पेंग्विन : एक सत्य! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

एका राजपुत्राने ठरविले की, 
आपल्या साम्राज्यात सत्य 
नावाची वस्तू असली पाहिजे. 
राजहट्टापुढे काय चालते? 
फर्मान सुटले...

पेंग्विन हे एक सत्य आहे, 
बाकी सारे आहे मिथ्या. 
तसे पाहू गेल्यास 
डार्विनसाहेबांच्या 'ओरिजिन ऑफ स्पेसीज' 
ह्या (बोगस) ग्रंथानुसार, पेंग्विन 
हा एक निव्वळ निष्पक्ष पक्षी आहे. 
एरवी कालसागराच्या खडकांवर 
आपली जमात वाढवणारी, 
कलकलाटाने किनारे भरून टाकणारी, 
काळ्याशार लाटांध खडकांवर 
शिटून शिटून त्यांना चक्‍क 
संगमरवरी शुभ्र करणारी, 
ही उभयचर प्रजाती 
कितीही अमर असली तरी 
कायमस्वरूपी असते एक 
एंडेजर्ड स्पेसी. 
...सत्यासारखीच. 
कावळ्यासारख्या चेहऱ्याचोचीचा 
परंतु, काही प्रमाणात बगळेपण 
बर्करार असलेला हा एक अंडज आहे. 
...सत्यासारखाच. 

एका राजपुत्राने ठरविले की, 
आपल्या साम्राज्यात सत्य 
नावाची वस्तू असली पाहिजे. 
राजहट्टापुढे काय चालते? 
फर्मान सुटले... 
राजपुत्राचे सैन्य रवाना झाले, 
आणि काही पेंग्विन घेऊन आले. 

जसे सत्यही सतत 
जगत असते खडकांवर 
आणि अर्थातच असते 
काळ्या-पांढऱ्या रंगात. 
पंख असूनही हमेशा 
दोन पायांवर खुरडत चालते सत्य. 
निसर्गात निर्भयपणाने 
जगणारे सत्य सापळे लावून 
पकडले जाते तज्ज्ञांकरवी, 
आणले जाते शहरात 
बंदिस्त प्राणवायुयुक्‍त 
वातानुकूल दालनात, तेव्हा 
त्यास पाळावे लागते निगुतीने. 

सत्य पाळणे अवघड आणि 
भलतेच असते महागडे! 
पण राजपुत्राला पर्वडते. 

अगदी तस्सेच झाले पेंग्विनचे. 

एक दिवस नियंत्रित महागड्या 
वातावरणातही सत्याला 
झाला जीवघेणा आजार, 
आणि मान खाली घालून 
उभे असलेले काळे-पांढरे सत्य 
गेले झडत एकेक पिसानिशी, 
आणि एक दिवस मरून गेले, 
उभेच्या उभे! 

उरलेल्या पेंग्विनवर अविश्‍वासाचा ठराव 
आणून त्यांस पुन्हा खडकांवर 
सोडण्याचा प्रस्ताव आहे. 

तात्पर्य : लोकशाही व्यवस्थेत सत्य 
जगत नाही फारसे...पेंग्विनसारखेच. 

तरीही ह्या जगात- 
पेंग्विन हेच एक सत्य आहे, 
बाकी सारे आहे मिथ्या.

Web Title: Dhing Tang by British Nandi