आमचे आधार कार्ड! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 26 एप्रिल 2017

कळविण्यास अत्यंत आनंद होतो, की काल आमच्या गोठ्यात दोन सरकारी अधिकारी येऊन आधार कार्डाचे कुरिअर देऊन गेले. "याजसाठी केला होता अट्‌टहास' असे फीलिंग आले आहे. पलाष्टिकचे कोटिंग लाभलेल्या ह्या कार्डावर आमचा देखणा फोटो असून, त्यात आमची शिंगे भलतीच रुबाबदार दिसत आहेत. कार्डावर बारा आकडी विशिष्ट ओळख क्रमांकही छापला असून, तो 4204 2042 0420 असा आहे. माणूस प्राण्याला मिळते तसे हे कार्ड खिश्‍यात किंवा कपाटात किंवा कमरेच्या कश्‍यात ठेवायचे नसून कानात ठेवायचे आहे. आमचे कान पुरेसे लांब असल्याने हे कार्ड तेथे पर्मनंट चिकटवले गेले. कुणी कानाला खडा लावते, आम्ही कानाला कार्ड लावले. असो.

काही आठवड्यापूर्वी सरकारी अधिकाऱ्यांनी येऊन आधार कार्डाचा फॉर्म भरून घेतला.

जन्मवर्ष : 2005। नर
उंची : छत्तीस इंच.
लांबी : नाकापासून शेपटापर्यंत दोन मीटर
वर्ण : पांढऱ्यावर काळे ढग किंवा काळ्यावर पांढरे ढग.
शिक्षण : बैल!
व्यवसाय : चरणे.
उपव्यवसाय : गाई गाई!

अशी माहिती तपशीलात भरून घेतली. "तुमचा वाण काय?' असा अत्यंत जातीय प्रश्‍न त्यांनी विचारला असता आम्ही अभिमानाने "भारतीय' असे राष्ट्रीय उत्तर दिले!! त्याने चतुराईने आमच्या खुराचा शिक्‍का आधीच घेऊन ठेवला होता म्हणून!! नाहीतर दाखवला असता इंगा!! कुठल्याही बैलाला चारचौघात त्याचा वाण विचारू नये, एवढी साधी अक्‍कल ह्या सरकारी अधिकाऱ्यांना नसावी? त्याने वाण विचारल्यावर शेजारची मंगला (उजवा खुंट) कुत्सित हसली!! आमच्या हृदयाला घरे पडली. तरी बरे ह्या मंगलेचा आधार कार्डावरला फोटो आमच्या मालकाच्या थोरल्या पोरीसारखा आला आहे! (खुलासा : "ती मेली म्हशीसारखी दिसत्ये' असे तिच्याबद्‌दलचे चिंत्य उद्‌गार आम्ही मध्यंतरी ऐकले आहेत. ) मंगला ही आमच्या शेजारच्या खुंटावर बसत्ये. गुदस्ता जाफ्राबादेहून परणून आणली. पळीभर दूध देत नाही, आव तर होल्स्टिन गाईचा आणत्ये. नॉन्सेन्स!

येथून आलेली आवाबेन (डावा खुंट) मात्र म्हैस असली तरी स्वभावाने गरीब गाईसारखी आहे. मालकाकडील उष्ट्या पत्रावळी सुरळीच्या वड्यांसारख्या वळून निमूटपणे खाते. कडब्याला ढोकळा समजून गिळते. जमेल तितकी म्हसरे आणि दूध देते. त्यात खळखळ नाही. म्हशीसारखी म्हैस असून आवाबेन सुंदर आहे. तिलाही आधारकार्ड मिळाले आहे. भारतीय जनतेच्या जीवनात अच्छे दिन आले की नाही, ते ठाऊक नाही; परंतु समस्त "गो'कुळात मात्र आनंदाचे वातावरण आहे, ह्यात काही शंका नाही. ह्याचे सर्व श्रेय आपल्या सर्वांचे तारणहार श्रीश्री नमोजी ह्यांनाच, आणि फक्‍त ह्यांनाच द्यावे लागेल, असे आवाबेन म्हणाल्या. त्या कट्‌टर मोदीभक्‍त आहेत. असू दे, असू दे. भारतात जवळपास चार कोटी म्हशी असून, साडेसात कोटी गाईगुजी आहेत. एकंदरीत ही गोसंख्या नऊ कोटीच्या घरात जाते. ह्या सर्व खिल्लारास आधार कार्ड देण्याची योजना आखून श्रीश्री नमोजी ह्यांनी मोठीच कामगिरी बजावली आहे. लौकरच हरेक गाई, म्हशी किंवा बैलांसाठी "गोधन धनाधन योजने'अंतर्गत झिरो ब्यालंस ब्यांक खाती उघडण्यात येणार असून, ती आधार कार्डाला लिंक करण्यात येणार असल्याचे कळते. माणसांसाठी सुरू झालेल्या बऱ्याच योजना गाईगुजींमध्येही येणार, अशी चिन्हे आहेत. उदाहरणार्थ, "बेटी बचाव' योजनेचे रूपांतर "कालवड बचाव' योजनेत होणार असून "पढेगा बैल, छटेगा मैल' ह्या योजनेअंतर्गत बैलबुद्धीच्या गोऱ्ह्यांना मोफत शिक्षण मिळणार आहे. "गौ रक्षणा'च्या पवित्र कार्यात आपला देश एकेक खूर पुढे जात आहे. माणसांपेक्षा खिल्लारांचेच अच्छे दिन येताना बघून अनेकांनी आपल्या पाठीमागे (खुलासा : पाठीमागेच...च्यामारी!) शेण लावून आम्हाला बैल म्हणा, असा धोशा लावला आहे.

"स्वच्छ खिल्लार' योजनेनुसार हरेक कुरणात गाईगुरांसाठी स्वच्छतागृहे बांधायला काढली तर मात्र आफत ओढवणार आहे!! सोच बदलो!!

Web Title: Dhing Tang article on UID system for animals