पेशंट! (ढिंग टांग!)

Dhing Tang
Dhing Tang

तसे आम्ही हार्डकोर देशभक्‍त आहो; पण गेले काही दिवस आमच्यात देशद्रोहाची लक्षणे दिसू लागल्याने काळजीत पडलो. देशद्रोह हा एक दुर्धर आजार आहे. एका रात्रीत माणूस हजाराच्या नोटेसारखा बाद होतो. चांगल्या भल्या देशभक्‍तालाही त्याची लागण होऊ शकते. म्हंजे असे, की साबुदाणा खिचडी आणि शेंगदाणा उसळ आवडीने खाणाऱ्या माणसालाही अचानक मुर्गी, पाया, वजडी अशा पदार्थांची स्वप्ने पडू लागतात. मुर्गीची तंगडी चावणाऱ्याला अचानक राजगिरा पुरी आणि बटाट्याच्या भाजीची सय येते. बिर्याणीवादी वऱ्याचे तांदूळ शोधू लागतो आणि शेंगदाण्याचा कूट करणाऱ्या भगिनीमातेचे हात कोळंबी सोलण्यासाठी शिवशिवू लागतात. काहीचिया बाही होऊ लागते. देशद्रोहाची लक्षणे जाणवू लागली, की माणसाने ताबडतोब डॉक्‍टरांकडे जावे; पण त्यात समस्या अशी आहे, की काही काही डॉक्‍टरही देशद्रोहाचे पेशंट असतात. 

आता तुम्ही ओठ पुढे काढून आम्हाला विचाराल, की 'बुवा, देशद्रोहाची लक्षणे काय?' तर ती येणेप्रमाणे : देशद्रोहाचा व्हायरस अंगात शिरला की काहीही...म्हंजे अक्षरश: का-ही-ही खाल्लेले नसताना (पैसे समाविष्ट) अचानक मळमळू लागते. विनाकारण डोके दुखू लागते. अपचनाने जीव त्रस्त होऊन मनःस्थिती बिघडून जाते. पुढील पिढ्यांचे भविष्य घडविण्यासाठी आपण झिजायचे असते, ही जाणीव पार नष्ट होते. आपला देश पुन्हा उभारून तो फिनाइल शिंपडून निर्जंतुक करण्याची जबाबदारी झटकण्याकडे रुग्णाचा कल वाढतो. काहीतरी सण्णकन भ्रष्टाचार करून टाकावा, अशी उबळ मनात उसळ्या मारू लागते. 

अशा या देशद्रोहाची लागण आम्हाला झाली. शिरस्त्याप्रमाणे आम्ही (कोपऱ्यावरील) डॉ. काळे यांच्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला चिकुनगुनियाच्या सर्टफिकेटाचे दोनशे आणि डेंगीचे तीनशे पडतील, असा रेट सांगितला. या डॉ. काळे यांच्याकडून आम्ही गेल्या वर्षी तीन-चार वेळा जांडिसचे सर्टफिकिट नेले होते. 'व्हायरल इन्फेक्‍शनचे किती?' असे आम्ही विचारले. त्यांनी 'पन्नास' असे सांगितले. डॉ. काळे हे अत्यंत देशद्रोहाने पछाडल्याचे आमच्या लागलीच ध्यानात आले. असो. सेकंड ओपिनियन घ्यावे म्हणून पलीकडल्या गल्लीतील डॉ. गोरे यांचे दवाखान्यात गेलो तर त्यांनी थेट 'उपडी पडा' असे सांगितले. पडलो! 'प्यांट सोडा' असे सांगितल्यावर कचकावून दचकलो. त्यांच्या हाती इंजेक्‍शन होते. पेशंट आला रे आला की डॉ. गोरे इंजेक्‍शन मारतात! ते भयंकर देशभक्‍त आहेत. अखिल भारत देश आणि देशवासी रोगाने बेजार असून, आपणच त्यांचे तारणहार आहो, अशी त्यांची समजूत आहे. डॉ. काळे पर्वडतात, डॉ. गोरे यांचा रोगापेक्षा इलाज भयंकर असतो. 

कुणीतरी आम्हांस सांगितले, की देशद्रोहाच्या केसेस बघण्यात निष्णात डॉक्‍टर एकच- डॉ. फडणवीस! सध्या रोअरिंग प्राक्‍टिस चालू आहे. अपॉइंटमेंटशिवाय भेट मिळणे अशक्‍य. शिवाय देशभक्‍त असल्याने वशिल्याने भेट मिळणे इंपॉसिबल! रांगेला पर्याय नाही... 

अखेर निरुपायाने मलबार हिल्लच्या 'वर्षा' क्‍लिनिकवर गेलो. तिथे प्रचंड मोठी रांग होती. कालांतराने नंबर लागला. आत गेलो. समोर डॉ. फडणवीस बसलेले. रुमाल काढण्यासाठी आम्ही खिश्‍यात हात घातला. 

''इथे नोटा बदलून मिळत नाहीत, मिस्टर!,'' डॉ. फ. म्हणाले, ''बोला, काय होतंय?'' 

''देशद्रोह होतोय सारखा!,'' आम्ही पडेल आवाजात म्हणालो. ''दिवसातून किती वेळा देशद्रोह होतो? साफ होतो का? पोटात गुरगुरते का? त्या आम आदमी टाइप जुनाट खोकला आहे का?'' असे अनेक प्रश्‍न डॉ. फ. यांनी विचारले. 

''हे पाहा, जे लोक निमूटपणाने रांगेत उभे राहतात, ते देशभक्‍त! ज्यांना रांगा आवडत नाहीत, ते देशद्रोही...अशी सोप्पी टेस्ट आहे! तुम्ही करून घ्या...असं करा! कुठलंही एटीएम पकडा आणि समोर जाऊन उभे राहा! रिपोर्ट घेऊन माझ्याकडे परत या!,'' डॉ. फ. यांनी फर्माविले. 

आम्ही 'येतो' असे म्हणताच डॉ. फडणवीस किंचित खाकरले. म्हणाले, ''कन्सल्टिंग फी पाश्‍शे रुपये...नवी नोट हं!''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com