ढिंग टांग : कळसाची चोरी!

ढिंग टांग : कळसाची चोरी!

स्थळ : मातोश्री युद्ध-दालन (पक्षी : वॉर रूम), वांद्रे बालेकिल्ला.
वेळ : आरपार लढाईची. काळ : थांबलेला.
प्रसंग : बांका. पात्रे : राजाधिराज उधोजी महाराज आणि नवे सरलष्कर खंबीरराव ऊर्फ संजयाजी.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
...........................
उधोजीराजे : (गर्रकन मान वळवत) कोण आहे रे तिकडे?

संजयाजी : (घाईघाईने येऊन मुजरा करत) मुजरा महाराज! विलंब झाल्याबद्दल क्षमा असावी!

उधोजीराजे : (संशयानं) तुम्ही इथं कसे आलात? आमचा नेहमीचा फर्जंद कुठे आहे?

संजयाजी : फर्जंदाची अर्जंट ट्रान्स्फर झाली आहे महाराज! सध्या मीच ही ड्यूटी करीत आहे!

उधोजीराजे : तुम्ही तो आमचे नवे सरलष्कर! फर्जंदाची चाकरी करण्याची वेळ तुम्हांवर कां यावी?

संजयाजी : (इकडे तिकडे बघत) रात्र वैऱ्याची आहे महाराज! भिंतीला कान असतात महाराज! काळजी घ्यावयास हवी! सावधगिरीचा उपाय म्हणून आम्ही गडावरील सर्व शिबंदी बदलली आहे! 

उधोजीराजे : (सर्रकन तलवार उपसत) बरं, बरं! जुझाची तयारी जाहली?

संजयाजी : (अदबीने) होय महाराज! गनिमाला पुरतें घेरण्यात आले असून चहू बाजूंनी आपले सैन्य जय्यत तयार आहे! खिंडीतला मोर्चा मी स्वत: सांभाळला आहे!

उधोजीराजे : (थक्‍क होत) एका वेळेला तुम्ही काय काय करता? लेखणीही चालविता, आणि तलवारही? धिंडही काढता, आणि खिंडही लढविता?

संजयाजी : खींचो न कमानों को, न तलवार निकालो, जब तोप हो मुकाबिल तो अखबार निकालो!...जनाब अकबर इलाहाबादीसाहेबांचा शेर अर्ज केला, महाराज!

उधोजीराजे : (कौतुकानं) कम्मॉल आहे बोआ, तुमची हं! कोसो कॉय जॉमतॉ...अं?

संजयाजी : (दुप्पट अदबीने) आपल्या कृपेने जमून जाते.

उधोजीराजे : शाब्बास मेरे पठ्ठे! याला म्हणतात कडवा एकनिष्ठ मावळा! तुमच्यासारख्या कडवट मावळ्यांमुळेच आता इथं रामराज्य अवतरेल! श्रींची इच्छा असेल तर आम्ही इथं, या मुंबईतच राम मंदिर बांधायचं योजत आहोत!!

संजयाजी : (दचकून) क्षमा असावी महाराज! पण सध्या हे रामराज्य वगैरे राहू द्या! आता आपण सेक्‍युलर झालो आहोत!

उधोजीराजे : (भिवई वक्र करत) असं कोण म्हणतं?

संजयाजी : (चाचरत) आम्हीच महाराज! गनिमाला घेरण्यासाठी आपल्याला काही लोकांचं सहकार्य घ्यावं लागलं! शत्रू प्रबळ होता! त्यांची नांगी ठेचायची म्हंजे असं काही करावं लागणारच होतं!

उधोजीराजे : (चकित होत्साते) म्हंजे? ती शिवशाही, राम मंदिर...वगैरे? सगळं विसरायचं?

संजयाजी : तूर्त बाजूला राहू दे...इतकंच आमचं म्हणणं! तूर्त आपण गनिमाच्या राहुट्यांचे कळस कापून आणू!

उधोजीराजे : (गोंधळून) फक्‍त राहुट्यांचे कळस कापण्यासाठी येवढं युद्ध करायचं?

संजयाजी : (अदबीने) गनिमाच्या राहुट्यांचे कळस सुवर्णाचे आहेत महाराज! मार्केटमध्ये रेट चांगला येईल! 

उधोजीराजे : (न पटून) खजिना सोडून कळस कशाला?

संजयाजी : (शांतपणे) खजिन्यात खडखडाट आहे, महाराज! कळस बरे!

उधोजीराजे : (खोल आवाजात) सोन्याच्या कळसापायी दौलतीची ओळख गमवावी? किती मोठी किंमत मोजायास लावता आहात तुम्ही, अं?

संजयाजी : (सुस्कारा सोडत) कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, असं भगवद्‌गीतेत म्हटलं आहे!

उधोजीराजे : असं हिंदीत म्हटलं आहे?

संजयाजी : अर्ज किया है...

उधोजीराजे : राहू दे हो तुमची शेरोशायरी! या कळसापायी स्वत्त्व गमावण्याची पाळी आली! गड आला पण...पण...पण...अहहहहह!!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com