डीएनए म्हंजे काय भौ? (ढिंग टांग)

Dhing Tang
Dhing Tang

आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके 1938 आश्‍विन कृष्ण तृतीया. 
आजचा वार : हळूवार! 
आजचा सुविचार : जे पिंडी ते ब्रह्मांडी! 

नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे.) ह्या सिद्धमंत्राचे वह्यांवरती लेखन करून त्याचा पाच वर्षांत लक्ष वाहण्याचा संकल्प आहे. लक्ष पुरा झाला की त्या पवित्र वह्या समारंभपूर्वक समुद्रार्पण करण्याचा मानस आहे. ज्या स्पीडने मी मंत्रलेखन करतो आहे, तो पाहता लक्ष पुरा व्हायला पाच वर्षे काही लागणार नाहीत, आधीच पुरा होईल असे वाटते! स्पीड कमी केला पाहिजे... असो. 

आमच्या कारभाराला दोन वर्षे पूर्ण झाली म्हणून दिवाळी साजरी होते आहे, की ऐन दिवाळीत दोन वर्षे पूर्ण झाली आहेत, हेच समजून नै ऱ्हायले! ऍक्‍चुअली मी स्वत:च क्‍नफ्यूज होऊन गेलो आहे. दोन वर्षे सत्तेत ऱ्हायलो की दोन वर्षे विरोधी बाकापासून दूर ऱ्हायलो? मैंने क्‍या पाया, जो मैंने खोया? मैंने क्‍या खोया, और क्‍या पाया? 

ज्याअर्थी मला (आमच्या पक्षकार्यालयात) सगळे सीएमसाहेब असे म्हणताहेत, त्याअर्थी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत मी फिट्‌ट बसलो आहे. पण मलाच अजून नीट कॉन्फिडन्स आलेला नाही, असे वाटते. आत्ताआत्तापर्यंत कुणी 'अहो, सीएमसाहेब' अशी हाक मारली तर मी चमकून मागे वळून पाहात होतो. हल्लीच टाळू लागलो आहे. मागल्या वेळेला एकदा पृथ्वीबाबाजी लिफ्टमध्ये भेटले, तर त्यांना तीन वेळा 'सीएमसाहेब' म्हणालो. शेवटी ते माझ्या कानात कुजबुजले, ''अहो, आता मी नाहीए सीएम...तुम्ही आहात!'' जाम ओशाळलो होतो. मंत्रालयात सीएमच्या दालनात शिरताना सुरवाती सुरवातीला तर आपण कुठले तरी निवेदन घेऊन चाललो आहो, असेच वाटत असे. महत्प्रयासाने ती खोड घालवली. 

विरोधी पक्षात असणे ही जित्याची खोड आहे. सत्तेत येऊनही (काही केल्या) जात नाही. मला तर वाटते की अपोझिशनचा एखादा 'डीएनए'चा मणी असावा. सत्तेत आलो तरी हा डीएनए मधूनच उफाळून येतो, आणि गोची होते. परवा दिवाळीच्या निमित्ताने नागपूरला गेलो असताना भाषणात मी हे न राहवून बोललोच. मी म्हणालो : हा डीएनए आम्हाला सत्तेत असल्याचे वास्तव विसरायला लावतो. आता आपण मागण्या करायच्या नसून पुरवायच्या आहेत, हेच विसरतो....जाऊ दे. 

तर मत असे झाले आहे, की राजकारणात येताना हरेकाने आपापली डीएनए टेस्ट करून घ्यावी. प्रवेश देताना पक्षश्रेष्ठींनीही ह्या टेस्टचा रिपोर्ट इच्छुकांकडून मागावा. सत्ता पक्षात असूनही रक्‍तात ही अपोझिशनची भानगड असली की पंचाईत होते. विरोधी पक्षातल्या लोकांमध्येही सत्तेचा डीएनए असला की घोटाळे होतात. एकंदरीत, हे डीएनए प्रकरण राजकारणात महाग पडते. आमचे काही लोक तर सत्तेत राहून आंदोलने, मागण्या, आरोप असले प्रकार वारंवार करीत असतात. 

ज्याप्रमाणे कसबी नटाला रंगमंचावर आपल्या भूमिकेचे बेअरिंग सांभाळावे लागते, तस्सेच राजकारणातही सांभाळणे आवश्‍यक असते. उदाहरणार्थ, अण्णासाहेबांचा रोल करताना नटाला बापूसाहेबांच्या आवाजात बोलून चालत नाही. (अण्णासाहेबांची नाइट वेगळी असते, आणि बापूसाहेबांची वेगळी हे प्रमुख कारण!) रंगाचा बेरंग होतो. 

परवाचे नागपुरातले भाषण आटोपून शिरस्त्याप्रमाणे गडकरीवाड्यावर गेलो. (शिरस्त्याप्रमाणे दिवाळीचा फराळ चेपला!) चिवड्याची फक्‍की मारताना गडकरीसाहेबांनी पुन्हा विषय काढला. म्हणाले, ''हे डीएनएचं काय बोलून गेले तुम्ही भाषणात? असलं कुठं काय अस्तं का? ह्यॅ:!!'' 

त्यांना 'डीएनए'ची शास्त्रीय माहिती दिली. त्यावर शांत राहून शेवटी ते म्हणाले, 

''त्याले डीएनए काहून म्हणता? त्याले त येळकोट म्हंटात नं भौ!!'' 

तात्पर्य : डीएनए म्हंजे येळकोट...उदा. वाघ्याचा झाला पाग्या, पण त्याचा येळकोट जाई ना!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com