सुनो जनमेजय! (ढिंग टांग! )

ब्रिटिश नंदी
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

''तक्षका! तुझ्या विषारी पिढ्यांचा 
होवो संहार...नष्ट होवो 
तुझा विषाचा वारसा 
उलथो तुझ्या कपटी 
विषाक्‍त प्रजातीचे प्राक्‍तन 
नामशेष होवो शेषाचे विशेष! 

राजा परिक्षिताच्या हत्त्येच्या 
प्रतिशोधार्थ जनमेजयाने आरंभलेल्या 
सर्पसत्रात धडधडत राहिल्या 
यज्ञाच्या अक्राळविक्राळ ज्वाला, 
सांदीसपाटीत, अंधाऱ्या कुहरात 
दडून राहिलेल्या सर्पविश्‍वात 
पसरला आतंक... 
जनमेजयाच्या अघोरी यज्ञात 
पडत राहिली आहुती 
लक्ष लक्ष सर्पांच्या वेटोळ्यांची. 
त्यांच्या विषकुप्यांसकट. 

''तक्षका! तुझ्या विषारी पिढ्यांचा 
होवो संहार...नष्ट होवो 
तुझा विषाचा वारसा 
उलथो तुझ्या कपटी 
विषाक्‍त प्रजातीचे प्राक्‍तन 
नामशेष होवो शेषाचे विशेष! 

इंद्रा! विकृत विषैल तक्षकाला 
आश्रय देणारे तुझे इंद्रासन 
होवो उलथेपालथे. 
आग लागो तुझ्या देवत्वास, 
तुझ्या वज्राची वाळू होवो! 

इंद्राय तक्षकाय स्वाहा!'' 

उत्तंक ऋषींच्या मंत्रोच्चारणाच्या 
धगीने पोळलेल्या वासुकीने 
गाठले आपल्या बहिणीस... 
म्हणाला : भगिनी जरत्कारु, 
वणव्याच्या आगीत सुक्‍याबरोबर 
काही ओलेदेखील जळतेच! 
पण तरीही... 
समुद्रमंथनात देवादिकांच्या 
मनोरथासाठी प्राणांची कुर्वंडी 
करणाऱ्या ह्या वासुकीलाही 
आता यज्ञात पडावे लागणार? 
तुझा पुत्र आस्तिक ह्यास 
पाठीव जनमेजयाकडे, आणि 
थांबीव हा भयानक यज्ञ. 
अन्यथा, तक्षकाच्या प्रतिशोधार्थ 
सुरू झालेल्या ह्या सर्पसत्रात 
तुझा हा बिचारा बंधू वासुकी 
जळून कोळसा होईल!'' 

पुढला इतिहास सर्वज्ञात आहे... 
कोवळ्या आस्तिकाच्या मखलाशीने 
राजा जनमेजय द्रवला. 
यज्ञ थांबविण्यास त्याने आज्ञापिले, 
अनिच्छेनेच उत्तंक ऋषींनी 
थांबविले मंत्रोच्चारण... 

यज्ञाच्या लवलवत्या ज्वाळांमध्ये 
जळून जाण्यापासून तक्षक वाचला. 
देवत्वाची राख होण्यापासून 
वज्रधारी इंद्रही वाचला. 
प्रतिशोधाचे पातक कपाळी 
घेण्यापासून जनमेजय वाचला. 
अमृतमंथनात आयुष्याचा दोर 
करणारा वासुकीही वाचला. 

''ऐक! जनमेजया,''अस्तिक म्हणाला : 
''तात्पर्य हेच की, सर्पसत्र सुरू करणे 
कधीही हिताचेच, पण 
त्याहूनही अधिक महत्त्वाची असते 
ती यज्ञाची सांगता. 
कारण- 
यज्ञात पडत असते ती आहुती, 
यज्ञाच्या सांगतेत असते ते आश्‍वासन!

Web Title: Dhing Tang by British Nandi