पीएम कोण होणार?

पीएम कोण होणार?

आगामी इलेक्‍शननंतर भारताचा पंतप्रधान कोण? असा सवाल सर्वत्र चर्चिला जात असून, त्यास सांप्रतकाळी विविध (पक्षनिहाय) उत्तरे मिळत आहेत. कुणाचे कोण फेवरिट, तर कुणाचे कोण! कमळ पार्टीकडे ह्या पोस्टसाठी एकच उमेदवार असला तरी गठबंधनाच्या आतील (आणि बाहेरील) अन्य होतकरू पक्षांमध्ये मिळून पंतप्रधानपदासाठी नेतेमंडळींचा एक कळपच्या कळप उभा राहिल्याचे चित्र आहे. ह्याचा आम्हाला विलक्षण अभिमान वाटतो. किती प्रगल्भ आहे आमच्या देशातील लोकशाही? किती गंभीर आहेत आपले नेते? देशाचे नेतृत्व करण्यासाठी किती किती धडपडतात? भारतीय जनतेचे भले करण्यासाठी किती ही चढाओढ? मन कसे भरून येत्ये... 

भारतीय लोकशाहीत सध्या तीन प्रकारचे उमेदवार उपलब्ध आहेत. एक "कमळां'कित उमेदवार, एक "हातां'कित उमेदवार आणि बिगर "हात-कमळां'कित उमेदवार. पैकी कमळांकित उमेदवारांमध्ये चॉइस नसल्याने सदोदित एकच एक माल विकणाऱ्या अगरबत्तीच्या दुकानाची कळा त्यास आली आहे. तर "हातांकित' उमेदवारही एकमेवच आहे. कां की पंतप्रधानपदाखेरीज दुसरे कुठलेही पद त्याच्यासाठी बनलेलेच नाही! बिगर "हात-कमळां'कित उमेदवारांमध्ये मात्र चिक्‍कार चॉइस आहे. किंबहुना, आम्ही तर म्हणू की हा एक प्रकारचा मॉलच आहे!! 

ह्यासंदर्भात अनेक सर्व्हे अथवा पाहण्या सुरू असल्याचे कळल्याने आम्हीही जय्यत तयार आहो!! मतदारहो, आपणही आता तय्यार व्हावे. पक्षनिहाय सर्वेक्षणांना यशस्वीरीत्या तोंड देता यावे म्हणून आम्ही येथे काही मार्गदर्शक तत्त्वे सुचवीत आहोत. तुम्हाला कोण पंतप्रधान झालेले आवडेल? नमोजी की रागा? अशा थेट प्रश्‍नांसह अनेक सवाल विचारणारे काही लोक तुमच्या दारी येतील... 

1. आधी त्यांना दार उघडावे! 

2. त्यांच्या हातात एखादा फॉर्म असेल. त्यात बघून ते प्रश्‍न विचारतील. आपणही तसेच करावे! आपली उत्तरे कागदावर लिहून ठेवावीत व वाचून दाखवावीत! 

3. तुम्ही "नमोजी'वाले की "रागा'वाले की गठबंधनवाले? ह्या प्रश्‍नाचे डायरेक्‍ट उत्तर होता होईतो देऊ नये! चेहरा लांब करावा. एक सुस्कारा टाकावा. मान डोलवावी. "चक' असा आवाज (तोंडातून) काढावा. 

4. ""सांगा ना? नमोजी ना?'' ह्या प्रश्‍नावर गूढ हसावे! सर्व्हेवाला घोळात येईल. तो पुढला प्रश्‍न विचारेल. ""रागा' लिहू का?'' त्यावर पुन्हा तस्सेच गूढ हसून वर एक संसदेत मारतात तसा ("रागा'टाइप) डोळा मारावा. सर्व्हेवाला सर्द होईल! 

5. गठबंधन हा मात्र एक स्वतंत्र विषय आहे. इथे चिक्‍कार चॉइस आहे, हे आधी आम्ही सांगितलेच. कारण गठबंधनातील पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा पंतप्रधान होण्यासाठी लायक आणि सक्षम आहे. 

6. पंतप्रधानपदाची खुर्ची असते. गठबंधनातील पंतप्रधानांसाठी जाजम हांतरावे लागेल, ह्याची नोंद घेऊन तुम्ही अर्धा डझन नावे लागोपाठ घेतलीत तरी चालेल. 

7. हल्ली कोणीही पंतप्रधान होऊ शकतो, असा एक सार्वत्रिक समज समाजात झालेला दिसतो. तेव्हा अगदी स्वत:चे नाव घेतले तरी चालते. 

8. "सरकारच्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का?' ह्या प्रश्‍नाला तसा काही अर्थ नाही. तरीही तो सर्व्हेच्या फॉर्मात असतोच! सरकारच्या कामाबद्दल समाधानी असलेल्या मनुष्यप्राण्याचा लोकशाहीवरच विश्‍वास नाही, हे खुशाल समजून असावे. त्यामुळे ह्या प्रश्‍नाचेही धड उत्तर देऊ नये. 

9. सर्वसाधारणपणे सर्व सर्व्हेवाल्यांकडल्या प्रश्‍नांची उत्तरे "होय', "नाही' आणि "माहीत नाही' ह्यापैकी असावीत अशी चतुराई असते. पैकी "माहीत नाही' हे उत्तर शक्‍यतो देऊ नये. कारण आपल्याला सगळे माहीत असतेच. हो की नाही? 
...तेव्हा तयार राहा! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com