Dhing Tang
Dhing Tang

चिनी दिवाळे! (ढिंग टांग)

त से पाहू गेल्यास आम्ही काहीच्या काहीच प्रखर राष्ट्राभिमानी आहो. कां की, आमच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत अहर्निश जळत असत्ये. ह्या राष्ट्रप्रेमापोटी गेल्या महिनाभरात a शेकडो रुपयांचा डेटाप्याक बघता बघता उडून गेला, इतके राष्ट्रप्रेम संदेश आम्ही जनलोकांस फॉर्वडिले. पाकी कलावंताची कंडम भूमिका असलेला ‘ऐ दिल है मुश्‍किल’ हा चित्रपट पाहायला आम्ही चित्रगृहाकडे फिरकलोसुद्धा नाही. चित्रपटाचा निर्माता करण जोहर ह्याने ‘‘कॉहीही कोरा, पोण ऑमचॉ सिनिमॉ पॉहा बोवा! पुन्हा ऑम्ही ओसो कॉही कोर्णार नॉही!’’’ असे आश्‍वासन देऊनही आम्ही जाम बधलो नाही. त्यास म्हटले, ‘‘जैसा करण, वैसा भरण! अब भुगतो!’’ असो.

काळी शाई आणि दगडे ही आमची अमोघ अस्त्रे होत. सरहद्द आमचेपासून दूर असली, तरी राष्ट्रासाठी आम्ही अनेकदा सिंपल हद्द ओलांडत असतो. उदाहरणार्थ, पाकी विचारवंतांच्या भिकार चोपड्यांच्या प्रकाशन समारभात घुसून काळी शाई मारणे, खळ्ळ- खट्याक दगडंपंची करणे किंवा फॉर द्याट म्याटर, अस्सल मऱ्हेटी शिवीगाळ जाहीर करणे... आदी आंदोलनांमध्ये आम्ही अग्रभागी नसलो तरी मध्यभागी असतोच. तिकडे सरहद्दीवर धुमश्‍चक्री सुरू झाल्याचे पाहून आम्ही आधी घरातील सुऱ्या-चाकूंना धारवाल्याकडे नेऊन आणले. बिचाऱ्याने धारसायकलीवर तोंडाला फेस येईपर्यंत प्याडले मारत आमची आयुधे सिद्ध करून दिली. तद्‌नंतर ‘‘देशकार्याचे पैसे कसले मागतोस, शिंच्या?’’ असे त्याला सुनावण्यासही कमी केले नाही. तथापि, आम्ही अत्यंत बनिया प्रवृत्तीचे कद्रू माणूस आहो, असा काही एक अपसमज समाजात विनाकारण पसरला आहे. काही असामान्य विभूतींना भयंकर लोकापवादास तोंड देत आयुष्य कंठावे लागते. दिवाळीच्या ज्योतीसम निमूटपणे जळावे लागते. (त्यावर विडी पेटवा नाहीतर फुलबाज्या!) पण आमच्या कद्रूपणाचे किस्से ह्या शुद्ध अफवा आहेत, हे आम्ही ऐन दिवाळीच्या दिवसांत जाहीर करत आहो. आता स्वस्त काही दिसले तर आमचे मन तेथे ओढले जाते, हे खरे. फुकट काही दिसले तर आमचा होशच उडतो, हेदेखील खरेच. पण तरीही आम्ही औंदा दिवाळीत चिन्यांना चारीमुंड्या चीत केले, हे शतप्रतिशत खरे आहे. होय, आजमितीस आम्ही चिनी बनावटीचा एकही फटाका फोडला नाही, हे सांगताना आमचा सीना एकशेछप्पन इंचाचा झाला आहे! त्याचे असे झाले की...
दिवाळीच्या फटाका दुकानात आम्ही सहज गेलो असता तेथे एक चपट्या नाकाचा इसम चेहरा पाडून बसला होता. आमच्याकडे त्याने आशाळभूत नजरेने पाहिले.

‘‘मी शी जिनपिंग...फटाके हवेत?’’ त्याने विचारले. आम्ही जोराजोराने नकारार्थी मान हलवली. चिनी फटाक्‍यांवर आम्ही बहिष्कार घातल्याचे शुभवर्तमान आम्ही तांतडीने त्यांच्या कानावर घातले. ‘आमच्याकडून पैसे कमावून ते पाकिस्तान्यांच्या उरावर घालता. ते आमच्या उरावर उरी घालतात, हे थांबवायचे असेल, तर ‘मूले कुठार:’ ह्या न्यायाने आम्ही चिनी माल विकत घेणे थांबवले पाहिजे’, असे एक लंबेचवडे व्याख्यान आम्ही त्यांना दिले. त्यांना आमचा युक्‍तिवाद पटला असावा. कां की ते वारंवार मान डोलावत होते. अखेर काही काळाने ते आम्हाला चक्‍क शरण आले. चिनी माणसास नाक मुठीत धरावयास लावणाऱ्या माणसाचे कर्तृत्व आभाळाइतकेच मानायला पायजेल. इवलेसे नाक मुठीत एक तर गवसत नाही, त्यातून...असो.

‘‘ह्यावर उपाय काय? तुम्ही आमचे फटाके घेतले नाहीत, तर आमची अर्थव्यवस्था मोडकळीस येईल आणि आशिया खंडात दारिद्य्र येईल....कुछ करो!’’ त्यांनी आम्हाला अगदी गळच घातली.

‘‘अ-श-क्‍य...जैसा करण, वैसा भरण! अब भुगतो!’’ आम्ही निर्धाराने म्हणालो. बोट उंचावर खड्या आवाजात त्यांना सुनावले, ‘‘ह्या पातकाला प्रायश्‍चित्त नाही, जिनपिंगसाहेब! मुकाट्याने बीजिंगला निघून जा!’’
...ह्यावर बराच वेळ पॉज घेऊन त्यांनी स्वत:च उपाय सुचवला. तो ऐकून आम्ही सपशेल विचारात पडलो आहो. कुजबुजत्या आवाजात आमच्या कानात त्यांनी विचारले...

‘‘पाच कोटी दिले तर बहिष्कार उठवाल ना?’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com