पीड पराई जाणे रे..! (ढिंग टांग)

पीड पराई जाणे रे..! (ढिंग टांग)

तसा आमचा स्वभावच मुळात सेवाभावी आहे, हे कोणीही सांगेल. बालपणापासून आम्ही सेवेचे महत्त्व जाणून आहोत. इतके की, "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले...' हे भजन कोणी म्हणू लागले की आम्ही लाजून-संकोचून भजनगायकास थांबवत असू.

आपले कवतिक किती म्हणून ऐकायचे? कवतिकासाठी का सेवाधर्म असतो? आम्ही चौथ्या यत्तेत असताना जेमतेम सतरा-अठरा वर्षांचे चिमखडे होतो, तेव्हा आम्ही शेजारील बिऱ्हाडातील ती. अण्णा कापरे ह्यांस पाय चेपून देत असू. त्याखातर मानधन म्हणून आम्ही त्यांच्या बंडलातील दोन विड्या काढून घेत असू. ती. अण्णा ह्यांची काहीशी उपवर अशी सुकन्या जी की बेबी ईचे मस्तक दुखतें म्हणून आम्ही तेलाची बाटली घेऊन तिच्या खोलीत मनोभावे जात असताना ती. अण्णा ह्याने आमची कालर धरून ओढले व त्यानंतर तीन महिने आम्हीच मालिशवाला शोधीत हिंडलो. म्हातारा कृतघ्न निघाला! असो. हा दुखरा इतिहास आता उगाळणे इष्ट नव्हे. 

कोणे एकेकाळी लोकतंत्र बाल्यावस्थेत होते, तेव्हा मतदारांस साड्या आणि सदऱ्याची कापडे वाटणे, गहू-तांदूळ वाटणे, बिर्याणी वाटणे आदी सेवा (काही) उमेदवारांकडून बजावल्या जात. इलेक्‍शनच्या निमित्ताने तरी आपल्या मतदारांच्या घशाखाली चार घास जावेत हा शुद्ध हेतू असे. परंतु, आता लोकतंत्र मोठे झाले असून, सदर आमिषांचे वाटप कालबाह्य आणि फुटकळ ठरले आहे. चालू काळ हा इलेक्‍शनी सेवाधर्माचा आहे. 

गोरगरिबांची सेवा करणाऱ्यासच मतांचा प्रसाद मिळून ज्यापांस सर्वाधिक मतसंचय त्यास सुख-शांती-पुत्रपौत्र-ऐश्‍वर्यादी गोष्टींचा तत्काळ लाभ होतो, हे पारलौकिक सत्य आहे. इलेक्‍शनच्या काळात आम्ही सेवाकर्माचे सल्लागार म्हणून अनेक पुढाऱ्यांसाठी (पक्षी : उमेदवार) काम करीत असतो. त्यांस नवनवीन सेवायुक्‍त्या सुचवीत असतो. वानोळा म्हणून त्यातील निवडक काही सेवायुक्‍त्या आम्ही येथे देत आहो. 

1. मालिशयुक्‍ती : बसडेपो अथवा रेल्वे फलाटावर तेलाच्या बाटल्या घेऊन उभे राहावे. मालिस, तेऽऽल मालिस...असे खच्चून वरडावे. इच्छुक जमा होतील. त्यातील त्यातल्या त्यात अस्वच्छ इच्छुकास बाजूस उभे करून निवडक काही जणांस तेथल्या तेथे मालिश करून द्यावे. 

2. सार्वजनिक स्नानयुक्‍ती : बाजूला उभे करून ठेवलेल्या अस्वच्छ इच्छुकांस आर्जवाने सार्वजनिक नळावर नेऊन आंघोळ घालावी. त्यास धुतलेला टावेल द्यावा. (तो परत घेऊ नये!) मागल्या इलेक्‍शनला ही आयडिया क्‍लिक झाली होती. इच्छुकांनी प्रवासात जवळ साबण ठेवावयास सुरवात केली होती, असे कळते. 

3. कंगव्याची कमाल : भांग पाडून देणे, हीदेखील एक सेवाच आहे. सगळ्यांनाच काही सकाळी घरातून निघताना भांग पाडण्याची संधी मिळत नाही. किंबहुना ती हुकतेच. अशा विस्कटलेल्या (केसांच्या) गृहस्थांस रेल्वेडब्यात घुसून भांग पाडून दिल्यास मते मिळतात, असा अनुभव आहे. 

4. "मतदार माझा लाडका' युक्‍ती : कसेबसे आंघोळी आटोपून घाईघाईने कामावर निघालेल्या मतदारांना अडवून त्यांस काजळतीट काढावे, (महिला उमेदवारांनी ) महिला मतदारांस पावडर कुंकू करावे. एखादे वाण लुटावयासही हरकत नाही. काजळतीट लावून हफिसात लाजत शिरणाऱ्या मतदाराचे मत हमखास मिळेल, ह्याची खात्री बाळगावी. 

5. घास घे रे...: लंच टाइममध्ये कुठल्याही कचेरीच्या दारात दबा धरून बसावे. लंच टाइमला मतदाराने आपापले जेवणाचे डबे उघडले की तत्काळ आत शिरावे व त्यास त्याच्याच डब्यातील चार घास भरवावेत! भरवताना एका घास चिऊचा, काऊचा...असे म्हणावे.

 ...वरीलपैकी कुठलीही सेवा बजावताना टीव्ही च्यानलांचे क्‍यामेरे रोखलेले असणे अनिवार्य आहे, ह्याची नोंद घ्यावी. इति. -ब्रिटिश नंदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com