ओह, गुरू..! 

ब्रिटिश नंदी
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

ओह, गुरुऽऽऽ...तुस्सी माझी फिकर होऊन राहिली, हे वाचूनच माझा दिल बाग बाग झाला. ऐ, ये गल सुन्न... 
ऐवान-ए-सद्र पर मिले दो यार, 
ऐवान-ए-सद्र पर मिले दो यार 
कुछ शिकवे थे, कुछ गिले थे 
दोस्ती की हर मिसाल की कसम 
गले मिले तो यूं मिले की कभी मिले ही नही... 

अझीझ दोस्त सिद्धूपाजी, लख लख सलाम, माझ्या टेकिंग-ए-ओथ याने की शपथविधी सोहळ्याला तुम्ही जातीने हाजिर नाझिर राहिलात, त्याबद्‌दल तहेदिलसे शुक्रिया. मेरा और एक हिंदुस्थानी प्यारा दोस्त सुनीलपाजी आणि हरफनमौला-इ- हरियाना कपिलपाजी ह्यांनाही बोलावले मी होते. सोचा था, बहोत जमेगा रंग जब मिल बैठेंगे हम यार...लेकिन वो हो न सका!! सुनीलपाजी आणि कपिलपाजी हे दोघेही खरेच पाजी निघाले!! सुनीलपाजींनी पडसे झाल्यामुळे त्यांचे नाक बंद झाल्याची वजहा सांगितली तर कपिलपाजींनी त्यांच्या घुटन्यात दर्द असल्याचे सांगितले. दोघांनीही अशी लिव्ह-ए-सिक टाकल्यावर मी नाचीझ तरी काय करणार? 

खाना-इ-कसम याने की शपथ ग्रहण सोहळ्यात आपल्याला फार बोलता आले नाही. इतनाही नहीं, "कैसा रहा सफर, कुछ खा लो' हेही म्हणता आले नाही. दीदार-ए-दोस्ती की कसम, इस बहाने मैंने रात को बहोत आसू बहाये. तीन-तीन बेगमा करणारा आदमी रात को आसू बहाएगा नही तो क्‍या? असे कुणी कुत्सितपणे म्हणाले. लेकिन मी असल्या कमेंट-इ-फालतूकडे दुर्लक्ष करतो. जाने दो. 

बोलने लायक बहुत कुछ था, लेकिन कैसे बयां करुं? आखिर मिठी मारून आपली जजबात व्यक्‍त केली, इतकंच. मिठी मारल्याच्या मसल्याचा तुमच्या मुल्कात काही भानगड होणार नाही ना? असले काही घडले की आपल्याकडे लगेच इ-बोंबाबोंब होते, म्हणून फिक्र पडल्याने विचारतो आहे. पुढच्या वेळी लाहोरला याल, तेव्हा डब्यात तंदुरी चिकन आणावे. दोघेही आवडीने खाऊ. आपका अपना. इम्रान. 

ओह, गुरुऽऽऽ...तुस्सी माझी फिकर होऊन राहिली, हे वाचूनच माझा दिल बाग बाग झाला. ऐ, ये गल सुन्न... 
ऐवान-ए-सद्र पर मिले दो यार, 
ऐवान-ए-सद्र पर मिले दो यार 
कुछ शिकवे थे, कुछ गिले थे 
दोस्ती की हर मिसाल की कसम 
गले मिले तो यूं मिले की कभी मिले ही नही... 
...ठोको ताली!! कैसा लगा मेरा शेर-ए-बब्बर! असे भयंकर फालतू शेर मला सतत सुचत असतात. माझ्या बेगमेने त्याच्यावर खूप इलाज करून पाहिला. पण काहीच फरक न पडल्याने अखेर मला राजकारणात पाठवण्याचा निर्णय घ्यावा लागला. इम्रानपाजी तुमचेही असेच काहीसे झाले ना? सच सच सांगा!! सुनीलपाजी आणि कपिलपाजी ह्यांना बारा महिने अनुक्रमे सर्दी आणि घुटनेदर्दी असते. मेरी वैसी हालत नही है. अभी तो मैं जवां हूं, चलती फिरती हसीं की दुकां हूं, गुजरे पलों का मकां हूं...बघा, पुन्हा शेरोशायरी सुरू झाली! 

वास्तविक मी वसीमभाई, कादिरभाई वगैराह माजी पाजीलोकांच्या कोंडाळ्यात पाठीमागच्या रांगेत बसलो होतो. पण कुणीतरी आणून आपकी जगह रांग-ए पेहलीमध्ये आहे, असे सांगितले. मी त्यांना म्हटले, ""भाई, आज मेरे यार का जलसा है, मी सांगाल त्या स्टुलावर बसायला तयार आहे.'' तिथे बसलो नसतो तर बरे झाले असते असे नंतर वाटते आहे...तुम्हाला मारलेली मिठी फार महाग पडली नाही, पण तुमचे बेमिसाल चीफ-ए-लष्कर कमर जावेद बाजवापाजी ह्यांना गले मिलनेसे माझ्या कमरेत जबरदस्त उसण भरली आहे!! कमर जावेद सिर्फ बेमिसाल नहीं, मिसाइल है!! जाऊ दे. बाघा-अटारी बॉर्डरमार्गे बसनेच घरी परतलो आहे. आता तीनेक महिने बाहेर कुठे पडायची सोय नाही. फिर मिलेंगे. आपका अपना सिद्धूपाजी. 

ता. क. : लाहोरहून येताना मी काही जोडे घेऊन आलो आहे. लोकांनी हाणण्याआधी आपणच डोक्‍यात मारून घेतलेले बरे!! क्‍यो? ठोको ताली!! 

Web Title: dhing tang article in sakal