ढिंग टांग! : ...आता रडा (र)! (नवीकोरी जेम्स बॉंड कथा)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 14 मे 2019

कुख्यात स्कारामांगाच्या छुप्या तळाचा शोध लावण्यासाठी जेम्स बॉंडला फक्‍त सात मिनिटे पुरेशी ठरली. अत्यंत दुर्गम भागात कुख्यात स्कारामांगाचा तळ असून तेथे बेकायदा शस्त्रास्त्रांचा साठा असून मारेकऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाते, हे गुपित कमनीय नवयौवना क्रमांक 16 ऊर्फ जुलियाने पहाटे पावणेपाच वाजता हळुवार आवाजात बॉंडच्या कानात फोडले.
 

कुख्यात स्कारामांगाच्या छुप्या तळाचा शोध लावण्यासाठी जेम्स बॉंडला फक्‍त सात मिनिटे पुरेशी ठरली. अत्यंत दुर्गम भागात कुख्यात स्कारामांगाचा तळ असून तेथे बेकायदा शस्त्रास्त्रांचा साठा असून मारेकऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाते, हे गुपित कमनीय नवयौवना क्रमांक 16 ऊर्फ जुलियाने पहाटे पावणेपाच वाजता हळुवार आवाजात बॉंडच्या कानात फोडले.

(पहाटवेळ...आहा! जाऊ द्या!!) जुलियाला तिथेच (पक्षी : पलंगावर) सोडून बॉंडने तातडीचा संदेश आपल्या घड्याळातून ब्रिटनस्थित हेडक्वार्टरमधील मि. एम ह्यांना पाठवला. (खुलासा : आता बॉंडच्या बॉसचे नाव मि. एम आहे ही आमची चूक नाही! उगीच आमच्या नावानं शिमगा करू नका!!) मि. एम ह्यांनी त्याला ताबडतोब कार्यालयात बोलावून घेतले. कार्यालयात दर्शनी भागातच नखाला रंग लावत बसलेल्या मिस मनीपेनीला बॉंड म्हणाला, "" खूप सुंदर दिसतेयस आज. पण नखांना विद्रुप करण्याचा हा उद्योग तू का करते आहेस...कळेल का?'' मिस मनीपेनीने खडूस हसत त्याला मि. एम वाट पाहत असल्याची सूचना केली. 

""बॉंड, ही निर्णायक वेळ आहे. अर्जंट हल्ला करुन कुख्यात स्कारामांगाचे तळ उद्‌ध्वस्त करून ये कसा?,'' मि. एम म्हणाले. सुटी उपभोगून नुकत्याच रुजू झालेल्या बॉंडला ह्या वेळी मोहिमेवर जाणे जिवावर आले होते. त्यात जुलियासारखी नवयौवना...(जाऊ द्या हो!) ""उद्या बघू की!'' असे त्याने मि. एमना सांगून बघितले. पण बॉस बधले नाहीत! म्हातारा खवट आहे, असे बॉंड मनातल्या मनात म्हणाला. 

""हे बघ बॉंड...तुझ्या करिअरबाह्य कामगिऱ्या थोडा वेळ थांबव! हा ब्रिटनच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न आहे,'' मि. एमनी त्याला खडसावले. 

""पण कुख्यात स्कारामांगाचे तळ अत्यंत दुर्गम ठिकाणी आहेत. तिथे पोहोचण्यासाठी माझी अत्याधुनिक उपकरणांनी युक्‍त अशी मोटार उपयोगाची नाही,'' बॉंडने भलतेच कारण सांगितले. 

""हेलिकॉप्टरने जा!,'' मि. एम गुरगुरले. 

""हेलिकॉप्टर विश्‍वासार्ह नाही. शिवाय त्यावर बॉम्ब ठेवता येत नाही...'' बॉंडने आणखी एक कारण सांगितले. 

""मग विमानाने जा!,'' मि. एम ह्यांनी दोन्ही हात फैलावून खोलीत एक गिरकी मारत सूचना केली. 

""मी हवामान खात्याकडे चौकशी केली! त्या भागातले हवामान अतिशय लहरी असून भयंकर पाऊस पडण्याची चिन्हे आहेत, असे मला सांगण्यात आले आहे...,'' बॉंडने मारलेली ही एक शुद्ध लोणकढी होती. पण मि. एम हे सहजासहजी फसण्यातले गृहस्थ नव्हते. 

""मला ते माहीत आहे, कारण तेथे पावसाळी ढग मीच पाठवले आहेत!,'' मि. एमनी राष्ट्रीय गुपित फोडले. बॉंडनेही पाची बोटे तोंडात घातली. 

""...हवा खराब असतानाच हवाई हल्ला केलेला नेहमी बरा असतो!,'' मि. एमनी बॉंडला पेचात पकडले. ते पुढे म्हणाले, ""हवा ढगाळ असली की तुझे विमान ढगात लपून जाईल व कुख्यात स्कारामांगाच्या रडारवर उमटणारच नाही. पाऊस पडला तर त्याच्या रडारमध्ये दोनशे ग्यालन पाणी जाईल, अशी व्यवस्था ऑलरेडी करण्यात आली आहे...बेलाशक हल्ला करून ये! जाव!!'' 

...बॉंडने दुर्गम भागात जाऊन तेवीस मिनिटांत कुख्यात स्कारामांगाचे अतिरेकी तळ उद्‌ध्वस्त केले नि तो तीन मिनिटांत परतलासुद्धा. मग उरलेली सात मिनिटे त्याने पुन्हा जुलियाशी लगट करण्यात घालवली. 

""...तू खरंच ग्रेट आहेस बॉंड!'' ती (अर्थात) हळुवारपणे म्हणाली. 

""त्याचं श्रेय मि. एमना जातं...माझं कर्तृत्व एवढंच की...की...की..,'' असे म्हणून खाली वाकत जेम्स बॉंडने नेहमीच्या पद्धतीने आपली गोष्ट संपवली. (खुलासा : नेहमीची पद्धत म्हंजे नेहमीची पद्धत...वर्णनं कशाला हवीत? नॉन्सेन्स!!) असो...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing Tang Article in sakal on James Bond Story

टॅग्स