मेरा परिवार!

मेरा परिवार!

सर्वप्रथम हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे की आम्ही कमळ पक्षाचे शतप्रतिशत मेंबर आहो! अकरा कोटी मेंबरे करणारी ही जगातली सर्वांत मोठी लोकशाही पार्टी असल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. पक्षासाठी आम्ही तनमन वेचले आहे... धन वेचण्याची संधी अजूनी मिळालेली नाही, म्हणून तेवढे फक्‍त राहून गेले आहे. पण ते असो.

आजचा दिवस परमपवित्र असा दिवस होता. भल्या सकाळी आम्ही साखरझोपेत असताना उशाशी ठेवलेला फोन वाजला. तो मधुर दैवी आवाज ऐकू आला...""मैं कमल पार्टी नां अध्यक्ष मोटाभाई..12 फरवरी को करोडो देशवासीयों के साथ, अपने घर पर कमल पार्टीका झंडा और स्टिकर लगाकर "मेरा परिवार कमल परिवार' इस अभियान की शुरुआत कर रहा हूं. 2019 के चुनाव में फिर एक बार नरेंद्र मोदीजी के नेतृत्त्व में कमल पार्टी की सरकार बनाने के लिए मोदीजी के साथ खडे रहेंगे!'' 

...पाठोपाठ खुद्द मोटाभाईंचा मेसेज आला- ""तमारी सेल्फी क्‍यां छे?'' आम्ही गडबडून गेलो. मारी सेल्फी क्‍यां छे? क्‍यां छे? क्‍यां छे? आज 12 फेब्रुवारीचा पवित्र दिवस. आज सकाळी उठायचे. आंघोळबिंघोळ आटोपून नवे कपडे घालून घराच्या खिडकीत वा गच्चीत वा ग्यालरीत वा दारात (आपापल्या सोयीप्रमाणे) पाट मांडावयाचा. त्यावर पवित्र दंड उभा ठेवून पक्षध्वज अभिमानाने फडकवायचा. हातात मोबाइल फोन घेऊन "मेरा परिवार कमल परिवार' अशी घोषणा देत झक्‍क सेल्फी काढावयाची आणि "ट्विटर'वर चिपकवायची. आहे काय नि नाही काय! ह्या एका सेल्फीने देशाचे भवितव्य ठरणार आहे! उठले पाहिजे... उत्तिष्ठत, जाग्रत, पक्षगुढी उभारत!... आम्ही तांतडीने कामाला लागलो. 

सेल्फी काढून पाठवणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्यच आहे. कार्यकर्तेच का? आम्ही तर म्हणू, की प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे. -मेरा परिवार, कमल परिवार! कोट्यवधी कमलजनांनी आपापली सहकुटुंब सेल्फी "ट्विटर'वर झळकावून पक्षाचा पाया दाखवून देणे ही तूर्त काळाची गरज आहे. तसे न घडले तर अनर्थ ओढवून देश पुन्हा एकदा सर्वनाशाच्या खाईत जाईल. रात्र वैऱ्याची आहे, सावध राहिले पाहिजे! 

"संन्याशाच्या लग्नास शेंडीपासून तयारी' ह्या प्राचीन म्हणीनुसार सारे काही घडले. नाही म्हणायला घरात धुणे वाळत घालायची काठी होती. त्याचा पक्षकार्यासाठी उपयोग करण्याचे आम्ही मनोमन ठरवले. पण गुढीचे वस्त्र कोठून आणावे? आम्ही पक्ष कार्यालयात धाव घेतली. तेथे (दात कोरत बसलेल्या) कार्यकर्त्याने आम्हाला "काय पायजेल?' असेही विचारले नाही. आम्हीच "झेंडा मिळेल का? असे चाचरत विचारल्यावर तो "इलेक्‍शनला अजून टायम आहे' असे बरळला. शेवटी भरपूर शोधाशोध केल्यानंतर आम्हाला गेल्या इलेक्‍शनच्या वेळी मोटारसायकलवर लावायचे निशाण मिळाले. म्हटले, ह्याचाच उपयोग करू. निशाण मिरवत पक्ष-कार्यालयातून निघणार, तेवढ्यात एका कार्यकर्त्याने आमच्या हातात एक स्टिकर ठेवले. आता हे कोठे लावायचे? असा विचार मनात डोकावला. 

""झेंडा नाही लावलात तरी चालेल, घराच्या भिंतीवर हे स्टिकर लावून ठेवा!'' त्या कार्यकर्त्याने स्पष्ट केले. 
""आतून लावू की बाहेरून?'' आम्ही शंका विचारून घेतली. 
""आत लावून काय करणार? बाहेर लावा!'' तो कार्यकर्ता अचानक उसळला. 
""दारावर लावू?'' आम्ही. 
""कुठेही लावा हो... निघा!'' त्याने काढता पाय घेतला. 
आमच्या एका हातात पक्ष निशाण आणि दुसऱ्या हातात स्टिकर होते. आमचा ऊर अभिमानाने भरून आला. म्हटले आपण आता (दोन्ही लावून) डब्बल पक्षकार्य करू!! 
...तूर्त आम्ही परिवाराच्या शोधात आहो! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com