शुभेच्छा आणि इशारा! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

सर्वप्रथम सर्व मराठीजनांस दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी आपणां सर्वांस खूप खूप सुरक्षित जावो! आपणांस हे विदित असेल, की आज रोजी दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू होत असून, पुढील दोन-चार दिवस उत्सवाच्या काळात प्रत्येकाने काळजी घेणेची आहे. आपणांस व इतरेजनांस कोठेही भाजू नये, ह्यासाठी फटाक्‍यांवर शतप्रतिशत निर्बंध आणण्यात आले आहेत, ह्याची कृपया नोंद घेणेचे करावे. दिवाळीच्या दिवसांत फटाके फोडताना काळजी न घेतल्याने भयंकर प्रसंग ओढवतात, असे निदर्शनास आले आहे. यंदाची दिवाळी (तरी) सुरक्षित पार पडावी, म्हणून सरकारने काही नियम/सूचना घालून दिल्या आहेत.

सर्वप्रथम सर्व मराठीजनांस दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी आपणां सर्वांस खूप खूप सुरक्षित जावो! आपणांस हे विदित असेल, की आज रोजी दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू होत असून, पुढील दोन-चार दिवस उत्सवाच्या काळात प्रत्येकाने काळजी घेणेची आहे. आपणांस व इतरेजनांस कोठेही भाजू नये, ह्यासाठी फटाक्‍यांवर शतप्रतिशत निर्बंध आणण्यात आले आहेत, ह्याची कृपया नोंद घेणेचे करावे. दिवाळीच्या दिवसांत फटाके फोडताना काळजी न घेतल्याने भयंकर प्रसंग ओढवतात, असे निदर्शनास आले आहे. यंदाची दिवाळी (तरी) सुरक्षित पार पडावी, म्हणून सरकारने काही नियम/सूचना घालून दिल्या आहेत. ह्या सूचनांचे पालन करण्यात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करणेच्याही सूचनाही देण्यात आल्या आहेत. तरी खालील सूचना नीट वाचून त्याचे नीट पालन करावे, ही विज्ञापना.

1) दिवाळीत मोठ्या आवाजाचे फटाके लावण्यास सक्‍त मनाई आहे. सुतळी बॉंब घरात बाळगणाऱ्यास संजूबाबाप्रमाणे येरवड्यात धाडण्यात येईल. तसेच हा फटाका क्रिकेट म्याच भारताने जिंकल्यावरच वाजवता येतो. दिवाळीत नाही, ह्याची नोंद घ्यावी.

2) मडके हे पाणी भरून ठेवण्यासाठी असते, फटाके लावण्यासाठी नव्हे, ह्याची नोंद घ्यावी. सुतळी बॉंब किंवा तत्सम फटाके रिकाम्या मडक्‍यात वाजवण्याची अत्यंत निषिद्ध अशी परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यावर यंदा कडक निर्बंध आहेत.

3) लौंगी, पोपट, टिकल्या आणि स्वपत्नी सोडून अन्य कोठल्याही आवाजवाल्या फटाक्‍यांवर बंदी आहे.

4) दिवाळीची संधी साधून ख्यातनाम चित्रतारका सनी लिओनीची छायाचित्रे असलेले फटाके राजरोस घरात आणू नयेत. घरात मुलेबाळे असतात. "फटाक्‍या'चा वेगळा अर्थ त्यांना ह्या वयात कळेल, असे वागूसुद्धा नये.

5) कच्चे दिलवाल्यांनी कापसाचे बोळे कानांत घालून मगच घराबाहेर पडावे. अन्यथा, तेच बोळे नाकात घालून परत यायची पाळी येऊ शकते, हे ध्यानी धरावे!

6) टिकल्यांचे पिस्तुल खरे आहे, असे सांगून समोरील व्यक्‍तीस धमकावणे निषिद्ध आहे. हल्ली दिवस फार वाईट आहेत. समोरील व्यक्‍तीचा हार्टफेल झाल्यास त्याची जबाबदारी टिकलीवाल्यावर राहील.

7) पायजमा-सदरा किंवा लुंगी घालून जात असलेल्या व्यक्‍तीस सहानुभूती दाखवून सदर व्यक्‍ती पूर्ण जाईपर्यंत भुईचक्र किंवा अनार लावू नये. भयंकर अपघाताच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत.

8) हवेत झुईंकन जाणाऱ्या अग्निबाणांचे उड्‌डाण मर्यादेत करावे. गुदस्तसाली पुण्यातील एका सोसायटीतील घराच्या खिडकीतून असा एक बाण घुसला व घरमालकाच्या नव्याकोऱ्या प्यांटीत शिरला. दुर्दैवाने तो घरमालक त्या प्यांटीतच होता.

9) अग्निबाण उडवणाऱ्यासाठी खास सूचना : आपण म्हंजे "इस्रो'चे शास्त्रज्ञ नाही, हे बरे समजून असावे! अग्निबाण उडविणे हे रॉकेट सायन्स मानले जात नाही. तेव्हा जरा जपून!

10) अग्निबाण अथवा रॉकेट उडविण्यासाठी लागणाऱ्या बाटल्या (रिकाम्या करून) आणणे हा दिवाळीच्या दारूकामाचाच एक भाग आहे, असे समजू नये! "कमी प्या, कमी उडवा'!!

11) आपापल्या बाटल्या आणि माचिस बॉक्‍स काळजीपूर्वक सांभाळाव्यात.

12) सर्वांत अखेरची आणि महत्त्वाची सूचना : निवडणुकीच्या प्रचारसभेत किंवा "मेक इन इंडिया'सारख्या कार्यक्रमात मन:पूत फटाके उडवून स्टेजबिज जाळून झाल्यावर जनसामान्यांच्या आतषबाजीवर निर्बंध आणणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या घराच्या कडीवर डांबरी माळ लावून पळून जाणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करणेत येईल.

Web Title: Dhing Tang by British Nandi