विकासाचे खापर! (ढिंग टांग!)

विकासाचे खापर! (ढिंग टांग!)

''ग्हब्रीघॉये आहा याहू न भावा,'' गडकरीसाहेबांनी काढलेले हे उद्‌गार ऐकून बाकी कोणी बुचकळ्यात पडले असते, पण आम्ही नाही. समोरच्या प्लेटीतील गर्मागर्म कचोरी मुखात जाण्यासाठी धडपड करत नसती, तर 'गरीबाघरच्याले असं छळू नये, बापा,' हा त्यांचा उदात्त एवं स्वच्छ उद्‌गार कोणालाही ऐकू आला असता. पण आमचे कान तयार आहेत. 

''छळ कोणाचाही वाईटच...पण कोणाचा झाला?,'' आम्ही कचोरीची 'री' ओढत विचारले. 

''तुमच्या महाराष्ट्रात तं हे छळाचं प्रकरण फार आहे बरं...आमची दिल्ली बरी त्यापेक्षा!,'' प्लेटीतली उरलेली कचोरी आम्ही उचललेली बघून त्यांचा सूर अचानक बदलला असावा. 

''छळ कोणाचा झाला, साहेब!,'' आम्ही कचोरी मुखात रेटावी, तस्सा मुद्दा रेटला. 

''...विकासाचा छळ होऊन ऱ्हायला आहे तुमच्या महाराष्ट्रात!'' संतप्त नजरेने गडकरीसाहेबांनी आम्हाला एकवार कचोरीसारखे कढईत तळून काढले, मग वांग्यासारखे भाजून काढले, सगळ्यात शेवटी कुकरातील डाळीसारखे उकडून काढले. 

''कोण विकास?'' आम्ही मुदपाकखान्याच्या दिशेने येणाऱ्या मधुर सांबारवडीच्या सुगंधाने दिवाणे झालो होतो. कोण कुठला विकास...आपल्याला काय करायचेय? बाय द वे, ह्या विकासला एकदा बघून ठेवले पाहिजे. काळा- गोरा कधी बघितला नाही, पण पठ्ठ्या कायम चर्चेत असतो. 

'' भैताड आहे का बे तू? विकास माहीत नै का तुले?'' साहेब...तेवढ्यात सांबारवडीने वाचवले. फर्मास खमंग वड्यांचा नागपुरी दर्वळ खोलीत पसरला. 

''मध्यंतरी हा इसम वेडा झाला होता, एवढं माहीत आहे. बरा झाला का तो? आमच्या ठाण्याला एक ओळखीचे डागतर आहेत. पाहिजे तर आपण त्याला-'' आमचे वाक्‍य पूर्ण झाले नाही. समोरच्या प्लेटीतील सांबारवडी पुढल्या काही सेकंदात नाहीश्‍या होतील, ह्याची जाणीव होऊन आम्ही चपळाईने प्लेटीकडे झेप टाकली, त्यात वाक्‍य गेले!! 

''तुमच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या नकारात्मक वागणुकीमुळे विकासाची कोंडी होऊन ऱ्हायली आहे. बघावं तेव्हा लेकाचे झारीतल्या शुक्राचार्यासारखे आडकाठी करतात. निधी मंजूर होऊनही कामं होत नाहीत. सारखी आपली नकारघंटा वाजवायची! आम्ही उरापोटी लाख लाख कोटींची कामं जाहीर करून देतो...लोकं आम्हाले जाहीर नावं ठेवायला लागलीत...म्हणे ते गडकरीसाहेब नुसते साबणाचे फुगे 'फूफ फू' करून सोडून ऱ्हायले...अरे हुट!!'' दात-ओठ खात साहेब आमच्या अंगावर आले. आम्ही अंमळ दचकून मागे सरलो. तेवढ्यात त्यांना काहीतरी आठवले... 

''पोहे संपले का? यिऊ द्या दोन-चार प्लेट इकडं...,'' साहेबांनी मुदपाकखान्याच्या दिशेने 'वर्क ऑर्डर' सोडली. 

'' पोह्यांवर शेवसुद्धा टाकायला सांगा थोडी!,'' आम्ही उपसूचना केली. पण साहेबांनी त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. बहुधा शेवेसाठी निधी उरला नसावा! जाऊ दे. काही विघ्नसंतोषी माणसे 'बुलेट ट्रेनची गरजच काय?' ह्या चालीवर 'पोहे असल्यावर शेवेची गरजच काय?'असे म्हणायला कमी करत नाहीत. पण आमचे साहेब तसे नाहीत. 

''तुमच्या महाराष्ट्रातले अधिकारी तं फार एक्‍सपर्ट आहेत खोडा घालण्यात! अशानं कसा होणार विकास?,'' साहेब काहीश्‍या वैतागाने म्हणाले. त्यांचा संताप समजून घेण्याजोगा होता. लाखो कोटींची कामं मंजूर करायची आणि अधिकाऱ्यांनी केवळ कामे करायला नको, म्हणून निधी अडवायचा, हे काही योग्य नाही. अशाने 'अच्छे दिन' येणे जिकिरीचे होते. 

''ह्यावर काही उपाय नाही का, साहेब?'' आम्ही. 

''आहे ना!,'' पाय हलवत साहेब म्हणाले. आम्ही उत्सुकतेने दोन दिशांना पाहू लागलो. एक, साहेबांकडे, दुसरी पोह्यांकडे! 

''आधी कामे करून, मग लागेल तसा निधी मंजूर केला तर?'' आम्ही आयडिया सुचवली. कधी कधी आमचेही डोके झक्‍क चालते. 

...त्यावर आमच्या नजीक आक्रमकपणे येत साहेब जळजळीत सुरात म्हणाले, ''आम्ही काय करून ऱ्हायलोय मग?''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com