ये तो होनाही था! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

क्‍काय? मी खंडणीचं राजकारण करतो? इथं मी राष्ट्रीय अस्मितेबद्दलच्या समस्येला हात घालतोय आणि तुम्ही असले घिनौने आरोप करता? मी...मी...मी सूड घेईन! 

दादू : (फोनमध्ये कुजबुजत्या आवाजात) हलोऽऽऽ...कोण उलैतां मरे? 

सदू : (अर्धवट झोपेत अनवधानाने) हांव सदूबाब...आपलं ते हे...मी सदू! 

दादू : (खुशीत) द्येव बरे करो तुजें! हांव दादूबाब रेऽऽ... 

सदू : (प्रसिद्ध खर्जात) आता कोकणीत बोलायला लागलात का आपण...आनंद आहे! 

दादू : (टिपिकल गोंयकार स्टाइलीत) ऍक...कितें रे! आता गोंयांत आल्यावर गोंयाची भास बोलायला नको? 

सदू : (घुश्‍शात) का? महाराष्ट्राची अस्मिता संपली? तुम्हाला गोव्याचा पुळका कशामुळे आलाय, ते माहीतेय मला! 

दादू : (भान हरपून) इथलं इस्वणाचं कालवण खाऊन बघ! नुस्तेखावप्यांचा स्वर्ग आहे हा!! पहिल्या घासाला मी ठरवलं होतं...बस्स, ह्यापुढे स्वत:ला गोव्याच्या अस्मितेसाठी वाहून घ्यायचं! तूसुद्धा ये इथं. 

सदू : (डब्बल घुश्‍शात)...शिवाजी पार्क सोडून मी एकतर कधीही बाहेर जात नाही. गेलो तरी महाराष्ट्रधर्म सोडत नाही. समजलं? 

दादू : (थंडपणानं) बाकी तुझा सिनेमा काय म्हणतोय? 

सदू : (कंटाळलेल्या सुरात) कुठला सिनेमा? 

दादू : (एक मस्त पॉज घेत) अरे, तो रेऽऽऽ..तुझा नवा सिनेमा येतोय ना! धर्मा प्रोडक्‍शन्स पेश करते है...नई रोम्यांटिक फिल्म...ये तो होनाही था!! (गाणं गुणगुणत) एक मैं और एक तू...दोनो मिले इस तरह...और जो तनमन में हो रहा है...ये तो होनाही था! हाहा!! 

सदू : (दुप्पट थंडपणानं) मी सिनेमा बंद पाडण्यासाठी फेमस आहे, सुरू करण्यासाठी नाही! समजलं? 

दादू : (टोमणा हाणत) एक पिक्‍चर बंद पाडला, की आपला सुरू राहतो!! हेच राजकारण आहे तुमचं! मुश्‍किल आहे बुवा!! तुमच्या त्या फिल्मी राजकारणापेक्षा आमचा गोवा बरा! 

सदू : (वैतागून) हे बघ, दादूराया, तू त्या ‘ऐ दिल है मुश्‍किल‘ सिनेमाबद्दल बोलत असशील, तर माझ्याकडून प्रश्‍न मिटलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढून देण्याची मला रिक्‍वेस्ट केली. मी ती मानली. पाच-पाच कोटी द्या आणि पावन व्हा, असं मी सांगून टाकलंय त्यांना! प्रायश्‍चित्त घेतलं, की पाप पुण्यामध्ये कन्वर्ट होतं!! 

दादू : (खवचटपणाने) ...मग दिले का त्या सिनेमावाल्यांनी पाच कोटी? प्रायश्‍चित्त म्हणे! हु:!! 

सदू : (उसळून) साधी पाल मारली की काशीला जाऊन सोन्याची पाल वाहायची सोय आहे ना आपल्याकडे? मग? 

दादू : (हेटाळणीच्या सुरात) उद्या शंभर कोटीची खंडणी घ्या आणि दाऊद इब्राहिमला पावन करून घ्या, असं सांगशील..! 

सदू : (संतापाने) दादू, पाच कोटी मी दिवाळीचं पोस्त नव्हतो मागत तुमच्यासारखा! आर्मीला द्या, म्हणत होतो! 

दादू : (हेटाळत) आमच्या आर्मीला नकोत तुझे खंडणीचे पैसे! आम्ही आमचे कमवू!! 

सदू : (चवताळून) क्‍काय? मी खंडणीचं राजकारण करतो? इथं मी राष्ट्रीय अस्मितेबद्दलच्या समस्येला हात घालतोय आणि तुम्ही असले घिनौने आरोप करता? मी...मी...मी सूड घेईन! 

दादू : (आव्हान देत) काय करशील रे? काय करशील? 

सदू : (संयमानं) हे बघ दादूराया, मी संयम पाळायला शिकलोय आजकाल! मी भांडणार नाही! मी माझं काम करत राहणार! तू तिथं गोव्यात बसून काटे काढायचे उद्योग कर! माशांचे रे!! 

दादू : (माशांच्या आठवणीनं घायाळ होत) इथली कोलंबी काय लागते रे!! क्‍या बात है!! माझं ऐक, ते शिवाजी पार्क सोड आणि इथं ये एकदा!! 

सदू : (चतुराईने) तुझा सिनेमा पूर्ण झाला का पण तिथला? 

दादू : (च्याट पडत) माझा सिनेमा? कुठला? 

सदू : (एक डेडली पॉज घेत) बॉम्बे टू गोवा पार्ट थ्री!

Web Title: Dhing Tang by British Nandi