ऐसी घटणा गत दहा सहस्त्र वर्षांत ना कधी घडली, वा ना घडेल! श्‍वास फुलोन आला आहे. बुलेट गाडीच्या इंजनाप्रमाणे हुर्दाचे ठोके धडधडत आहेती. छातीचे बंद तटतटा तुटोन गेले आहेती. वारंवार छातीवरील बंद तुटो लागल्यामुळे आम्ही चलाखीने गुंड्या घट्‌ट व चखोट लावोन बसलो आहो. मजकूर वाटोळ्या, सरळ हस्ताक्षात लिहोन काढण्यासाठी सज्ज आहो. आई जगदंबे, बळ दे! बुद्धी दे! शक्‍ती दे! युक्‍ती दे!

येक करता येक जाहाले. ज्याने लाडकोड करावे, तोच जिवावर उठला. ज्याचे हाती पाळण्याची दोरी असे, त्याणें हाती जिवंत सर्प घेतला. महाराष्ट्रावर संकट कोसळले. कोण काढील या अंध:कारातून बाहेर? कोण करील या विघ्नाचे हरण? कोण करील या दुष्टांचे काळवीट? कोण करील शिकार? अखेर आकाशवाणी चखोट जाहाली : ‘‘हे कैदाशिणी कमळे, हे अर्वाचीन पुतने, हे महाबिलंदर मावशे, तुझी शंभर पापें भरिली, भरिली, भरिली! येक मऱ्हाटी लोक कल्याणकारी राजयोगी करील तुझे निर्दाळण! त्याचे तेज तलवारीचे घावात तुझ्या फेंदऱ्या नाकाचा शेंडा, आणि हल्लकफूल कान अल्लाद कापले जातील! अस्तु, अस्तु, अस्तु!’’

...त्याच क्षणी बांदरा मुक्‍कामी उधोजीसाहेबांना जागेपणी साक्षात्कार जाहला. प्रत्यक्ष आईने त्यांचे हातात तेग दिली, आणि कमळेचे नाक जाहीर उडवण्यास फर्माविले. हाच तो क्षण, हीच ती वेळ! कमळेचे अन्यायी सैन्य परास्त करण्यासाठी उधोजीसाहेबांनी तेहेतीस कोट देवादिकांना साद घातली. नवग्रहांना पाचारण केले. विनम्रपणे विदित केले : मंत्रालयी भगवा फडकणे हे तो ईश्‍वरी इच्छा! परंतु, गनिम प्रबळ...सहजासहजी ऐकिणारा नव्हे! आपण मजला ताकद द्यावी, अमोघ अस्त्रे माझ्या तलवारीत विलीन करावीत. त्यायोगी म्यां कमळेचा नासिकाविच्छेद करीन! महाराष्ट्रास लागलेले ग्रहण कायमचे टळेल!’’

बहुत आश्‍चर्य! नऊ दिशांना नऊ तोंडे असणारे नवग्रह निमूटपणे उधोजीराजांच्या कुंडलीत शुभगृही येऊन बैसले. तेहेतीस कोट देवादिकांनी आपापली अमोघ अस्त्रे राजेसाहेबांस उदारपणे दिधली. आणखी काय हवे?

अखेर शुभ्र, पंचकल्याणी अश्‍वास टांच देवोन राजांनी तेगीचे टोक उत्तरेकडे करीत कूच केले. घनघोर रणकंदन जाहाले. राजेसाहेबांनी पराक्रमाची शर्थ केली. कोण कोणाशी झुंजतो आहे, ते कळेना! कोणाची खांडोळी होत्ये आहे, कोणाचा भाला कोण्या दिशेने फेकला जातो आहे, काही कळणे नियतीलादेखील अशक्‍य जाहले. तेवढ्यात हाकाटी उठली : ‘‘दादा गेले, दादा गेले!‘‘ हा तो अनर्थ जाहला. मा. दादासाहेबांचे पराक्रमावर सारी मदार होती. परंतु, तंबूतील तांब्याभांड्यासकट दादा कमळेस जावोन मिळाल्याची हाकाटी उठल्यामुळे मावळ्यांचे मनोधैर्य खच्ची जाहाले. झटक्‍यात जावोन परतीचे दोर कापोन टाकण्यासाठी राजेसाहेब पुढे सर्सावले; परंतु परतीचा दोरच नसल्याने त्यांची अंमळ पंचाईत जाहाली. तेवढ्यात पुनश्‍च हाकाटी जाहाली, ‘‘दादा आले! दादा आले!’’ हे तो महद आश्‍चर्य होते! मी पुन्हा येईन असे सांगून कमळाबाई पळोन गेली, परंतु, पुन्हा आले ते दादासाहेबच! सहीसलामत कुमक आल्याने राजेसाहेबांनी अखेरचा घाव घालोन कमळाबाईचे सैन्य सळो की पळो केले. एक जबर्दस्त झुंज संपली.

अत्यंत आदरेकरोन राजेसाहेबांनी गादीचे दर्शन घेतले. मग त्याच गादीवर एक डुलकी काढून ते तरोताजे होवोन शपथविधीस सज्ज झाले. येणेप्रमाणे महाराष्ट्रधर्म राखिला! इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com