ढिंग टांग : आवराआवर!

ब्रिटिश नंदी
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) अतिशय जड अंत:करणाने डायरीतील हे पान लिहीत आहे. आणखी महिनाभराने डायरीची पाने संपणार होती; पण एक महिनाआधीच पूर्णविराम द्यावा लागतो आहे.

आजची तिथी : विकारीनाम संवत्सर श्रीशके १९४१ मार्गेसर शु. तृतीया.
आजचा वार : थॅंक गॉड इट्‌स फ्रायडे!

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

आजचा सुविचार : कुछ ना कहो। कुछ भी ना कहो। क्‍या कहना है? क्‍या सुनना है? तुमको पता है, (अबे) हमको पता है...

नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) अतिशय जड अंत:करणाने डायरीतील हे पान लिहीत आहे. आणखी महिनाभराने डायरीची पाने संपणार होती; पण एक महिनाआधीच पूर्णविराम द्यावा लागतो आहे. यापुढे डायरी लिहिणे बंद! (नमो नम: या सिद्धमंत्राचा लक्ष पुरा करण्याचा संकल्प मात्र चालूच राहील...) सकाळी उठून खोलीबाहेर आलो, तर सारे सामसूम होते. दाराबाहेर एक टेम्पो आला. टेम्पोवाला दाराची बेल वाजवून आत आला. म्हणाला, ‘‘बंगला खाली करने को बोलेला हय, चार आदमी लायेले हय...बक्‍सेमे सामान बांधनेका हय ना?’’

टेम्पोवाला आला, तेव्हा भानावर आलो. पाच वर्षे या ‘वर्षा’ बंगल्यावर सेटल झालो होतो. निवडणूक झाल्यानंतर आणखी पाच वर्षे तरी इथेच राहायचे, हे नक्‍की झाले होते; पण कुठेतरी माशी शिंकली! (या माश्‍या नको तेव्हा शिंकतात आणि गोंधळ करून ठेवतात. असो.) आता इथले चंबुगबाळ आवरून पुन्हा नागपूरला वापस जावे लागणार, या कल्पनेने हृदयाला असंख्य इंगळ्या डसल्या. हे सारे कोणामुळे झाले? माझ्या एका प्रिय मित्रामुळे!! त्याचा याच बंगल्यावर डोळा होता, हे मला वेळीच समजले नाही...अहह!!

जड हातांनी एक खोका उचलून त्यात मी माझ्या पाच वर्षे जमवलेल्या वस्तू भरत राहिलो. कितीतरी मानचिन्हे, शाली, छायाचित्रे...काय काय गोळा केले होते!! खोके भरून त्यावर बसकण मारली आणि न राहवून मित्रवर्य उधोजीसाहेबांना फोन केला. आश्‍चर्य म्हंजे त्यांनी तो एका झटक्‍यात उचलला.

‘‘हार्दिक अभिनंदन! तुमच्या शपथविधीला यायला जमलं नाही, त्याबद्दल सॉरी!’’ मी म्हणालो.

‘‘मी तुम्हाला फार मिस केलं! तुमची खुर्ची मी शेवटपर्यंत रिकामी ठेवली होती!’’ हळव्या मनाचे आमचे मित्र म्हणाले. मी ओशाळलो. जायला हवे होते; पण दिल्लीहून ‘गेलात तर खबरदार’, असा दम भरण्यात आला होता. बराच वेळ कोणीच काही बोलले नाही.

‘‘हरकत नाही, या एकदा ‘मातोश्री’वर चहाला!’’ शांततेचा भंग करत अघळपघळपणाने त्यांनी घरगुती निमंत्रण दिले. मी च्याटच पडलो. एवढे रामायण घडूनही माणसामध्ये कडवटपणाचा लवलेशदेखील नाही.

‘‘‘मातोश्री’वर मी येऊ? पण तुम्ही इथं ‘वर्षा’ बंगल्यावर राहायला येताय ना? मी खाली करतोय आता!’’ घाईघाईने मी खुलासा केल्यागत म्हणालो.

‘‘जाल हो सावकाश नागपूरला वापस! इतकी काय घाई आहे? काही दिवस तरी मी ‘मातोश्री’वरूनच ऑपरेट करणार आहे!’’ ते म्हणाले. ‘मी पुन्हा च्याट पडीन’ असे ओरडावेसे वाटले; पण त्यांनीच पुढे खुलासा केला, म्हणाले, ‘‘कालच्या शपथविधी कार्यक्रमात अगडबंब हार गळ्यात घेतल्यामुळे मान पार अवघडली आहे! मानेला पट्टाकॉलर लावूनच कामाला सुरवात केली आहे. सध्या इथूनच काम केलेलं बरं!’’

‘‘आराम करा’’, असे सांगून मी फोन ठेवला, आणि विचार करू लागलो. 

आमच्या परममित्राची मान अवघडणे साहजिक होते. ऑटोरिक्षातून हिंडताना एरवीच आपली मान आणि पाठ खिळखिळी होते. त्यांना तर तीन चाकांची रिक्षा चालवायची आहे. त्यात शेतकरी कर्जमाफीपासून शेकडो आश्‍वासनांचे ओझे असलेला हार गळ्यात पडला आहे. मान अवघडणारच!

पण यातले काही बोललो नाही. बोलणार तरी काय? कुछ ना कहो, कुछ भी ना कहो...!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article varsha bungalow