ढिंग टांग : ...करून दाखवलं!

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे.
वेळ : मंगल! काळ : शुभ.
ग्रह : अत्यंत शुभ. पात्रे : नवनियुक्‍त महाराष्ट्रपती उधोजीसाहेब आणि चि. आमदार विक्रमादित्य.

चि. विक्रमादित्य : (नेहमीप्रमाणे दार ढकलून खोलीत शिरत) हे देअर बॅब्स...काँग्रॅच्युलेशन्स!

उधोजीसाहेब : (मृदूपणाने) थॅंक्‍यू हं, थॅंक्‍यू! पण आता तू झोपायला जा! 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

चि. विक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्याने) कमॉन बॅब्स! ही काय झोपायची वेळ आहे? चला, फटाके फोडू या!!

उधोजीसाहेब : अजिब्बात फोडायचे नाहीत फटाके!

चि. विक्रमादित्य : (निषेधाच्या सुरात) का? हा आपल्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे!

उधोजीसाहेब : (तक्रारीच्या सुरात) कानाला दडे बसतात रे! तू झोपायला जा बरं! दमला असशील! मीसुद्धा जाम दमलोय! गुड नाइट!

विक्रमादित्य : (आश्‍चर्यानं) कमॉन! आजचा दिवस सेलेब्रेशनचा आहे! चला, सेलेब्रेट करूया! झोपताय कसले? नंतर पाच वर्ष आरामच आहे!!

उधोजीसाहेब : वाट्‌टेल ते बोलू नकोस! पाच वर्ष खूप काम करायचं आहे आपल्याला! आता आराम हराम आहे बरं! मी तर म्हणतो की तू लागलीच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जा! 

विक्रमादित्य : (खट्‌टू होत) म्हंजे? आता आपण सुट्‌टीवर जायचं नाही? लंडनबिंडनला?

उधोजीसाहेब : (उत्साहानं) आता हेच आपलं लंडन आणि हेच स्विर्त्झंलड!! महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आपण खूप काम करायचं आहे...तयारीला लागा!!

विक्रमादित्य : तुझे बाबा सीएम झाले यावर विश्‍वास बसत नाही असं मला आपले लोक सांगत होते! मी पण त्यांना तेच म्हटलं- माझा तर अजूनही विश्‍वास नाही म्हणून! 

उधोजीसाहेब : (समाधानाने) तुझाच काय, माझाही अजून विश्‍वास बसत नाही! असं वाटतंय की, हे महाराष्ट्राला पडलेलं गोड गोड स्वप्नच आहे, आणि त्या स्वप्नात मी आलोय!! आपल्या ‘करून दाखवलं’च्या यादीत मोठ्‌ठी भर पडली, याचं समाधान आहे!!

विक्रमादित्य : (आरशात बघत खुशीत) एका झटक्‍यात तुम्ही सीएम झालात आणि मी एमएलए झालो! 

उधोजीसाहेब : (पाठीवर थाप मारत) काँग्रॅच्युलेशन्स! आपल्या घराण्यातला पहिला आमदार आहेस तू!

विक्रमादित्य : (चक्रावून जात) कमालच आहे नै! मी आमदार झालो, पण सीएम नाही, आणि तुम्ही सीएम झालात, पण अजून आमदार नाही!! हाहा!!

उधोजीसाहेब : (छताकडे बघत चिंतनशीलपणे) नियतीचा खेळ बाबा, हा सारा नियतीचा खेळ! महिनाभरापूर्वी कुणी मला म्हटलं असतं की सीएमची खुर्ची माझ्याकडे चालत येणार आहे, तर मी त्याला वेड्यात काढलं असतं!

विक्रमादित्य : (रिलॅक्‍स मूडमध्ये) गेला महिनाभर काय सॉल्लिड धमाल आली ना! एखादा हॉलिवूडचा पोलिटिकल थ्रिलर सिनेमा बघतोय, असं वाटत होतं! हो की नाही?

उधोजीसाहेब : (काहीसे लाजत) आणि तुझे बाबा त्या सिनेमाचे हिरो ठरले! हो ना?

विक्रमादित्य : एक विचारायचं राहिलं! मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान मलबार हिलवर ‘वर्षा’ बंगल्यावर असतं ना?

उधोजीसाहेब : (न कळून) हो... मग?

विक्रमादित्य : (पॉइण्टाचा मुद्‌दा काढत) मग आता आपण ‘वर्षा’ बंगल्याचं नाव बदलून ‘मातोश्री’ ठेवायचं की या ‘मातोश्री’ बंगल्यालाच ‘वर्षा’ बंगला म्हणायचं? 

उधोजीसाहेब : तू...तू ताबडतोब झोपायला जा बरं!

विक्रमादित्य : (घाईघाईने) आणखी एक... देवेंद्र अंकलचा फोन येऊन गेला मघाशी! 

उधोजीसाहेब : नाव नको काढूस त्यांचं!

विक्रमादित्य : (दाराबाहेर पाय टाकत) त्यांनी निरोप दिलाय- मी पुन्हा येईन! हाहा!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article shivsena