ढिंग टांग! : खिलेगा तो कमलही..? 

मंगळवार, 21 मे 2019

ढिंग टांग! : खिलेगा तो कमलही..?

बेटा : (खांदे पाडून घरात येत) मम्मा, आयॅम बॅक! 
मम्मा मॅडम : (काळजीत पडून) काही होतंय का तुला? 
बेटा : (आळस देत) नोप... कंटाळा आलाय फक्‍त! 
मम्मा मॅडम : (कसनुसं हसत) चेहरा किती उतरलाय!! मला वाटलं की तब्बेत बरी नाही की काय!! 
ेबेटा : (डोकं हलवत) मूड एकदम खराब आहे!! 
मम्मा मॅडम : (समजूत घालत) होतं असं कधी कधी! तुला पास्ता देऊ का, पास्ता? 
बेटा : (तोंड कडवट करत) नको!! मला भूकच नाही! 
मम्मा मॅडम : (पुन्हा काळजीयुक्‍त सुरात) कशानं भूक मेली तुझी? टीव्हीवर एक्‍झिट पोल बघितलीस की काय? 
बेटा : (दुर्लक्ष करत) पक्षाच्या ऑफिसमध्ये गेलो होतो! सगळे माझ्याकडे असंच बघत होते! अहमद अंकलनी तर खांद्यावर थोपटून "सब कुछ ठीक हो जायेगा' असंही सांगितलं! 
मम्मा मॅडम : (स्वत:ची कष्टानं समजूत घालत) होणारच आहे सबकुछ ठीक! इतकी मेहनत केली आहेस, त्याचं फळ मिळणारच आहे तुला! मग कुणी काहीही बोलो! 
बेटा : (हाताची घडी घालत) मैं डरता नहीं! देखो, हमारी पार्टी सच्चाई की पार्टी है! 
मम्मा मॅडम : (नैतिक झळाळीनिशी) अर्थात!! 
बेटा : (पुन्हा संभ्रमात) सगळं होईल ना ठीक मम्मा? 
मम्मा मॅडम : (जावळातून हात फिरवत) होईल रे! तू काहीही काळजी करू नकोस! तू आधी एक मस्त झोप काढ बरं! एवढ्या धकाधकीच्या प्रवासानंतर दमला असशील!! 
बेटा : (चक्रावून जात) कालपासून लोक मला इतकी सहानुभूती कां दाखवताहेत? 
मम्मा मॅडम : (चपापून) कारण सारा देश तुझ्यावर खूप खूप माया करतो म्हणून! कळलं? 
बेटा : (आश्‍चर्यचकित सुरात) मघाशी मला त्या कमळ पार्टीच्या अध्यक्षांचा मेसेज आला! 
मम्मा मॅडम : (धक्‍का बसून) बाप रे!! काय होता मेसेज! 
बेटा : (खांदे उडवत) विशेष काही नाही! फक्‍त एकच शब्द होता- "सॉरी!' 
मम्मा मॅडम : (संतापाने) हिंमत होतेच कशी ह्यांची! दोन दिवस थांबा म्हणावं, सगळे दात जातील मेले घशात!! काय ती टीव्हीवाल्यांची एक्‍झिट पोल!! दिव्य निकाल लावलेत!! अशी कुठे निवडणूक असते का? 
बेटा : (दिलासा देत) मी पीएम झालो की पहिले एक कायदा करून एक्‍झिट पोलवर बंदी आणणार आहे!! काहीही दाखवतात लेकाचे!! एका पोलमध्ये तर त्या नमोजींना पावणेचारशे सीटा दाखवल्यान!! 
मम्मा मॅडम : (निक्षून सांगत) जळोत ती एक्‍झिट पोल्स... तू लक्ष देऊ नकोस! 
बेटा : (बेफिकिरीने) छे! मी कुठे मनाला लावून घेतोय? ते बंडल असतं सगळं! त्या एक्‍झिट पोलला काहीही अर्थ नाही, हे मला पहिल्यापासूनच माहिती होतं! 
मम्मा मॅडम : (उजळलेल्या चेहऱ्यानं) आता थोडेच दिवस राहिले! मग आपल्याला खरेखुरे अच्छे दिन येणार बेटा!! 
बेटा : (विजयी मुद्रेने) तेही मला आधीपासूनच माहिती आहे!! 
मम्मा मॅडम : (डोळे मिटून) तुझा हा कॉन्फिडन्स बघितला की मनाला किती उभारी येते म्हणून सांगू? 
बेटा : (कबूल केल्यागत) आय नो, आय नो! 
मम्मा मॅडम : (समाधानानं) मग थोडं खाऊन घे बरं! आपोआप बरं वाटेल तुला!! 
बेटा : (नकार देत) नको! मी आलो होतो परवानगी मागण्यासाठी! समजा, येत्या 23 तारखेला खरे निकाल ह्या एक्‍झिट पोलसारखेच लागले, तर मी कैलास यात्रेला जावं की केदारनाथच्या गुहेत जाऊन राहावं? टेल मी!!